अतिशय जटील रोगावर रामबाण उपाय
असणारे औषध ' योग्य
' मात्रेत घेतले तर ते लाभदायी ठरते, या उलट त्याच औषधाची मात्रा
प्रमाणाबाहेर झाली तर ते औषध लाभदायक ठरण्याऐवजी हानिकारक ठरते .
गर्भातील बाळाचे शारीरिक व्यंग
तपासण्यासाठी सोनोग्राफी हे तंत्रज्ञान मानवाला वरदानच म्हणावे लागेल कारण
भविष्यात आयुष्यभर आपल्या पोटच्या गोळ्याचे कुठल्याही प्रकारच्या शारीरिक व्यंगामुळे होणारी ससेहोलपट आणि
पालकांची मानसिक कुचंबणा यातून टाळता येऊ शकते .
…. पण
त्याचा दुरुपयोग करणारी मानवी वृत्ती मात्र जन्माला येण्यापूर्वीच लाखो कळ्या खुडत
त्याच तंत्रज्ञानाला 'राक्षसी ' स्वरूप देते . (हा लेख लिहीत असताना उघडकीला
मिरज -सांगली येथील म्हैसाळ गर्भपात रॅकेट हेच अधोरेखीत करते ) मग प्रश्न हा आहे की , दोष तंत्रज्ञानाचा की त्याचा गैरवापर
करणाऱ्याचा ? अर्थातच
एकमात्र याचे उत्तर असणार ते म्हणजे ' वापरकर्त्याच्या दृष्टिकोनाचा '.
असो ! नमनाला घडाभर तेल
जाळण्यापेक्षा मूळ विषयावर येऊ यात . परिपूर्ण पालकत्वासाठी सातत्याने मार्गदर्शन
करणाऱ्या 'तुम्ही
-आम्ही पालक ' अंकाचा
याखेपेचा विषय आहे तो म्हणजे 'समाज माध्यम (सोशल मीडिया ) आणि पालकत्व '.
“Communication is the life line of any
relationship, when you stop
communicating you start losing your relationship ” यावरून ' संवादा ' ला मानवी
जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे कारण तोच मानवी नात्यातील जीवनवाहिनी आहे हे दिसते.
काळ बदलला तशी संवादाची परिभाषा बदलली . संवादाचे माध्यम बदलले . कबुतरांचा वापर
ते क्षणाचाही विलंब न लागता जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर संवाद साधण्याची
किमया लीलया पार पाडत , संपूर्ण विश्वच बोटाच्या अग्रभागावर आणणारे आजचे
तंत्रज्ञान. या क्रांतीतून उद्दयास आलेले
समाजमाध्य म्हणजेच सोशल मीडिया .
सोशल
मीडिया म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असणारा, विविध
व्यक्तींशी संपर्क साधू देणारा व ते जपू देणारा मंच. व्हॉटस् अॅप, फेसबुक,
हाईक, टेलिग्राम,
इन्स्टाग्राम, ब्लॉग्स ,
हँगआऊटस्, मेसेंजर,
जी टॉक आदी सोशल मीडियाची माध्यमे . शालेय विद्यार्थी असोत की वृद्ध ,बहुतांश
जणांचा सोशल मीडिया अविभाज्य भाग झाला आहे .
पाल्याच्या
शैक्षणिक प्रगतीच्या नावाने ....
बहुतांश घरात लॅपटॉप , इंटरनेट
कनेक्शनचा शिरकाव होतो तो शैक्षणिक प्रगतीस पूरक या उद्देशाने . शाळा -कॉलेजसाठी
लांब असल्यामुळे पाल्याशी 'टच'मध्ये राहण्यासाठी 'स्मार्टफोन' घेतली आणि
घेऊन दिली जातात . उद्देश स्तुत्यच . निश्चितपणे इंटरनेट आणि सोशल मीडिया या
विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरू शकतात . कारण कुठलीही माहिती , कुठल्याही
शंकेचे निरसन या माध्यमातून करणे सहजसोपे आहे . अगदी अडचणीच्या वेळी थेट आपल्या
शिक्षक -प्राध्यापकांना आपला 'प्रॉब्लेम ' पाठवून क्षणार्धात त्यावर 'सोल्युशन ' प्राप्त
केले जाऊ शकते . पण असा 'सोल्युशन ' ओरिएन्टेड उपयोग किती 'पर्सेंटेज'मध्ये
होतो हा खरा संशोधनाचा विषय आहे.
आवश्यक कामासाठी 'ऑनलाईन ' संपर्क
यंत्रणा हि काळाची गरज आहे हे मान्यच करायला हवे ..... पण हळू हळू या माध्यमांचा 'आवश्यक ' वापर मागे
पडत जातो आणि जसे जसे आभासी जगाच्या जाळ्यात ओढले जाईल तसा तसा 'अनावश्यक ' वापर कळस
गाठत जातो . पालक -पाल्य आभासी जगाच्या बर्मुडा ट्रँगल मध्ये अडकली गेल्यामुळे
दोघांचाही अभिमन्यू होतो आणि त्यामुळे कोणी कोणास चक्रव्युहाबाहेर काढावयाचे हा
यक्षप्रश्न निर्माण झाला आहे . यामुळेच ' ती असो की
ती' आपल्या
पाल्याला 'सोशल मीडियाचा ' सुयोग्य
वापर करण्यासाठी योग्य प्रकारे घडवणे हा वर्तमान काळातील पालकत्वाच्या कसोटीचा भाग
झाला आहे . या कसोटीस पात्र होण्यासाठी पालकांनी सर्वप्रथम सोशल मिडीयाच्या बाबतीत
अधिक सजग , अधिक
सुजाण , अधिक
साक्षर , अधिक
संवेदनशील आणि अधिक जबाबदार होणे क्रमप्राप्त आहे .
डोळस
-कृतियुक्त पालकत्व काळाची गरज :
अनुकरण करण्याऐवजी अंधानुकरण होत
गेल्यामुळे सोशल मीडियावरील विश्व हे ' आभासी विश्व' आहे
याचाच विसर वापरकर्त्यांना पडलेला दिसतो .घरातल्या प्रत्येकाने आपले सोशल मीडियावर
स्वतंत्र विश्व निर्माण केले आणि त्यालाच सर्वस्व मानले .परिणाम असा झाला की , ज्या सोशल
मीडियामुळे जग जवळ आले असे सांगितले गेले त्याच्याच 'गांधारी ' वापरामुळे
जग सोडा कुटुंबातील सदस्य एकत्र येण्याऐवजी दूर गेली . कटू असले तरी हेच वास्तव
आहे . सोशल मीडियाच्या सतत 'टच ' मध्ये असणारे सदस्य एकमेकांच्या 'टच'मधील
टच मात्र विसरले गेले .
आपल्या मुलामुलींनी धकाधकीच्या जीवनात केवळ 'विरंगुळा
' म्हणून सोशल मीडियाचा वापर करावा हा 'सल्ला
' देणाऱ्या सर्व पालकांनी हा 'सल्ला
' सर्वप्रथम स्वतः अंगीकारणे अत्यंत -अत्यंत गरजेचे आहे .
कृतियुक्त सल्ला अधिक परिणामकारक ठरतो त्यामुळे प्रत्येक पालकाने आपण सोशल
मीडियाचा वापर कशासाठी करतोय , किती वेळ
करतोय , कोणासाठी करतोय याचे 'डोळस
-प्रामाणिक ' आत्मपरीक्षण करायला हवे . विरंगुळा
ते वेड यातील लक्ष्मण रेषा ओलांडली जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
माध्यम
साक्षर युवा :काळाची गरज
संशोधनानुसार आपल्या देशातील जवळपास ७२ टक्के
शालेय तर ७८ टक्के महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी वर्ग सोशल मीडियावर सक्रिय
असतो . टीव्ही आणि सोशल मीडियावर अनुक्रमे २ /३ तास प्रतिदिन वेळ घालवतात .आपला
देश युवा वर्गात मोडतो हे ध्यानात घेता युवा वर्गाने 'माध्यम
साक्षर 'असणे
अतिशय गरजेचे आहे . साक्षरता म्हणजे डोळस दृष्टिकोन आणि डोळस वापर . किती युवा
वर्ग समाज माध्यमाचा उपयोग त्याच्या विद्यार्थी जडघडणीसाठी आवश्यक शैक्षणिक
गोष्टीसाठी करतो ?
सृजनात्मक गोष्टींसाठी करतो ? यासम सर्व प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच
दिसतात .
उलटपक्षी स्वतःला , पर्यायाने
समाजाला -राष्ट्राला 'घडविण्यासाठी ' अगदी नगण्य तर 'बिघडवण्यासाठी' समाज
माध्यमाचा उपयोग विद्यार्थी दशेतील युवकांकडून होताना दिसतो आहे . अपवाद असतील ते
अगदी अल्प . बोर्डाच्या परीक्षेचा पेपर फोडण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करणारा
युवा सोशल मीडियाच्या वापराबाबत खरंच साक्षर आहे का ? हा प्रश्न
यासम 'नकारात्मक' वापरामुळेच
निर्माण झाला आहे . स्कायवॉक-गार्डन्स -रेल्वेस्टेशनवर अश्लील चित्रफीत पाहणारा
युवा 'साक्षर' गटात मोडू
शकतो का ? विद्यार्थी
दशेतील वाढती प्रेमप्रकरणे ,गर्भपात मारामाऱ्या हेच अधोरेखित करतात
की 'दिशा' देण्याची
ताकद असणाऱ्या माध्यमाचा उपयोग ' दिशा 'हीन होण्यासाठी होत असल्यामुळे युवावर्गात
माध्यम साक्षरता वाढवण्यासाठी मार्गदर्शन -प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्याची अधिक
गरज दिसते .
असो !
एकुणातच पालक असो वा पाल्य सोशल मीडियाच्या 'सेल्फी ' वापरामुळे आपण जीवनातील निखळ आनंद घ्यायला
विसरताना दिसतोय . जन्मापासून ते मरणापर्यतचा कुठलाही उत्सवाचा प्रसंग असो आपण तो
स्वतः 'जगण्यापेक्षा
' तो
क्षण -प्रसंग 'उपलोड
' करण्याच्या
मोहापायी केवळ 'साजरे
' करत
आहोत . सारे काही कोरडे -कोरडे . ना भावनेचा ओलावा , ना आपुलकीचा भाव . केवळ व्यवहार .
Problem of Plenty या अर्थाचा वाकप्रचार आहे, म्हणजे सुबत्तेचा परीणाम . जग जवळ
आणणाऱ्या संवाद साधनांची सुबत्तता आहे पण वास्तवात मात्र जग सोडा , कुटुंब
-कुटूंबातील नाती अगदी पालक -पाल्यामधील दुरावा वाढलेला दिसतो . अगदी सुरुवातीला
नमूद केल्याप्रमाणे केवळ दोष समाजमाध्यमांना देऊन आपली सुटका होऊ शकत नाही . पालक
असो की पाल्य , पती
असो की पत्नी , आपण सर्वानीच सोशल मीडियाच्या
वापरबाबत आत्मपरीक्षण करणे अत्यंत निकडीचे आहे . सकारात्मक बदल अशक्य नक्कीच नाही
. फक्त राष्ट्रपिता गांधी म्हणतात त्यानुसार बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी
. बस इतकेच .
सोशल
मीडियाची फायदे :
·
कुठल्याही कारणास्तव दूर राहणाऱ्या
कुटुंबातील सदस्यांना 'जवळ ' असल्याची
अनुभूती देणारे सोपे -सहज उपलब्ध साधन .
·
समविचारी लोकांना विचाराची आदानप्रदान
करण्यासाठीचा मंच .
·
मनुष्याच्या 'सामाजिक
भावनेच्या ' वाढीसाठी
पूरक माध्यम .
·
माहितीचा खजिना .
सोशल
मीडियाची तोटे :
·
अतिवापराच्या व्यसनामुळे एकाग्रतेवर परिणाम
.
·
आभासी जगालाच वास्तव मानल्यामुळे वास्तवातील
खऱ्या जगापासून दूर जाण्याचा धोका .
·
व्हर्चुअल गेमच्या अती पगडयामुळे मैदानी
खेळाचा विसर पडल्यामुळे शारिरीक नुकसान तर हिंसेने ओतप्रत गेम्समुळे मानसिक
विकृतेत वाढ .
·
शालेय पातळीवरील विद्यार्थी सर्वसाधारणपणे
एका वर्षात ८०० तर तर कॉलेजपातळीवरील युवा सरासरी १००० तास सोशल मीडियावर घालवत
असल्यामुळे युवा वर्गाच्या क्रयशक्तीचा अपव्यय, अभ्यासावर
परिणाम.
·
प्रत्येकाने स्वतःला आभासी जगात बंदिस्त केल्यामुळे संवांदाची साधने
वाढली परंतु कुटुंब -नात्यातील संवाद कमी झाला .
·
अयोग्य -अतिवापरामुळे सोशल मीडिया हा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील एक नंबरचा शत्रू झाला आहे .
हे
टाळा :
·
अगदी खाजगी गोष्टी ,वैयक्तिक
गोष्टी समाजमाध्यमवर शेयर करणे टाळावे .
·
ऑनलाईन मैत्री अंधविश्वासाने करणे टाळावे .
·
जाळ्यात ओढणाऱ्या लिंक -जाहिरातींपासून दूरच
रहावे.
·
स्वतः पालकांनीच अतिवापर टाळायला हवा .
सुधीर
लक्ष्मीकांत दाणी