बुधवार, १ मार्च, २०१७

परीक्षांचे शिवधनुष्य पेलताना पालकांची भूमिका संतुलित हवीय !!!



प्रसंग:  वर्षा ! काय म्हणतेस तुझी मुलगी आता नववीला ना ? मग आता पुढचे २ वर्ष तर बघायलाच नकोत . लग्न कार्य , भटकंती बरोबरच तू आता घरच्या टीव्हीला देखील सुट्टी दे बाई ! तुझी आता खरी 'परीक्षा ' आहे ... इति वर्षाचे सर्व हितचिंतक .

प्रसंग २ : " साहेब ! पुढच्या महिन्यात माझ्या मुलीची बारावीची परीक्षा आहे , त्यामुळे मला किमान ४५ दिवसांची सुट्टी द्या " अभय विनवणीच्या सुरात साहेबाला साकडे घालतो आहे . त्याचे स्पष्ट मत आहे . हि परीक्षा केवळ मुलीची नसून माझ्या प्रतिष्टेची आहे , कारण मुलीला डॉक्टर बनवणे हे माझे स्वप्न आहे. 

प्रसंग :  " तुला चांगल्या शाळेत अँडमिशन देतो , पाहिजे तो क्लास लाव , पाहिजे तेवढा पैसे ओततो " ; आमच्याकडे वेळ नाही आम्हाला फक्त चांगला रिझल्ट पाहिजे .

प्रसंग : आम्हाला काय बी कळत नाही बघ , तू आणि तुझे नशीब . शिकाल तर मोठा होशील

        सूर्याचे उत्तरायण सुरु झाले की ग्रीष्माच्या आगमनाची  चाहूल लागते . उष्णतेच्या झळा निसर्गाला आणि त्यातील प्राणिमात्रांना बसू लागतात . याच काळात परीक्षांची चाहूल लागते विद्यार्थांना आणि त्याच्या पालकांना. परीक्षांच्या झळा घराघरात जाणवू लागतात . वरील प्रातिनिधिक प्रसंग याचीच साक्ष देतात . अपवादत्मक ठिकाणी मात्र याचे सोयरसुतकही नसते . अगदी टोकाची भूमिका . दोन्हीही हानिकारकच . गरज आहे तो सुवर्णमध्य साधण्याची.

   परीक्षा पाल्याची आहे आणि ती त्यालाच द्यायची आहे , आपण केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतो हे ध्यानात घेतले की ,आपसूकच “ पालकांची परीक्षा ” हि जी धारणा वर्तमानात अधिक घट्ट होत चालली आहे त्याला पायबंद बसेन आणि घराघरात अनावश्यक तयार होणाऱ्या ताणतणावाला पूर्णविराम मिळेल .

उज्वल भविष्यासाठी वर्तमानावर घाला :

    प्रश्न -समस्या निवाराणकर्तेच जर समस्यानिर्माते झाले तर ती समस्या -प्रश्न अधिकच जटील बनतो. पाल्यांच्या शैक्षणिक करियरच्या बाबतीत हे अधिक ठळकपणे जाणवते . पाल्याची गुणपत्रिका म्हणजेच त्याचे आणि पर्यायाने आपले-कुटूंबाचे भविष्य , पाल्याची गुणपत्रिका म्हणजे सामाजिक प्रतिष्टेचे प्रमाणपत्र  असा (गैर)समज गेल्या काही दशकात रूढ झाल्यामूळे करियरच्या पदपथावरील मैलाचे दगड समजल्या जाणाऱ्या दहावी -बारावीच्या परीक्षा म्हणजे पाल्याच्या आयुष्याची अंतिम परीक्षा अशा प्रकारे पाहिले जात आहे . बोर्डाच्या परीक्षा आणि नीट सारखी प्रवेशपरीक्षा म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न असा समज दृढ झाल्यामुळे पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीतील हि ३ वर्षे सन्मामणीय अपवाद वगळता बहुतांश कुटुंबात "शारीरिक-मानसिक ताणतणाव  "निर्माण करत आहेत आणि सामाजिक दृष्टीने हा चिंतेचा विषय बनतो आहे .


     मग पालकांचा प्रतिप्रश्न असेन की , 'आम्ही अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का ? स्वप्ने पहावयाची नाहीत का ?" . होय ! नक्कीच तो तुमचा अधिकार आहे . परंतू हे करत असताना लक्षात घेणे महत्वाचे आहे की , प्रत्येक पाल्य हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते , प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता असते. आपले पाल्य म्हणजे आपल्या पूर्ण न झालेल्या स्वप्नपूर्तीचे "साधन" आहे या दृष्टिकोनातून बहुतांश पालकांचे वर्तन घडत असल्यामुळे  पाल्याच्या  'वर्तमानावरच  ' घाला घातला जात आहे . हे टाळत करियर घडवल्यास प्राधान्य दिल्यास ते पाल्य आणि पालक दोघांच्याही हिताचे ठरते .

स्माईल मोर -स्कोर मोर

     मा . मोदीजींनी मन की बात या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना हा संदेश दिला आहे . याचा अंगीकार प्रत्येक कुटुंबाने केल्यास ' परीक्षा म्हणजे शिक्षा ' या नकारात्मक भूमिकेतून सहजपणे बाहेर पडता येईल . मुळात सर्वात आधी परीक्षा म्हणजे काय ? हे समजून घ्यायला हवे . परीक्षा म्हणजे संपूर्ण वर्षात आत्मसात केलेले ज्ञान  (खरे तर' माहिती ' म्हटले तर जास्त बरोबर ठरेन ) प्रकट करण्याची संधी आणि प्राप्त गुण म्हणजे तुम्ही आत्मसात केलेल्या कौशल्यावर शिक्कामोर्तब . हि परीक्षा असते ती त्या वर्षाला असणाऱ्या अभ्यासक्रमावर . पंरतू आपण मात्र परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्यातील अंतिम लढाई असे स्वरूप देतो . आणि पर्यायाने पाल्याच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील हास्यच गायब होते . मानसिक तणावात व्यक्तीचा परफॉर्मन्स ढासळतो हा निसर्ग नियम. त्यामुळेच प्रत्येक पालकांनी घरातील वातावरण हलके -फुलके , आनंददायी राहील याची काळजी घेतली पाहिजे . 'निकाल' नक्कीच बदलेल हे नक्की .



       स्माईल मोर -स्कोर मोर च्या तंत्र आत्मसात करण्यासाठी पुस्तका बाहेर देखील जग आहे त्याचा आस्वाद मुलांना घेऊ द्या . पालकांनी देखील आपली मुले आणि त्यांची शैक्षणिक प्रगती हेच आपल्या आयुष्याचे अंतिम फलित आहे या टोकाच्या भूमिकेतून बाहेर पडत जीवनाचा आस्वाद घेण्याची सवय अंगी बनवायला हवी .

अपेक्षांचे ओझे टाळायला हवे
   नो डाऊट! वर्तमान शिक्षण पद्धती , परीक्षा पद्धती देखील पालकांच्या तणावास कारणीभूत आहेत . 'तीन तासाची परीक्षा म्हणजेच शिक्षण ' या शिक्षण पद्धतीमुळे परीक्षांना आणि त्यातील गुणांना अवास्तव महत्व आले आहे . हे बदलेल तेंव्हा बदलेल . पालक म्हणून बदलणे तर आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे .पालकांनी अपेक्षीत बदल अभिप्रेत आहे तो म्हणजे ' अपेक्षा ठेवायच्या , परंतु त्या अपेक्षा ओझ्यात रुपांतरीत होणार नाहीत याची फक्त काळजी घ्यायची' आपल्या पाल्याची शारीरिक -बौद्धिक क्षमता ओळखत वास्तववादी अपेक्षा ठेवायला हव्यात .

   प्रत्येक क्रिकेट घेळणाऱ्या मुलाच्या पालकाची अपेक्षा हि मुलाने सचिन तेंडुलकर बनावे , प्रत्येक बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलीच्या पालकाला आपली मुलगी पी व्ही सिंधू  बनावी हि अपेक्षा असते . वास्तवात मात्र एकच सचिन असतो , एकच पी व्ही सिंधू  असते . आपला पाल्य उत्तमात उत्तम  होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यकच ठरतात . परंतु ते करताना , " आम्ही तुला सर्वात चांगल्या शाळेत घातले , महागडा क्लास लावला , टीव्ही -नातेवाईकांचे कार्यक्रमाचा त्याग केला म्हणून तुला चांगले मार्क्स मिळायलाच हवेत असा सतत पाढा वाचू नये .

          मुलांच्या मनावर परीक्षा म्हणजे शिक्षा असा समज कोरू पाहणारे पालक मुलांना मदत नाही, तर त्यांचा घात करत असतात. त्यापेक्षा त्यांची या काळातली प्रत्येक कृती, उक्ती जर मुलांना समजून घेणारी, त्यांच्या कलानं घेऊन मुलांना त्यांचा अवकाश देणारी असेल, त्यांना सहकार्य करणारी असेल तर मुलांमध्येही बळ येतं.

 
सुवर्णमध्य साधावा :

             पाल्याच्या जडणघडणीत परीक्षांची भूमिका मोलाची आहेच त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायलाच हवे परंतु परीक्षा म्हणजेच सर्वस्व अशी टोकाची भूमिका ना घेता शैक्षणिक विकासाबरोबरच पाल्याचा 'शारीरिक -मानसिक -मूल्याच्या पातळीवर सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास ' यास देखील समान महत्व देत सुवर्णमध्य साधावा .

            ऐन शारीरिक विकासाच्या वेळीच सर्व खेळ , व्यायाम   मनोरंजन यावर निर्बंध आणल्यामुळे भविष्यातील जीवनाची खरी परीक्षा देण्यासाठी आवश्यक व्यक्तिमत्व विकासाला जे की प्रत्येक पालकाचे स्वप्न असते त्यालाच अनावधानाने बाधा आणतो आहोत हे देखील पालकांच्या ध्यानात येत नाही .

         पाल्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांनी आवश्यक सुविधा द्याव्यात , मार्गदर्शन करावे परंतू प्रत्येक गोष्टीतील सक्रिय सहभागटाळावा . मुलांचा होमवर्क स्वतः लिहिणाऱ्या पालकांनी विचार करावा , आपण मदत करतो आहोत की फसवणूक करत आहोत यावर आत्मचिंतन करावे .
यशस्वी जीवनासाठी स्पर्धा स्वतःशीच असावी :
           अन्याशी स्पर्धा निराशा ,ईर्षा ,हतबलता आणि पराजयाची भावनेला जन्म देते .हे  प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरतो . पेक्षा स्पर्धा स्वतःशीस केल्यास आपल्या उणिवा ,आपल्यातील सकारात्मक गोष्टी -क्षमता कळतात . आपल्या क्षमतांची कसोटी लावण्याची जिद्द त्यांच्यात आपोआप उतरते.

     आपल्या पाल्याची क्षमता ओळखून अपेक्षा ठेवल्यास , विद्यार्थ्यांवरील अपेक्षांचे ओझे टाळले जाऊ शकते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'अपेक्षाभंगांचे दुःख ' टाळले जाऊ शकते . पालक -पाल्य आणि संपूर्ण कुटुंबाच्या हे हिताचे आहे .

    परीक्षेचा निकाल आपल्या मुलांच्या कुवतीनुसारच लागणार आहे आणि तो जर आपण मनमोकळेपणानं स्वीकारू शकलो, तर मुलंही भविष्यात प्रत्येक परीक्षेला हसत-खेळत सामोरी जातील, प्रत्येक निकालाला खिलाडूवृत्तीनं स्वीकारतील. प्रत्येक जण काही टॉपला जाऊ शकत नाही. पण प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकतात आणि त्याची तयारी करण्याची संधी आपल्या मुलांना परीक्षा देत असते.

हे करा :
·         ' तू हे नक्की करू शकतो , तुला नक्की यश मिळेल ' असा दृष्टिकोन ठेवत वातावरण नेहमी सकारात्मक ठेवावे .

·         उत्तम यशाच्या खात्रीसाठी मुलांना प्रत्येक  विषय समजून घेण्याचा आग्रह करा. शाळा -क्लास मध्ये केवळ गाढव मेहनत करण्यात वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी  स्मार्ट मेहनतीस प्राधान्य द्यावे .
·         अवास्तव अपेक्षा ठेवू नका . पाल्याच्या क्षमतेनुसारच अपेक्षा ठेवा . पालकांनी आपले स्वतःचे मार्कशीट्स पुन्हा पुन्हा पाजिले तर हे करणे सोपे जाईल
·         तणावरहीत मनस्वास्थ्य राहण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तरी छंद जोपासू द्या .
·         पुस्तकाबाहेरील जगात देखील आपले पाल्य यशस्वी होण्यासाठी 'सर्वागीण विकासास ' प्राधान्य द्या .
·         शारीरिक तंदुरुस्तीसाठी नेहमी घरचे अन्न पाल्यास द्यावे . बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे.
·         मनोरंजन पूर्णपणे बंद करू नये . त्यावर मर्यादा ठेवावी .
·         आनंदी मानाने कृती केल्यास यशाची शक्यता अधिक वाढते त्यामुळे परीक्षा एक शैक्षणिक उत्सव आहे अशा रीतीने परीक्षेकडे पाहावे . परीक्षांचा बाऊ करणे टाळा.
·         ज्या ज्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून अपेक्षिल्या जातात ,ते ते प्रथम स्वतः आत्मसात कार्याला हवे  कारण कृतिशील उपदेश अधिक प्रभावी ठरतो .
·         ऐन परीक्षेच्या काळात वारंवार  मुलांशी अपेक्षित निकालावर, पुढील कोर्सच्या प्रवेशावर बोलू नये. निकालाचं मुलांवर दडपण येण्याची शक्यता असते.
·         प्रत्येकासाठी 'स्व ' महत्वाचे असते म्हणून प्रत्येक चांगल्या कृतीसाठी 'A ' चे (Approval, Appreciation, Acceptance) अनुपालन करावे .
·         पेपर देऊन आल्यावर मुलांना त्या विषयाच्या पेपरच्या ताणातून मोकळं होऊ द्यावं.
हे टाळा :
·         अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचा वर्तमान -बालपण कोमेजून टाकू नका .
·         सततचे टोमणे ,टीकाटिपण्णी टाळा . याचा फायदा होण्यापेक्षा पाल्याच्या मनात पालकांविषयीची नकारात्मक प्रतिमा होण्याचा धोका संभवतो.
·         टोकाचा हस्तक्षेप किंवा  टोकाचा दुर्लक्ष -निष्काळजीपणा टाळा .
·         अन्य भाऊ -बहीण वा मित्रांशी सतत तुलना टाळा.

सर्व परीक्षार्थीना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा


                                                  सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,
                                                     भ्र .९८६९ २२६२७२
                                               danisudhir@gmail.com