महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था मृत्युशय्येवर : एक कटू वास्तव




( महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर तुम्ही आम्ही पालक या शैक्षणिक मासिकात  मे २०१९  प्रसिद्ध झालेला लेख ) 

           स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. भाषावार प्रांतरचना हा जनसामान्यांचा राजकारण्यांवर विजय होता . या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. लौकिक अर्थाने हे हीरक महोत्सवी वर्ष .  १ मे २०२० रोजी महाराष्ट्राची "साठी " पूर्ण होईल . महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा लेखाजोखा मांडण्यासाठी हा लेख प्रपंच .


मागे वळून पाहताना ...

        माझा जन्म २ हजार लोकसंख्या असणाऱ्या खेड्यातला . सत्तरचे दशक . प्राथमिक शिक्षण तिथलेच . झेडपीची शाळा . पहिली ते सातवीचे  वर्ग . गावातल्या सर्वच स्तरातील मुले त्याच शाळेत . स्वतः शिक्षकांची सरपंचाची पाटलाची किराणा दुकानदार कपडा व्यापारी  यासर्वांची मुले एकत्रच . कारण अन्य काही पर्याय असण्याचा संबंधच नव्हता . शिक्षक प्रामाणिकपणे आपल्या शिक्षकी पेशाला न्याय देणारी . रोज रतीब लावल्याप्रमाणे वर्गात मोठ्याने सामूहिक पाढे पठण केले जाई त्यामुळे ३० पर्यंतचे पाढे पक्के . अन्य विषयात देखील योग्य मार्गदर्शन मिळत असे . त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होत असे . दहावी पर्यंतचे शिक्षण खेड्यातल्या शाळेतच .

    अर्थातच पुढील शिक्षणासाठी शहरात जाण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता . सरकारी शाळॆत शिक्षण घेऊन  व खाजगी ट्युशनच्या कुबड्या न वापरता देखील ११ वी  ते पोस्ट ग्रॅड्युएशन कुठेच अडथळा जाणवला नाही . स्वतःचेच उदाहरण मांडण्यामागे  ९० च्या दशकापर्यंत सरकारी शाळा याच ग्रामीण महाराष्ट्राच्या श्वास होत्या हा मुद्दा स्वानुभवाच्या आधारावर अधोरेखीत करणे . 

   आज जे नागरीक नोकरी ,व्यवसायात स्थिरस्थावर झालेले आहेत त्यांचे वडील आजोबांचे शिक्षण हे सरकारी शाळांमधीलच .  थॊड्या फार फरकाने महाराष्ट्राच्या संपूर्ण ग्रामीण भागात हीच परिस्थिती होती .


वर्तमानातील जमिनी वास्तव :

     हे झाले मागे वळून पाहताना . आज काय वास्तव आहे त्याच शाळेचे . शाळेची इमारत आहे  पण विद्यार्थ्यांची वानवा आहे . शिक्षक आहेत पण त्यांचे प्रमाण ४ वर्गासाठी  १/ २ शिक्षक . बहुतांश ठिकाणचे सरकारी शाळातील चौथीच्या पुढचे वर्ग बंद केलेले आहेत .  ना सरपंचाची  ना पाटलांची ना छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांची सधन शेतकऱ्यांची  एवढेच कशाला ना स्वतः शिक्षकांची ना शिक्षण खात्यातील मुले /मुली या शाळेत शिकत आहेत . ज्यांना ज्यांना आर्थिक दृष्ट्या शक्य आहे त्यांनी खाजगी शाळांची वाट पत्करली आहे . खेड्यातील पालक पोटाला  चिमटा काढून तालुका ,जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवताना दिसतात . सरकार प्रती विद्यार्थी हजारो रुपयांचा खर्च करत असताना दप्तर बूट ,पुस्तके यासम वस्तू देत असताना अगदी दुपारचे भोजन देत असताना देखील पालक 'सरकारी शाळांची पायरी चढण्यास तयार दिसत नाही . अगदीच पर्याय नाही अशाच पालकांची मुले सरकारी शाळांमध्ये वर्तमानात शिकताना दिसतात . यास अपवाद असणाऱ्या शाळा असतीलही पण त्या अगदी बोटांवर मोजण्या इतपतच .
              अर्थातच अनेकांना वास्तव पटणार नाही . मत -मतांतरे असतील ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की  वृथा स्वाभिमान आणि वास्तव यांच्यामध्ये सत्य नावाचा पडदा असतो . सुज्ञास अधिक सांगण्याची गरज नसावी जे आज सरकारी शाळा या देखील खाजगी शाळां इतक्याच दर्जेदार आहेत अशी मते व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या मंचावरून मांडतात अन्य प्लॅटफॉर्मवरून मांडतात त्यांना अतिशय नम्र प्रश्न हा आहे की दर्जेदार सरकारी शाळांचा लाभ आपण आपल्या पाल्यांना देतात का देत नसाल तर दर्जेदार शिक्षणापासून पाल्यांना वंचीत ठेवण्यामागे काय 'अर्थ आहे ?


असे का घडले ? :

      सर्व साधारणपणे कालानुरूप व्यवस्था सुधारत जाते .  याच न्यायाने ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा दर्जा वर्तमानात भूतकाळापेक्षा अधिक दर्जेदार होणे अपेक्षीत आहे . पण स्वप्नपूर्ती होताना दिसत नाही . मग प्रश्न निर्माण होतो की असे का झाले 

   यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या . आज महाराष्ट्रात पाणीबाणी निर्माण झालेली आहे . पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दिवसागणिक वाढताना दिसते आहे . टँकर पुरवठा दार कोण आहेत ज्या लोकप्रतिनिधी नोकरशाही कडून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुधारण्याची जबाबदारी आहे त्याच मंडळींची सगेसोयरे टँकर व्यवसायात आहेत . या हितसंबंधीय व्यवस्थेत ओघानेच जितकी पाणीबाणी वाढेल तेवढीच राजकीय मंडळींसाठी फायदेशीर ठरते . एकीकडे दुष्काळात जनतेला पाणी पाजल्याचे पुण्य मिळते तर दुसरीकडे आर्थिक हितसंबंध देखील जपले जातात . म्हणूनच वर्षानुवर्षे विविध सरकारी योजना राबविल्यानंतर देखील दुष्काळाची व्याप्ती वाढते आहे .



       उपरोक्त उदाहरण सरकारी शाळांची दुरावस्था व खाजगी शाळांची भरभराट यास चपखलपणे लागू पडते . ८०च्या दशकात शिक्षणाचे खाजगीकरणाचे वारे वाहू लागले . सरकारने खाजगी संस्थांना परवाने दिले . देणाऱ्यांनी आपल्याच पदरात संस्था पाडून घेतल्या . सुरुवातीला तर खर्च शासनाचा तर शाळा खाजगी असा अजब कारभार होता . त्यास अनुदानीत शाळा असे गोंडस नाव देण्यात आले . या शाळांना विद्यार्थी मिळावेत म्हणून हळू हळू सरकारी शाळांच्या दर्जाबाबत शंका निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले . सरकारी शाळांसाठी आवश्यक पायभूत सुविधा शिक्षकांची संख्या यात कपात करण्यात आली . आज सरकारी शाळा आहेत त्या केवळ नावापुरत्या . इमारती आहेत तर विद्यार्थी नाहीत . दोन दोन वर्गांचे विद्यार्थी एकत्र बसवून ज्ञानार्जन होऊ लागले . आपसूकच पालकांची पाऊले खाजगी शाळांकडे ओढली गेली आणि यातूनच ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मृत्युशय्येवर गेली .

पालकांचे झाले सँडविच :

              एकीकडे जिल्हा परिषद पालिकांनी चालवलेल्या शाळांचा घसरता दर्जा व दुसरीकडे दर्जेदार शिक्षणाच्या गोंडस नावाखाली खाजगी शाळांनी उघडलेली दुकानदारी यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील पालकांचे सँडविच झाले आहे . सातत्याने पडणारा दुष्काळ ,पिकलेल्या शेतीमालाला कवडीमोल मिळणारा भाव ग्रामीण  भागाकडे सरकारचे असणारे दुर्लक्ष त्यामुळे असणारा पायाभूत सुविधांचा अभाव  उद्योगधंद्यांना पूरक नसणारे वातावरण कुरघोडीच्या राजकारणामुळे सरकारी योजनांची होणारी फरफट यामुळे ग्रामीण भागातील नागरीक आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ६० वर्षानंतर देखील   सक्षम होऊ शकले नाहीत .  ग्रामीण अर्थव्यवस्थेचे 'शकले -शकले उडालेले असल्यामुळे या भागातील लोकांची आर्थिक अवस्था डबघाईस आलेली आहे . त्यामुळे  खाजगी शाळांची फीस  पालकांच्या आवाक्या बाहेर जाते आहे .  एकुणातच उपरोक्त व्यवस्थेमुळे  'आई जेऊ घालीना व बाप भीक मागू देईना अशी अवस्था खेड्यातील पालकांची झाली आहे .

खाजगी शाळांत देखील दर्जेदार शिक्षणाची वानवाच :

             "बोलणाऱ्याचे हुलगे देखील विकले जातात तर न बोलणाऱ्यांचे सोने देखील विकले जात नाही " अशी ग्रामीण म्हण आहे . खाजगी शाळांच्या गुणवत्तेबाबत हेच म्हणता येईल . खरे तर एकुणातच दर्जाचा विचार केला तर सरकारी शाळा असू देत की खाजगी शाळा असू देत ,दोघांच्याही दर्जात फारसा फरक नाही . दोन्हीकडे प्रत्यक्षात दर्जाची वानवाच आहे . पण खाजगी शाळा जाहिराती आणि थोड्याशा चकाकणाऱ्या इमारती यांच्या नावाखाली आपला दर्जा उच्चतम असल्याच्या वावड्या उडवत ग्राहकांना आपल्याकडे ओढून घेत आहेत .

      खाजगी शाळा आज मार्कांच्या टक्केवारीच्या नावाखाली गुणवत्तेचे जे प्रदर्शन मांडत आहेत तो आहे केवळ कृत्रिम गुणवत्तेचा फुगवटा . गुणवत्तेचा केवळ आभास निर्माण केला गेलेला आहे . वर्तमानातील संस्कृतीच्या अनुषंगाने बोलावयाचे झाल्यास  खाजगी शाळांना 'अच्छे दिन असले तरी शैक्षणिक दर्जाला अजूनही 'अच्छे दिनाची प्रतीक्षाच आहे .


   'दर्जेदार अर्धसत्य :

        शिक्षणक्षेत्रातील दर्जाबाबतचे अर्धसत्य म्हणजे " सर्वच खाजगी शाळा दर्जेदार आहेत तर सर्वच सरकारी शाळा दर्जाहीन " 

आहेत . वस्तुतः जिल्हा परिषद व पालिकांच्या काही शाळा देखील 

चांगल्या आहेत पण त्यांची संख्या अगदीच नगण्य आहेत . ज्या काही शाळा दर्जाच्या बाबतीत उजव्या आहेत त्या आहेत तेथे 

कार्यरत असणाऱ्या शिक्षक /शिक्षकांच्या वैयक्तिक प्रयत्नांच्या जोरावर . 

     खाजगी शाळांची गुणवत्ता कागदावर दाखवली जात असली तरी प्रथम सारख्या स्वायत्त संस्थेच्या अहवालातून ती देखील केवळ दिशाभूलच आहे हे दिसून येते . आपल्या दुकानदारीला ग्राहक कमी पडू नयेत म्हणून मोकळ्या हाताने गुणांची खैरात केली जाते . खाजगी शाळातील विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक दृष्ट्या थोडेसे सक्षम असल्यामुळे त्यांच्या पाल्यांना खाजगी शिकवणीच्या कुबड्यांचा आधार असतो आणि त्याचा आपसूकच लाभ खाजगी शाळांना मिळतो . वर्तमानात गुणपत्रकालाच पालक गुणवत्ता मानत असल्यामुळे त्यांना देखील आपला पाल्य हुशार असल्याचे जाणवते परंतू जेंव्हा पाल्य दहावीनंतरच्या शिक्षण व्यवस्थेत जातो तिथे त्याच्या कृत्रिम गुणवत्तेचा फुगा फुटतो . पण तेंव्हा फार उशीर झालेला असतो .
   गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणाअभावी आज खेड्यातल्या स्टॅण्डवर चावडीवर शिक्षण पूर्ण केलेल्या पण नोकरीस पात्र नसणाऱ्या युवकांची 'भाऊगर्दी 'दिसते . ग्रामीण महाराष्ट्रासाठी हे अतिशय घातक ठरत आहे आणि भविष्यात ते अधिक घातक ठरू शकेल . लेक शिकवा ,लेक वाचवा अशा घोषणा दिल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण -दर्जेदार शिक्षणाची योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाला बाधा पोहचत आहे .
             एकीकडे सरकारी शाळातून दर्जेदार शिक्षणाचा अभाव तर दुसरीकडे खाजगी शाळांचे न परवडणारे शुल्क यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेची ससेहोलफट होते आहे . शाहू -फुले -आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला हि गोष्ट निश्चितपणे शोभनीय नाही . व्यक्ती ,समाज किंवा राष्ट्राच्या उन्नत्तीचा महामार्ग हा दर्जेदार शिक्षणच असतो परंतू गेल्या ६ दशकाच्या वाटचालीनंतर देखील हा अडथळ्याचाच मार्ग ठरतो आहे .

दृष्टिक्षेपातील संभाव्य उपाय :

    दुष्काळमुक्तीच्या घोषणेसारखी अवस्था दर्जेदार शिक्षण व्यवस्थेची होऊ द्यायची नसेल तर केवळ 'बोलाचीच कढी अन बोलाचाच भात यात धन्यता न मानता रोग जालीम आहे म्हणून उपाय देखील जालीम योजने गरजेचे आहे .

१)       'आपल्याला झळ पोहचत नाही ना या वृत्तीमुळे ज्यांच्या हातात या शाळा चालवण्याचे कर्तव्य आहे ते लोकप्रतिनिधी शिक्षण खात्यातील अधिकारी स्वतः शिक्षक आणि शिक्षणमंत्री देखील केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसतात . त्यामुळे ज्यांचा ज्यांचा संबंध सरकारी शाळा व्यवस्थापनाशी आहे त्या सर्वाना अगदी शिक्षणमंत्र्यांनासुद्धा आपल्या पाल्यांना सरकारी शाळेत प्रवेश घेणे अनिवार्य करावे .

२)       शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी या शाळांचे प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काढून सरकारी शाळांच्या प्रशासनासाठी स्वतंत्र स्वायत्त विभाग स्थापन करावा .

३)        सरकार शाळांच्या पायाभूत सुविधांवर जसे शाळांच्या इमारती सातत्याने खर्च करते परंतू यातील अर्ध्याहून अधिक निधी हा भ्रष्ट्राचारात लोप पावतो . यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांच्या इमारतीचे काम एल अँड टी सारख्या नामांकीत कंपनीकडे द्यावे ,जेणेकरून निधीचा योग्य विनियोग होईल व सरकारी  शाळांच्या इमारती आकर्षक बनतील .

४)        सरकारी अनुदानीत शाळांतील शिक्षकांची भरती हि गुणवत्तेनुसार होत नसल्यामुळे योग्य दर्जेदार शिक्षकांचा अभाव जाणवतो हे टाळण्यासाठी अनुदानीत सर्व शाळांतील शिक्षकांची नियुक्ती केंद्रीय पद्धतीनेच व्हायला हवी . या धोरणाबाबत धरसोड वृत्ती नसावी .

५)       सरकारी शाळांतील सर्व शिक्षकांना नोकरीच्या गावीच निवास करणे सक्तीचे असावे .


सुधीर लक्ष्मीकांत दाणी ९८६९ २२ ६२ ७२ danisudhir@gmail.com 
       
         
       
         
   
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा