अलीकडच्या काळात खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांमध्ये ' मुनलायटिंग ' कार्यपद्धतीचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे . कोविड काळात सुरु झालेली 'वर्क फ्रॉम होम ' कार्यपद्धतीमुळे आणि कोविड पश्चात देखील अनेक कंपन्यांनी याच कार्यपद्धतीचे अनुसरण सुरु ठेवल्याने अनेक कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाचतो आहे , कामाच्या वेळेत लवचिकता आलेली आहे .
' मुनलायटिंग ' म्हणजे एखाद्या कंपनीत नोकरीस असताना आपल्या कौशल्याचा आणि फावल्या वेळेचा उपयोग करत अन्य प्रकारचा व्यवसाय किंवा अन्य कंपनीत पार्ट टाइम स्वरूपाची नोकरी करणे .
विप्रो सारख्या कंपनीने या कार्यसंस्कृतीस विरोध केलेला आहे . खाजगी क्षेत्रात ' मुनलायटिंग ' हि संकल्पना योग्य की अयोग्य हा वादाचा विषय असला तरी शिक्षण क्षेत्रातील या कार्यपद्धतीचा शिरकाव गैर आणि अनैतिकच ठरत असल्याने त्यावर प्रतिबंध घालणे अत्यंत गरजेचे आहे .
खाजगी कर्मचाऱ्यात आपल्या निहित कामांसह अनेक कामे करण्याची कार्यपद्धती आता रुजू लागलेली असली तरी आपल्या देशात आणि राज्यात शिक्षण क्षेत्रातील शिक्षक -प्राध्यापक मंडळी नोकरी करत अनेक व्यवसाय खूप पूर्वीपासून करताना दिसतात . त्याचे प्रमाण इतके वाढलेले आहे की शिक्षकी -प्राध्यापकी पेशा हा दुय्यम ठरतो आहे . हि मंडळी शिक्षक कमी तर अन्य व्यावसायिक अधिक झालेली दिसतात .
यातील सर्वात घातक प्रकार म्हणजे शिक्षक - प्राध्यापकांनी खाजगी क्लासेस मध्ये शिकवण्याचा प्रकार किंवा स्वतःचेच पत्नी वा अन्य नातेवाईकांच्या नावावर सुरु केलेले खाजगी क्लासेस -घरगुती शिकवणी वर्ग . यासाठीचे हक्काचे गिऱ्हाईक म्हणजे शिक्षक -प्राध्यापक ज्या शाळेत -कॉलेजमध्ये शिकवतात तेथील विद्यार्थी . नवी मुंबईत अशा क्लासेसची भाऊगर्दी असून मुख्याध्यापक -प्राचार्याना हाताशी धरून अगदी शाळा -कॉलेजच्या वेळेत देखील शिक्षक -प्राध्यापक शाळा -कॉलेज मधून बाहेर जात खाजगी क्लासेस मध्ये शिकवत आहेत . जे विद्यार्थी येतील त्यांना परीक्षेतील महत्वाचे प्रश्न आधीच सांगणे , प्रॅक्टिकल मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स देणे अशा प्रकारची आमिषे दाखवली जातात तर दुसरीकडे जे विद्यार्थी क्लासेसला येणार नाहीत त्यांना सापत्न वागणूक द्यायची . अशा प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक गळचेपी होती आहे .ज्या विद्यार्थ्यांचे पालक खाजगी क्लासेसची फीस भरण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत त्या विद्यार्थ्यांची शाळा -कॉलेजात गळचेपी होती आहे .
अनेक शिक्षक -प्राध्यापक हे रियल इस्टेट व्यवसायात , इस्टेट एजेंट व्यवसायात आहेत , गॅरेजपासून ते हॉटेल व्यावसायासारखे त्यांचे अनेक व्यवसाय आहेत . ग्रामीण भागात अनेक शिक्षक -प्राध्यापक हे शाळेच्या वेळेत पत्ते खेळताना , जुगार खेळताना दिसतात . यातून उत्पन्न प्राप्त होत नसले तरी हा देखील वेळेच्या दृष्टीने 'मुलायटिंग' चाच प्रकार ठरतो .
वस्तुतः नोकरीस असणाऱ्या शिक्षक -प्राध्यापकांनी खाजगी क्लासेस मध्ये शिकवू नये , खाजगी ट्युशन्स घेऊ नयेत यासाठीचा नियम आहे परंतू तो सर्रासपणे लाथाडला जातो आहे .
राज्य सरकारला नम्र निवेदन आहे की शिक्षणक्षेत्र हे अत्यंत पवित्र असे क्षेत्र मानले जाते (किमान पालकांची तरी तीच धारणा आहे ) त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील 'मुनलायटिंग ' ला प्रकारांना तातडीने आळा घालण्यासाठीच उपाय योजावेत आणि जे नियम कायदे आहेत त्यांची प्रामाणिकपणे अंमलबाजवणी करावी .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .