शिक्षणक्षेत्रात " अभ्यासशून्य ,नियोजनशून्य " प्रयोग नकोत !!!




       शिक्षण हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ .  त्या त्या देशाचे शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता हि त्या देशाची ओळख असते . व्यक्ती -समाज -राष्ट्र निर्मितीचा मार्ग हा शिक्षणातून जात असल्यामुळे शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीत अनन्यसाधारण महत्व असते . शिक्षणाला योग्य दिशा देणारी यंत्रणा सक्षम असेल तर राष्ट्राची भरभराट सुसाट होते हे अनेक पाश्चात्य देशांनी दाखवून दिले आहे .

                स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे आपल्या देशाचे दीर्घकालीन शैक्षणिक धोरण कोणते या प्रश्नाचे समर्पक उत्तर ना राज्याकडे आहे ना केंद्राकडे . कुठलेच दीर्घकालीन स्पष्ट धोरण नसणे हेच आजवरचे धोरण आहे असे म्हट्ले तर फारसे अतिशोयुक्तीचे ठरणार नाही . निर्णयातील टोकाची विसंगती हेच अधोरेखीत करते . बदलत्या सरकारानुसार बदलणारी धोरणे हाच आजवरचा धोरण प्रवास राहिल्यामुळे एकूणच शैक्षणिक विश्व दिशाहीन झाल्यासारखे दिसते आहे आणि त्यामुळेच व्यक्ती -समाज -राष्ट्राला दिशा देणारे शिक्षणच दिशाहीन झालेले दिसते आणि हे खचितच भूषणावह नाही . अंतर्गत गुण हवेत की नकोत स्टेट बोर्डात अंतर्गत गुणाला मुक्ती तर अन्य मंडळाच्या बोर्डात खैरात हे दिशाहीन शिक्षण व्यवस्थेचेच लक्षण आहे . 

                     शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले जाते शिक्षण हे सर्व समस्यांवरील उत्तर आहे असे म्हटले जाते परंतू दुर्दैवाने तेच शिक्षणक्षेत्र आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे.  शिक्षणाचे सार्वत्रीकरण होण्याबरोबरच उपलब्ध शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दर्जाचे जतन व संवर्धनास प्राधान्य देणे अत्यंत निकडीचे आहे . महासत्तेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा तोच राजमार्ग आहे .   स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार झाला हे उघड सत्य आहे प्रश्न हा आहे की आजवर झालेली शैक्षणिक प्रगती सर्वसमावेशक ,गुणवत्ता पूर्ण आहे का ?


 शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्हच ???

 " आकाशाला गवसणी घालणारी टक्केवारी आणि ढासळती गुणवत्ता " हा प्रश्न केवळ बोर्डांच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही तर त्याने केजी ते पीजी पर्यंतचे विश्व व्यापून टाकले आहे . पहिले ते आठवी पर्यंतच्या शिक्षणातील गुणवत्तेचे लक्तरे तर प्रतिवर्षी "प्रथम " या संस्थेच्या देशव्यापी सर्वेक्षणातून पुढे येत आहेत.
            अभियांत्रिकी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची . असोकेमच्या म्हणण्या नुसार केवळ १८ टक्के अभियंते हे वर्तमान उद्योजगतासाठी 'पात्रतेचे असतात . 'पेस्ट अँड कॉपी' (कू )संस्कृतीमुळे पीएचडीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहेच .एकुणात काय तर भारतीय शिक्षण  क्षेत्राच्या पायापासून ते कळसा पर्यन्तच्या सर्व विभागाला 'टक्केवारीचे ग्रहण लागल्यामुळे 'सोप्या कडून अधिक सोप्याकडे असा  शिक्षण प्रवाह सुरु आहे . परीक्षांतील गुणांची टक्केवारी वाढते आहे परंतू गुणवत्तेला मात्र ओहोटी लागली आहे . वर्तमान शिक्षणातील हा सर्वाधिक यक्ष प्रश्न आहे . " टक्केवारीची दिवाळी तर गुणवत्तेचे दिवाळे"  या चक्रव्यूहात पालक -विद्यार्थी -समाज आणि राष्ट्राचा अभिमन्यू झाला आहे . 

शिक्षणक्षेत्राचे नियोजन शिक्षणतज्ज्ञाकडेच हवे :

        शिक्षण क्षेत्र हे प्रयोगाचे क्षेत्र नाही . शिक्षणातील एक प्रयोग फसला तर त्याचा दूरगामी परिणाम हा एका संपूर्ण पिढीवर होत असतो आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक निर्णय हा अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनेच घ्यायला हवा . यासाठी शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवर कामस्वरूपी एक विभाग असावा . त्यात केवळ आणि केवळ शिक्षण तज्ञाचाच समावेश असायला हवा . त्यांनी देशाचे शैक्षणिक धोरण ठरवायला हवे . शिक्षण तज्ज्ञांनी ठरवलेल्या  धोरणांची अंलबजावणी वर्तमान शिक्षण व्यवस्थेकडून करून करायला हवी .

महासत्तेचे स्वप्नपूर्ती  करण्यासाठी  शिक्षण व्यवस्थेवर सर्जिकल स्ट्राईक हवा :

            शिक्षणाचे खाजगीकरण नागरिकांना समजलेले शिक्षणाचे महत्व यामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले साक्षरतेचे प्रमाण वाढले या गेल्या काही दशकातील शिक्षणाच्या बाबतीतील सकारात्मक गोष्टी असल्या तरी त्यास 'गुणवत्तेचे दिवाळेहि नकारात्मक झालर आहे .वर्तमान शिक्षण व्यवस्थेत साचलेपणा आलेला आहे . अनेक नकारात्मक गोष्टींनी शिक्षणाला ग्रासले आहे . केजी टू पीजी शिक्षण व्यवस्था महासत्तेचे स्वप्नपूर्तीस पूरक बनण्यासाठी वर्तमान शिक्षण व्यवस्थेवर सर्जिकल स्ट्राईक करणे अत्यंत गरजेचे आहे . 

दृष्टिक्षेपातील उपाययोजना :

•             शिक्षण क्षेत्राचे नियोजन केवळ आणि केवळ शिक्षण तज्ज्ञाकडेच हवे :  भारतात शिक्षणावर नियंत्रण करणाऱ्या राज्य आणि केंद्रीय पातळीवर नियंत्रण करणाऱ्या डझनावर संस्था आहेत  More cooks spoils food या न्यायाने या संस्थांत योग्य समन्वय नसल्यामुळे शिक्षण क्षेत्राची ससेहोलपट होत आहे . यासाठी केजी टू पीजी पर्यंतच्या शिक्षणाची  केवळ दोन भागात विभागणी करावी . एक नियोजन आणि दुसरी अंमलबजावणी . शिक्षण क्षेत्राचे नियोजन थेट तज्ज्ञांकडे सोपवत त्याची अंमलबजावणी वर्तमान संस्थांवर असावी . संपूर्ण देशात केवळ एकच शिक्षण धोरण ठरवणारी यंत्रणा असावी .
·         सर्व बोर्डांसाठी परीक्षा पद्धती मूल्यमापन पद्धतगुणदान पद्धत  समान असावी .

•             सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची निवड थेट एमपीएससी मार्फत करावी कारण शिक्षण व्यवस्थेचा ते कणा आहेत .
•             सर्व सरकारी शाळांचा दर्जाच्या उच्चीकरणास प्राधान्य दयावे ज्या योगे खाजगी शिक्षण संस्थांना योग्य स्पर्धक निर्माण होऊन नागरिकांना मोफत नाही तरी "माफक" दरात शिक्षण मिळेल .

•             शिक्षक -प्राध्यापकांना देशाचे इंजिनिअर्स असे संबोधले जाते . त्यांचे राष्ट्र उभारणीतील महत्व लक्षात घेत डीएड-बीएड सम शिक्षक घडवणारे शिक्षण कालानुरूप सुसंगत ,आधुनिक करण्यास सर्वोच्च प्राधान्य हवे . शिक्षक -प्राध्यापक काळानुसार अदयावत राहण्यासाठी प्रती वर्षी त्यांना १५ दिवसांचे 'प्रशिक्षण अनिवार्य असावे.

•             शैक्षणिक दुकानदारीला चाप हवा : 'स्वायत्त शिक्षण आयोग 'स्थापन करून बृहत आराखड्याच्या आधारेच नवीन शैक्षणिक संस्थांना परवानगी दयावी . शैक्षणिक दुकानदारीला चाप लावण्यासाठी शाळा -महाविद्यालयांचे वाटप स्वायत्त आयोगामार्फतच करावे .

•             गुणवत्तेवर आधारीत शिक्षक -प्राध्यापक भरती : राज्य पातळीवर शिक्षक -प्राध्यापकांची परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी संकेत स्थळावर टाकावी . ज्या ठिकाणी शिक्षक -प्राध्यापकांची नियुक्ती आवश्यक आहे तिथे तिथे या गुणवत्ता यादीतूनच शिक्षक -प्राध्यापकांची भरती करावी . शिक्षक -प्राध्यापकांचे राष्ट्र उभारणीतील महत्व लक्षात घेत याची केवळ घोषणा नको तर कठोर अंमलबजावणी हवी .

•             गुणवत्तेच्या अध:पतनात महत्वाचा अडसर म्हणजे "शिक्षणाचे माध्यम ". इंग्रजी माध्यमाच्या अंधानुकरणामुळे विद्यार्थ्यांची अवस्था 'न घर का न घाटकाअशी होत असल्यामुळे त्याच्या आकलन आणि व्यक्त करण्याच्या क्षमतांचा विकासास अडथळा होतो आहे . त्यामुळे भविष्यात किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच होण्यास प्राधान्य द्यायला हवे .
•             शाळा -महाविद्यालय वाटपांचे निकष 'फिक्सअसावेत जेणेंकरून शाळा-महाविद्यालयांच्या वाटपातील 'फिक्सिंग'ला आळा बसेन .
•             केजी टू पीजी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या भौतिक सुविधांचे (जसे - शिक्षकांची शैक्षणिक अर्हता वाचनालय प्रयोगशाळा मैदान अध्यापनास पूरक साहित्य ...) मूल्यमापन करणारी स्वायत्त यंत्रणा हवी . दर ३ वर्षांनीं मूल्यमापन करणे अनिवार्य असावे .
•             संपूर्ण राज्यासाठी योजनाबद्ध शैक्षणिक कॅलेंडर हवे जेणेकरून सर्व बोर्डांच्या शाळा -महाविद्यालयात सुसंगती असेन . 

•             गुणवत्तेच्या कृत्रिम फुगवट्याला चाप लावण्यासाठी अंतर्गत गुणदान (Internal Mark )पद्धत बंद करावी .अगदीच हे शक्य नसेन तर मार्कशीटमध्ये तोंडी /प्रात्यक्षिक आणि लेखी गुण स्वतंत्ररीत्या नमूद करणे अनिवार्य असावे .

•             गुणवत्ता जतन -संवर्धनासाठी कॉपीमुक्त परीक्षा आवश्यक : वर्तमान शिक्षण गुणवत्ता अधपतनात सर्वात कारणीभूत काय असेन तर ती गोष्ट म्हणजे परीक्षांना लागलेला कॉपीचा व्हायरस . या व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संबंधित बोर्डानी आणि शिक्षण मंत्र्यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवणे अत्यंत गरजेचे आहे .

•             स्कॉलरशिप परीक्षा गांभीर्याने घ्याव्यात : वर्तमान युग हे स्पर्धेचे असल्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होण्याच्या दृष्टीने स्कॉलरशिप परीक्षा अत्यंत महत्वाच्या आहेत. या परीक्षांकडे पालक -शिक्षक -शाळां-शिक्षण खात्याचा दृष्टिकोन केवळ सोपस्काराचा झालेला असल्यामुळे या परीक्षांनाही सामूहिक कॉपीची कीड लागलेली आहे . या परीक्षांनी अनेकांच्या आयुष्याला दिशा दिलेली आहे हे ध्यानात घेता शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्कॉलरशीप परीक्षांचा उपयोग करायला हवा .
•             शिक्षक -विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करावी .
•             दर ५ वर्षांनी अभ्यासक्रमाचे उच्चीकरण आणि कालसुसंगत बदल करण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा बनवणारी उच्चस्तरीय शिक्षण तज्ज्ञांची समिती असावी.
•             शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विनियोग योग्य पद्धतीने होण्यासाठी सरकारतर्फे केल्या जाणारया सर्व खर्चाचा लेखाजोखा संकेतस्थळावर पब्लिक डोमेनवर उपलब्ध असावा.



सुधीर लक्ष्मीकांत दाणी  ९८६९२२६२७२ danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा