वर्तमान शिक्षक -समाज नात्यावर भाष्य करणारा लेख : शिक्षक -समाज "संवाद " पूल हवाच

 समाज मग तो कालचा असेल आजचा असेल वा उद्याचा असेल या समाजाचा खरा शिल्पकार हा 'शिक्षक'च होता आहे आणि असेल हे गृहीतक समाजमान्य आहे . 
      यातील भूतकाळ  आणि काही अंशी वर्तमानकाळाबाबत शिक्षकवर्गाने आपल्या कृतीतून शिक्कामोर्तब  केलेले आहे . याविषयी समाजाला सार्थ अभिमान आहे  आणि समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कृतीतून त्यावर वेळोवेळी  शिक्कामोर्तब केलेले आहे . थोडक्यात काय तर शिक्षक वर्ग  हा समाजासाठी  दिशादर्शकाचे काम करणारा प्रमुख मार्गदर्शक आहे . 





    ....काळाच्या स्थित्यंतरात शिक्षकाच्या सामाजिक वर्तनाविषयी आणि पर्यायाने त्याच्या  समाजाच्या जडणघडणीच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे नाकारता न येणारे कटू सत्य आहे . याच दृष्टिकोनातून आजचा समाज आणि शिक्षक यावर भाष्य करणारे हे टिपण . हा लेख वाचताना वाचकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे अपेक्षीत आहे की या लेखात केलेले भाष्य हे शिक्षकांप्रती आदर ठेवूनच केलेले आहे .

शिक्षक हा राष्ट्राचा  खरा शिल्पकार: 

        पाचवीत शिकणाऱ्या माझ्या मुलीला शिकवत असताना वेळोवेळी तिची प्रतिक्रिया असते की , " नाही ! असे नाही . आमच्या टिचरने असे सांगितले आहे आणि तेच बरोबर आहे .आमच्या टीचर अशा !! .. आमच्या टीचर तशा !!  एकुणात काय तर  आमच्या टीचर म्हणजेच योग्य सत्य बरोबर आणि आदर्श  ...  "   हि केवळ एक प्रातिनिधिक भावना झाली . सर्वच विद्यार्थ्यांची आणि त्यातही खासकरून जडखडणीच्या वयातील  १०० टक्के  विद्यार्थ्यांची शिक्षकांप्रती हीच भावना असते .

शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी दैवत असते आणि भक्ताचा जसा देवावर विश्वास असतो तद्वतच विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास असतो . शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी दैवत असते आणि भक्ताचा जसा देवावर विश्वास असतो तद्वतच विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास असतो .

     शिक्षकाच्या केवळ अध्यापनाचाच विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर प्रभाव नसतो तर शिक्षकाच्या वर्गातील वागण्या -बोलण्याच्या वेशभूषा आणि एकुणातच सर्वच वर्तवणुकीचा विद्यार्थ्यांवर प्रभाव होत असतो . एवढेच कशाला तर शिक्षकाच्या सामाजिक वर्तनाचा देखील यात सिंहाचा वाटा असतो आणि ग्रामीण भागात याची  मोठ्या प्रमाणात प्रचिती येते .   एका शिक्षकाच्या कार्यकाळात त्या शिक्षकाच्या हाताखालून किमान दोन पिढ्या जातात . आजचे विद्यार्थी हेच उद्याचे नागरीक असतात या न्यायाने नागरीकांची जडघडण  ,समाजाची जडणघडण आणि पर्यायाने राष्ट्राची जडघडणीचे खरे शिल्पकार हे शिक्षकच असतात .




सुवर्ण भूतकाळ , अस्वस्थ वर्तमान :

               स्थित्यंतर हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यास कोणीही अपवाद असत नाही . साधारणपणे १५-२० वर्षांपर्यंत म्हणजे डिजिटल क्रांतीचा प्रसार  होण्यापूर्वी शिक्षक  संपूर्ण गावासाठी  कॉऊन्सलर , मार्गदर्शक , तारणहार , हिशोबनीस ,  संकटमोचक आणि फॅमिली मेंबर असे . माझे बालपण आणि शिक्षण खेड्यात झालेले असल्यामुळे याची प्रचिती अनेकवेळा आलेली आहे . घर -जमीन खरेदीचा निर्णय असो , लग्न जुळवण्याचा निर्णय असो , घर -समाजातील कलह असो अशा जन्मापासून ते मरणापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगी शिक्षकांची भूमिका महत्वाची असे . 'गुरुजी ' सांगितलं तो अंतिम निर्णय असा तो काळ होता . राजकारणी देखील गुरुजींच्या घराचा उंबरठा ओलांडत असत . असा तो सुवर्णकाळ होता .

        गेल्या  दशकांत सर्वच व्यवस्थांच्या पुलाखालून पाणी वाहिले आहे . काही ठिकाणी ते गढूळ झाले आहे . शिक्षण व्यवस्था , शिक्षण व्यवस्थेचा कणा असणारा शिक्षक आणि समाज देखील त्यास अपवाद असू शकत नाही . गुरुजी ते सर (मास्तर !) हे  शिक्षकाच्या बाबतीतील मोठे स्थित्यंतर . शिक्षकांचा अंगरखा घालून निश्चिम सेवेचे व्रत घेत ज्ञानार्जन करणारी पिठी रिटायर होत गेलीत्यांची जागा मॉडर्न शिक्षकांनी घेतली . जागतिकीकरण , आर्थिक क्रांती याचे वारे जसे जसे ग्रामीण भागात पोहचू लागलेहातात मिळणाऱ्या पगारावरचे 'शून्य ' वाढू लागले  तसे तसे गावात राहून गावाच्या ड्रायवर सीटवर असणारे गुरुजी काळाच्या ओघात ;अडचणींचा ' गाव सोडून 'सुविधांनी परिपूर्ण ' अशा तालुक्याच्या -जिल्ह्याच्या गावी राहण्यासाठी  गेले . येथूनच गुरुजींची समाजाशी असणारी नाळ तुटत गेली . सवड मिळेल त्याप्रमाणे शाळेवर येणाऱ्या शिक्षकांनी  वर्गाच्या  भिंती बाहेरील  विश्वासी फारकत घेण्यात धन्यता मानल्यामुळे समाज आणि शिक्षक यांच्या मध्ये भिंत उभी राहिली . समाजशिक्षक नात्यातील ओलावा काळाच्या ओघात उडून गेल्यामुळे त्यांच्यात केवळ आणि केवळ व्यावहारिक नाते निर्माण झाले .


             समाज आणि शिक्षकांतील नात्याची वीण विसविशीत होण्यामागे अर्थातच  समाज आणि  गेल्या  दशकातील सामाजिक -राजकीय -सांस्कृतिक -आर्थिक स्थित्यंतरे कारणीभूत जबाबदार आहे . शिक्षणाचे वारे जसे जसे घरोघरी पोहचले तसे तसे खेड्यातील कर्ताधर्ता स्वतःस 'शहाणा -सवरतासमजू लागला , त्यास कोणाच्या मार्गदर्शनाची गरज उरली नाही . दरम्यानच्या काळात शिक्षणाचे खाजगीकरण झाले . गावोगावी खाजगी  शैक्षणिक संस्था  उघडल्या '. त्यात ज्ञानार्जनसाठी 'प्रवेश'  मिळवण्यासाठी भावी शिक्षकांना ''किंमतमोजण्याचा 'प्रगत काळ ' सुरु झाला . प्रत्यक्ष कागदावरील पगारांपेक्षा कमी पगार देणे हा आपला 'घटनादत्त ' अधिकार असल्याची धारणा फ्लेक्सवरील शिक्षण महर्षींची झाल्यामुळे शिक्षक स्वतःच 'अन्यायग्रस्त ' होऊ लागला . " कालाय तस्मै नम: " या न्यायानुसार शिक्षकांची भूमिका बदलत गेली . समाज मार्गदर्शकाचा सदरा खुंटीला टांगून शिक्षकांनी संस्थाचालकांच्या 'राजकीय कार्यकर्त्याचा ड्रेस ' स्वीकारला . समाजातील त्याच्या आदराच्या स्थानास ओहोटी लागू लागली .   जो शिक्षक स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडू शकत नाही त्याच्या कडून समाजास न्याय देण्याची अपेक्षा हे  दिवास्वप्न भासू लागल्यामुळे तर 'शिक्षक आणि समाज  नात्याचा '  वर्तमान काळवंडला गेला .


समाज -शिक्षक : परस्परांचे प्रतिबिंबच :

                     शिक्षक हा घटक समाजातूनच येत असल्यामुळे समाज आणि शिक्षक हे सर्वच दृष्टीने एकमेकांचे प्रतिबिंब असतात . मग तो काळ पूर्वीचा असेल , आत्ताचा असेल की पुढचा असेल , कुठलाच काळ अपवाद असत नाही .
            म्हणूनच वर्तमानातील शिक्षकांच्या नैतिक,सांस्कृतिक  अधःपतनास समाज देखील शंभर टक्के जबाबदार आहे . असे असले तरी शिक्षक हा बुद्धिजीवी घटक मानला जात असल्यामुळे त्याची जबाबदारी अधिकची ठरते आणि त्यामुळेच समाजातील विविध घटक त्यांना  बोल लावताना दिसतात . आजही बहुतांश शिक्षक हे आपली जबाबदारी अतिशय 'नेटाने ' पार पाडताना दिसतात . सरकारी शाळांतील अनेक शिक्षक -शिक्षिकांनी आपल्या कृतीतून ते सिद्ध केले आहे .

          दुर्दैवाने अधिकाधिक शिक्षकीपेशातील वर्ग हा व्यसनाधीनताकडे वळल्यामुळे , अनेक शिक्षकांचा जुगार -बलात्कार यासम गैरकृत्यात सहभागाची निष्पत्ती , ज्यांच्यावर कळ्या जपण्याची नैतिक जबाबदारी आहे अशा पालकत्व समान शिक्षकांनी कळ्या घुडण्याचे कृत्य यामुळे शिक्षकी पेशाच्या 'पवित्रेवर ' कलंक लागला जात आहे . होय ! पुन्हा तेच म्हणावे लागेल की , समाज आणि शिक्षक हे परस्परांचे प्रतिबिंब असल्यामुळे शिक्षकीपेशावर निर्माण झालेल्या 'प्रश्नचिन्हा वर्तमानातील सामाजिक नैतिक -सांस्कृतिक अध:पतनाचा सिंहाचा वाटा आहे हे नमूद करावे लागेल .

शिक्षक 'गूगलस्मार्ट हवेत पूर्वीच्या काळी कुठल्याही समस्या /प्रश्नाचे उत्तर म्हणजे गुरुजी हा नागरीकांची धारणा होती . आजच्या काळात मोठ्या प्रमाणात ती गरज 'गूगल ' च्या माध्यमातून पूर्ण केली जाते . प्रत्येक व्यक्तीला गूगल करणे शक्य नसते , त्यामुळे शिक्षकांनी गूगल स्मार्ट असायला हवे म्हणजे त्यांनी सातत्याने ज्ञानाच्या बाबतीत अद्यावत असायला हवे . ज्ञानी व्यक्तीला समाजात सर्वोच्च स्थान असते आणि म्हणूनच जनतेच्या मनात पूर्वीचे आदराचे स्थान पुनर्स्थापित करण्यासाठी शिक्षकांनी गूगल स्मार्ट असणे अत्यंत आवश्यक दिसते .

दृष्टिक्षेपातील उपाय :
·         शिक्षकांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांच्या जडघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावत असल्यामुळे शिक्षकांचे वर्तन हे अत्यंत आदर्शवादी असणे काळाची गरज आहे .
·         विद्यार्थ्यांना ओरडायचे नाही , मारायचे नाही यासम नियमांमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात दुरावा होत असल्यामुळे शिक्षकांवरील अनावश्यक निर्बंध उठवायला हवे.
·         एक अपात्र शिक्षक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह हे ध्यानात घेत , शिक्षक अधिक मॅच्युर्ड असण्यासाठी शिक्षकांसाठीची किमान पात्रता पदवीची असावी .
·         शिक्षक आणि समाज यांच्या नात्यातील शिवण अधिक घट्ट होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्याच ठिकाणी निवासास असणे अनिवार्य असावे .
·            विद्यार्थ्यांच्या मनातील  शिक्षक प्रतिमाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासमोर शिक्षकांविषयी अपशब्द वापरणे कटाक्षाने  टाळावेत
·            शिक्षकांचे वर्तन हा समाजाचा आरसा असल्यामुळे शिक्षकांनी अपकृत्य -व्यसने यासम गोष्टींपासून चार हात दूर रहायला हवे .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , ९८६९ २२ ६२ ७२ danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा