(सकाळ नवी मुंबई (६ जुलै ,२०१६ ) रोजी प्रसिद्ध झालेला लेख . योग्य वाटल्यास आपल्या इतर ग्रुपवर पाठवायला विसरू मात्र नका ! धन्यवाद !!
आपल्या अनुकूल -प्रतिकूल प्रतिक्रियांचे स्वागतच !!!)
दहावीत ८० टक्के मिळवूनही नामांकीत महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही या नैराशातून आत्महत्या केल्याचे वृत्त वाचून पुन्हा पुन्हा विचार करून देखील "नामांकीत शिक्षण संस्था " म्हणजे काय याचे उत्तर मिळाले नाही . खरेच , आता केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पालकांनी देखील नामांकीत संस्था म्हणजे नेमके काय याचा शांतपणे -डोळसपणे विचार करण्याची गरज वाटते . आणि होय , त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला नामांकीत -दर्जेदार असे मानणाऱ्या शिक्षणसंस्थांनीही आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज दिसते . अन्य संस्थांपेक्षा कोणते वेगळेपण या संस्थाकडून जपले जाते याचाही उहापोह होणे क्रमप्राप्त दिसते .
नामांकीत-दर्जेदार शिक्षणसंस्था केवळ धूळफेक :
सध्या विविध पातळीवरील केजी पासून पीजी पर्यंतच्या प्रवेशाचे दिवस आहेत . मेसेज -मेल -वर्तमानपत्रातील पानभरून जाहिराती , पहिल्या तिनात आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो -त्यांचे मत यासम विविध माध्यमातून आम्हीच सर्वात दर्जेदार असल्याचा दावा करत शाळा -महाविद्यालये आणि खाजगी क्लासवाले पालकांना भुरळ घालत आहेत. प्रवेश घेण्यासाठी याचना करत आहेत . आजवर अशा जाहिरातीसाठी खाजगी क्लासेस आघाडीवर असत . हल्ली त्याचीच री शाळा -महाविद्यालये ओढताना दिसत आहेत .
बरे! तथाकथीत नामांकीत -दर्जेदार हि बिरुदे प्राप्त करण्याचा , शिक्षणसंस्था-क्लासवाल्यांचा ठरलेला निकष म्हणजे टॉप विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले मार्क्स . हीच ती काय यांची शिदोरी . विद्यार्थ्यांना प्राप्त गुण हाच जर दर्जेदार शिक्षण संस्थांचा निकष मान्य केला तर प्रश्न उरतो तो उरलेल्या ९० % विद्यार्थ्यांचा . एखाद्या वर्गात जर ५०-६० विद्यार्थी असतील तर जाहिरात करणाऱ्या शाळा -कॉलेज-क्लासेस ने सर्वच विद्यार्थ्यांना प्राप्त गुण पालक -समाजासमोर ठेवायला हवेत . यासाठी किती शैक्षणिक संस्था तयार आहेत याचे उत्तर नकारात्मकच असल्याचे अनुभव अनेक पालकांना सातत्त्याने येताना दिसतात .'गोपनीयतेच्या 'सबबीखाली इतर विद्यार्थ्यांचे मार्क्स जाहीर न करण्याकडेच या सर्वांचा कल दिसतो . जाहीर करण्याचे सोडा पालकांना आपल्या पाल्याला प्राप्त अंतर्गत (Internal Marks ) तोंडी परीक्षा - प्रात्यक्षिक याचे विवरण देखील दाखवण्याचे सौजन्य तथाकथीत नामवंत संस्था दाखवण्याचे टाळतात . तिच गत खाजगी क्लासेसची .
यशाचे सेलिब्रेशन तर अपयशाचे खापर :दुतोंडी भूमिका
सर्वात महत्वाचे हे की , तथाकथीत दर्जेदार संस्था , प्रवेश देताना कटऑफच्या नावाखाली केवळ उत्तम गुण देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देतात . जेवढे कटऑफ अधिक तेवढी ती संस्था अधिक दर्जेदार . नवी मुंबईतील सर्वाधिक दर्जेदार -नामवंत शाळेचे ११ वी प्रवेशाचा कटऑफ होता ९२%. बारावीला मात्र अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यापैकी केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विद्यार्थी नवद्दी पार करू शकलेले . ३०-४० टक्के सत्तरीच्या आत . बातमी - जाहीरात मात्र पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची . इतर विद्यार्थ्यांचे काय ? त्यांच्या मार्कांबाबत गोपनीयता पाळण्याचा अट्टाहास कशाचे द्योतक समजावयाचे ? केवळ क्रीम विद्यार्थ्यांना घेऊन गुणवत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या संस्थाचे स्वतःचे असे विशेष योगदान कोणते ? नवद्दी पार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या श्रेयाचे धनी या संस्था स्वतःला मानत असतील तर कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांच्या अपयशाचे धनी कोण ? शेवटी विद्यार्थ्यांचे परिश्रम महत्वाचे या सबबी खाली आपली सुटका करून घेऊ पाहणाऱ्या या संस्थाना नामवंत -दर्जेदार म्हणून मिरवण्याचा नैतिक अधिकार उरतो का ? यश-अपयशाचे अंतीम धनी केवळ विद्यार्थीच ठरणार असतील तर नामांकीत -दर्जेदार संस्थातच प्रवेशाचा अट्टहास केवळ भ्रमनिरास ठरतो . हि फसवणूक विद्यार्थ्यांची -पालकांची की स्वतः संस्थांची ? यासम अनेक संवेदनशील प्रश्नांवर सोशलमेडिया -वर्तमानपत्रे आणि प्रसारमाध्यमातून उघडपणे चर्चा होणे काळाची गरज आहे .
अनेक पालक नामांकीत -दर्जेदार संस्थांच्या बाजारीकरणाला बळी पडत आपल्या पाल्यांना दरोरज २०-३० किमीचा प्रवासाचे ओझे लादतात . काही पालक आपले स्वतःचे घरदार सोडून सोकॉल्ड नामांकीत शाळा -महाविद्यालयाच्या जवळ राहण्यास जातात . यासम अनेक प्रकारचे द्राविडी प्राणायाम करतात . आपल्या पाल्याचे करीयर घडवण्यासाठी नामांकीत महाविद्यालयात प्रवेश घेउन देखील धडपडणाऱ्या पालकांच्या हाती काहीच लागणार नसेन तर या संस्थांना दर्जेदार -नामवंत शाळा -महाविद्यालय संबोधणे कितपत योग्य ठरते?
हीच व्यथा खाजगी क्लासेस च्या बाबतीत देखील लागू पडते . स्पर्धा परीक्षांच्या यशाची मृगजळ दाखवत हि मंडळी अक्षरश: खोऱ्याने पैसा लुटतात . नीट -सीईटी -जेईई च्या खात्रीशीर यशाचे दिवास्वप्न दाखवत क्लासवाले ३ ते ५ लाखाचा दर आकारतात . शेवटी किती विद्यार्थ्यांच्या नशिबी असे यश मिळते हे गुलदस्त्यातच राहते .
पालकही बरोबरीने जबाबदार : प्रत्येक विद्यार्थ्याची एक क्षमता ठरलेली असते . प्रत्येक विद्यार्थ्याचा इंटेलीजन्ट कोशंट (IQ ) , इमोशनल कोशंट (EQ ) वेगवेगळा असतो . प्रत्येक जण आयआयटीतच प्रवेश कसा मिळवू शकेन . प्रत्येक विद्यार्थ्याची आवड -निवड -शारिरीक क्षमता -मानसिक क्षमता भिन्न असते याचा विसर पडल्यामुळे प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या क्षमतेचा विचार न करता 'विशिष्ट यशा'च्या ध्यासापाई स्पर्धा परीक्षेचे घोडे म्हणून पाहतात . आणि त्यामुळेच नामांकीत -दर्जेदार संस्था -क्लासच्या बाजारीकरणाचे आर्थिक -मानसिक बळी ठरतात . केवळ उत्कृष्ट दर्जाची बॉट घेऊन दिली म्हणून प्रत्येक जण सचीन होऊ शकत नाही याचा विचार करणे पालकांनी गरजेचे आहे .
अंतर्गत गुण दुहेरी शस्त्र : अंतर्गत गुणांच्या सुविधेचा शाळा -महाविद्यालये दुहेरी शस्त्र म्हणून वापर करत असल्यामुळे पालकांचा अभिमन्यू होतो आहे . जे पालक संस्थाचालकांच्या अनिर्बंध शुल्कवाढ , शाळा -कॉलेजमधूनच खरेदीची सक्ती यासम मनमानीला विरोध करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पाल्यांना अंतर्गत कमी गुण देत मॉनेजमेंट त्यांची शिकार करतात तर जे केवळ संस्थेच्या प्रत्येक निर्णयाला नंदीबैलासारखी मान डोलावून होकार भरतात त्यांच्यावर मात्र पात्रता नसताना देखील शंभर टक्के गुणांची बरसात केली जाते . सर्वात महत्वाचे म्हणजे अंतर्गत गुण आणि लेखी परीक्षेतील गुण यात पारदर्शकता नसल्यामुळे संस्थांची मनमानी वर्षानू वर्षे उजेडात येत नाही . स्टेट बोर्ड , केंद्रीय बोर्ड या सर्वांचा याला छुपा पाठींबा आहे असे दिसते अन्यथा प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर INTERNAL -EXTERNAL मार्क्स वेगवेगळे दर्शवण्याची पालक -शिक्षण अभ्यासकांची मागणी वर्षानुवर्षे दुर्लक्षीत ठेवली नसती .
अंतर्गत गुणांची होणारी वारेमाप उधळणीचा आणखी एक धोका म्हणजे कृत्रिम गुणवत्तेचा फुगवटा . या कृत्रीम फुगवट्यामुळे पालक -विद्यार्थ्यांची दिशाभूल होते आहे . प्राप्त गुणांच्या आधारे पालक क्षमतेपेक्षा अधिक कठीण अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात आणि पुढे न झेपल्यामुळे पाल्याचे शैक्षणिक भवितव्य पणाला लागते . मृगजळ प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात नसते तसेच काहीशे नामवंत -दर्जेदार संस्थांच्या बाबतीत म्हणावे लागेल . दर्जेदार -नामवंत संस्थांच्या -क्लासेसच्या मागे धावणाऱ्या वियार्थ्यांची -पालकांची अवस्था कांचनमृगा सारखी झालेली दिसते.
राज्यातील शिक्षणतज्ञ -शिक्षण अभ्यासक , सामाजीक संस्था , शिक्षण विभाग शैक्षणिक धूळफेक आणि फसवणुकीच्या बाबतीत गप्प का ? हे मात्र न उलगडणारे कोडे आहे .
संभाव्य उपाय योजना :
- शैक्षणिक संस्था -खाजगी कोचींग क्लासेस विद्यार्थ्यांना 'ग्राहक ' मानतात . याच अनुषंगाने ग्राहकहक्क कायद्यानुसार विद्यार्थी -पालकांची तथाकथीत नामांकीत -दर्जेदार संस्थांकडून होणारी दिशाभूल टाळण्यासाठी सरकारने, शिक्षण विभागाने तातडीने पाऊले उचलणे अनिवार्य दिसते .
- · केजी पासून ते पीजी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थाना आणि खाजगी कोचींग क्लास वाल्यांना स्थापनेपासूनच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणांचा लेखाजोघा संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे अनिवार्य करावे .
- · शाळा-कॉलेजमध्ये चालणारे विविध अभ्यासक्रम , शिक्षक -प्राध्यापकांची शैक्षणिक अर्हता , प्रवेशासाठी अवलंबली जाणारी प्रवेश पद्धती , विद्यार्थ्यांच्या निकालाचा लेखाजोघा यासम सर्व माहिती वेबसाईटवर टाकणे सक्तीचे करावे .
- · विद्यार्थी -पालकांची दिशाभूल करणारी , कृत्रिम फुगवट्यास कारणीभूत ठरणारी अंतर्गत गुणांची खैरात एकतर पूर्णपणे बंद करावी अन्यथा त्यात पूर्ण पारदर्शकता येण्यासाठी त्याची थेट नोंद गुणपत्रिकेवर करण्याचा निर्णय सरकारने सर्व बोर्डांना अनिवार्य करावा .
- · विद्यार्थ्यांची ससेहोलपट टाळण्यासाठी बारावीपर्यंतचे प्रवेश केवळ लॉटरी पद्धत्तीनेच करावेत जेणे करून नामांकीत -दर्जेदार संस्थांच्या बाजारीकरणाचे खूळ उघडे पडेल .
· पारदर्शकतेचे सर्व नियम खाजगी कोचींग क्लासेसना देखील लागू करावेत .
- · खासकरून दहावी -बारावी बोर्डाचा सर्व विद्यार्थ्यांचा निकाल शाळा -कॉलेजांना बोर्डवर लावणे अनिवार्य करावे.
- सुधीर लक्ष्मीकांत दाणी
danisudhir@gmail.com भ्रमणध्वनी : ९८६९ २२ ६२ ७२