मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

कॉपीमुक्त परीक्षांच्या स्वप्नपूर्तीसाठी चिंता , चिंतन आणि समुपदेशन निकडीचे !

 

कॉपीमुक्त परीक्षांच्या स्वप्नपूर्तीसाठी चिंता , चिंतन आणि समुपदेशन निकडीचे !

              मधुरिमात प्रकाशित झालेल्या " कॉपीमुक्त परीक्षेसाठी हवी प्रामाणिक अंमलबजावणी " या लेखाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला . अनेक वाचकांनी कॉपीमुक्त परीक्षा काळाची गरज आहे हे मत व्यक्त केले पण त्याच बरोबर हा खेद देखील व्यक्त केला की  वर्तमानात शैक्षणिक क्षेत्राशी निगडित बहुतांश घटक हे  कॉपीयुक्त परीक्षांचे खंदे समर्थक असल्याने गैरप्रकारांनी मुक्त , कॉपीमुक्त परीक्षा चे स्वप्न तूर्तास तरी दिवास्वप्नच ठरण्याची अधिक शक्यता आहे . यावरील उपाय म्हणजे कॉपी ,गैरप्रकारांच्या माध्यमातून परीक्षा पास करणाऱ्या , परिक्षास अभय देणाऱ्या पालक , शिक्षकांचे व्यापक प्रमाणावर  समुपदेशन करणे .

              अनेक शिक्षकांचे हे देखील म्हणणे होते की  'ग्राउंड वरील परिस्थिती " भयंकर आहे . कॉपीमुक्तीच्या दिशेने पाऊले उचलणाऱ्या शिक्षक -प्राध्यापकांना 'व्हिलन ' समजले जाते , टार्गेट केले जाते . अगदी संस्थाचालकांसमोर उभे करून जाब विचारला जातो , खरडपट्टी काढली जाते , नोकरी करायची असेल तर 'स्वतःचे डोके वापरू नका ' असे 'प्रेमळ ' सल्ले देखील दिले जातात . एवढेच नव्हे तर अनेक विद्यार्थी देखील 'बाहेर या , मग दाखवतो " अशा धमक्या देतात .  या जमिनीवरील वास्तवावर जो पर्यंत प्रहार केला जात नाही , प्रामाणिक शिक्षक -प्राध्यापकांना  अभय देणारी  परिस्थिती निर्माण केली जात नाही तोवर "गैरप्रकारांनी मुक्त परीक्षा या केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ' राहणार हे नक्की .

                आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रात 'टक्केवारीची बाधा ' झालेली असल्यामुळे शिक्षण क्षेत्र देखील त्यास अपवाद नसावे . प्रश्न उच्चांकी निकालाचा नसून त्या निकालाच्या पार्श्वभूमीचा आहे . प्रश्न केवळ निकालाचा नसूनशिक्षणातील सुलभीकरणाकडून अधिक सुलभीकरणाकडेघेऊन जाणाऱ्या प्रशासकीय -राजकीय मानसिकतेचा आहे . कृत्रिम गुणवत्तेचा फुगवटा हि एक प्रकारे विद्यार्थी -पालकांची दिशाभूलच ठरते . प्रत्येक नाण्याला बाजू असतात . निकालातून समोर येणारी गुणवत्ता हि एक बाजू असली तरी दुसरी बाजू  देखील तितकीच महत्वाची आहे आणि त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा हा  एक प्रयत्न .

परीक्षेत पास , करियर मध्ये नापास :

         हा प्रश्न आहे गैरमार्गाच्या माध्यमातून , कॉपीच्या सहाय्याने परीक्षेत पास होणारे विद्यार्थी , त्यांचे पालक आणि या "गैर"मार्गास  साथ देणाऱ्या सर्व शैक्षणिक घटकांना . तो प्रश्न म्हणजे "कॉपी आणि परीक्षेतील गैरप्रकरांच्या माध्यमातून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडतेय की  बिघडतेय ". अर्थातच याचे उत्तर बिघडतंय असेच आहे . यावर तपशीलवार विवेचन पुढे होईलच .  पण एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की  कॉपीच्या शॉर्टकटमुळे शिक्षणातील एक पायरी पार होत असली तरी भविष्यातील करियरच्या शिखराच्या पायऱ्या मात्र दुरापास्त होत असतात . आणि म्हणूनच  योग्य ते ज्ञान प्राप्त करत , योग्य ती कौशल्ये , विषयांतील मूलभूत संकल्पना  प्राप्त करण्याच्या मार्गाचा अवलंब करणे .  या गोष्टी विद्यार्थी -पालक -शिक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी सर्वांचे समुपदेशन नितांत गरजेचे आहे . कॉपी मुक्त परीक्षांची 'चिंता ' करण्याबरोबरच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचे आहे ते 'चिंतन आणि उपाययोजन '. समुपदेशन हा त्यातील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो .

              पदव्या आणि शिक्षण यांचा संबंध जोडल्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे आणि एकंदर समाजाचे खूप नुकसान झालेले आहे . केवळ पदव्यांच्या संपादनाला महत्व प्राप्त होणे हा शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठा दोष म्हणावा लागेल . या दोषामुळेच आज 'सुशिक्षित ' बेरोजगार तरुणांची संख्या चिंताजनक रीतीने वाढलेली आहे . शिक्षित तरुणांकडे पदव्या आहेत पण रोजगार कौशल्ये आणि व्यवहार ज्ञान नाही . त्यामुळेच अनेक तरुण ना नोकरीच्या अग्निपरीक्षेतुन पार पडू शकत आहेत ना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी उद्योग उभारू शकत आहेत.  

           आज ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले तर स्पष्टपणे दिसून येते की  , अनेक युवक गावच्या स्टॅण्डवर , चावडीवर  केवळ आणि केवळ टाईमपास करत असतात . ज्या आई वडिलांनी त्यांना  खस्ता खाऊन शिकवले त्यांच्यासाठी आज तेच विद्यार्थी भार ठरत आहेत . या सुशिक्षित बेरोजगारांना केवळ एकच रोजगार आहे  तो म्हणजे  'व्हाट्सअँप ,फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर ग्रुप मॅनेजर एवढाच एक जॉब आहे .

कॉपीमुक्तीची सवय प्राथमिक पासूनच हवी :

             शिल्पकाराला आपली  अंतिम कलाकृतीचे उद्दिष्ट लक्षात ठेऊन सुरुवातीपासूनच त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे असते . अंतिम  ध्येय गणेशमूर्तीचे पण सुरुवात मात्र हनुमानाच्या  मूर्तीच्या तयारीने असे नाही चालत .   "करायला गेला गणपती आणि झाला मारुती " अशी म्हण असली तरी  बोर्डाच्या परीक्षेत कॉपी मुक्तीच्या घोषणा पण प्राथमिक माध्यमिक स्तरावरील परीक्षेत मात्र कॉपीच्या , गैरप्रकारांकडे पूर्णतः दुर्लक्ष अशा कार्यपद्धती मुळे  ना गणपती ना , ना मारुती अशी अवस्था होते आहे .

         बोर्डाच्या परीक्षेतील कॉपीमुक्तीची ध्येयपूर्ती करावयाची असेल तर अगदी प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांवर तसे संस्कार करणे अत्यंत ,अत्यंत गरजेचे आहे .  परीक्षेच्या  श्रीगणेशापासूनच जर विद्यार्थ्यांवर कॉपीमुक्त परीक्षेचे संस्कार केले तर आणि तरच कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांचे स्वप्न सुलभ आणि व्यवहार्य ठरू शकते .

सदोष परीक्षा पद्धतीत सुधारणा आवश्यक :

        रोगाचे निदान आणि निवारण करायचे असेल तर रोगाच्या  सर्वच बाजूंचा विचार करणे क्रमप्राप्त असते . निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी , विद्यार्थ्यांवर दहावी /बारावीचा  शिक्का मारण्यासाठी केवळ परीक्षेतील गैरप्रकारांना अभय दिले जाते , दुर्लक्ष केले जाते असे नाही तर सदोष परीक्षा पद्धतीकडे देखील गेली अनेक वर्षे दुर्लक्ष केले जाते आहे . एवढेच नव्हे तर  "सोप्या कडून अधिक सोप्याकडे " अशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षांची वाटचाल सुरु आहे . विद्यार्थ्यांच्या करियरची  'वाट ' लागण्यास सदोष परीक्षा पद्धत देखील तितकीच कारणीभूत आहे .

    पात्र असोत की नसोत , विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गासाठी अभिप्रेत ज्ञान , मूलभूत कौशल्ये प्राप्त होवोत अथवा न होवोत ते पास आणि पासच झाले पाहिजेत अशी बोर्डाची परीक्षा पद्धती आहे  . आज विद्यार्थ्याने ठरवले तरी विद्यार्थ्याला नापास होणे शक्य नाही अशी  वर्तमानातील परीक्षा पद्धती आहे .  यास कारणीभूत ७०:३० , ८०:२० परीक्षेचा पॅटर्न पद्धत .  वर्तमानात १२वी साठी फिजिक्स ,  केमिस्ट्री , बायोलॉजी साठी ३० मार्कांचे  तर भाषा विषयासाठी २० मार्काचे  अंतर्गत मूल्यमापन. तीच गत दहावीच्या परीक्षेची देखील आहे . विज्ञान विषयांचे प्रॅक्टिकल केवळ सोपस्कार असून त्यात ९० टक्के विद्यार्थ्यांना २८ ते ३० मार्क्स दिले जातात  . म्हणजे लेखी परीक्षेत केवळ  ७०/ ८० पैकी पैकी  ५/१५ मार्क्स आवश्यक ( ७० मार्कांच्या परीक्षेत ५ तर ८० मार्कांच्या परीक्षेत १५ ) . एखाद्या विषयात ते नाही मिळाले तर  ग्रेस मार्कांचा टेकू असतोच पास करण्यासाठी .

     प्रत्यक्ष घडलेली घटना अशी : स्थळ नगर जिह्यातील श्रीरामपुर तालुका . एका विद्यार्थ्यांचे स्वप्न होते डॉक्टर होण्याचे . त्याने वर्षभर तयारी देखील केली . पण २/३ पेपर दिल्यानंतर त्याच्या लक्षात आले की   आपल्याला ड्रॉप घेण्याची गरज आहे आणि म्हणून त्याने ड्रॉप घेण्याचा निर्णय पालकांना बोलून दाखवला . पालकांनी देखील तो मान्य केला पण त्यांनी हे सांगितले की  परीक्षेचा सराव होईल या करिता एक विषय सोडून सर्व पेपर दे म्हणजे तुला ड्रॉप पण घेता येईल आणि बोर्डाच्या परीक्षेची प्रॅक्टिस देखील होईल . त्याने तो सल्ला मानला .  परीक्षा संपल्यावर त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला . पण परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्या "नापास होण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले ". बोर्डाने ग्रेस मार्कांच्या आधारे त्यास  पास केले .

     विद्यार्थ्यांच्या तथाकथित हितचिंतकांचे म्हणणे हे असते की  विद्यार्थांवर 'नापासा' शिक्का नकोच . वरकरणी हे विद्यार्थी हिताचे दिसत असले तरी विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने हे  उपकारक नसून अपायकारक ठरते . याचे कारण म्हणजे आवश्यक ज्ञान , कौशल्य प्राप्त न होता पास केले तरी करियरच्या परीक्षेत हे विद्यार्थी टिकाव धरत नाहीत . सोन्याला देखील चमकण्याआधी तावूनसुलाखून निघावे लागते . हाच नियम विद्यार्थ्यांना देखील लागू होतो . विद्यार्थी दशेत कस  लावला नाही तर  मग पुढे देखील कसे चमकणार ?  किमान उदरनिर्वाह भागवू शकतो असा शिक्षणाचा दर्जा हवाच हि अपेक्षा निश्चित अवाजवी आणि गैर नक्कीच नाही .

     निकालाची वाढती टक्केवारी , विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये आकाशाला गवसणी घालणारी वाढ हि विद्यार्थी -पालक -शाळांना सकृतदर्शनी वरवर सुखावणारी असली तरी ती एकुणातच शिक्षण व्यवस्थेच्या आरोग्यास घातक आहे . कृत्रिम गुणवतेच्या फुगवट्याचा शिक्षण व्यवस्थेवर होणारा दूरगामी दुष्परिणाम लक्षात घेता , 'टक्केवारीच्या फुगवट्याला टाचणी लावण्याचे , लगाम घालण्याचे'   धाडस  शिक्षण खात्याने , शिक्षण मंत्र्यांनी बोर्डाने करणे अत्यंत निकडीचे आहे .

             सारांशाने , बहुतांश शिक्षणप्रेमी , शिक्षणतज्ञांचे हेच मत आहे की , मार्कांची  खिरापत वाटणारे धोरण बदला विद्यार्थ्यांना त्यांच्यातील वास्तवाचे भान राहील अशा परीक्षा पद्धतीचा स्वीकार करा .

बोर्डाच्या मार्कशीटमध्ये वास्तवाचे प्रतिबिंब उमटण्यासाठी :

      अंतर्गत मूल्यमापनाच्या नावाखाली गुणांची वाटली जाणारी खिरापत आणि लेखी परीक्षेत मिळणारे मार्क्स याचे वास्तव गुणपत्रिकेवर प्रतिबिंबित होण्यासाठी   अंतर्गत आणि बाह्य गुण स्वतंत्रपणे (, इंटरनल ,एक्सटर्नल  मार्क्स ) मार्कशीट वर स्वतंत्रपणे नमूद करण्याचा नियम  बोर्डाने करावा . यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनाचे  खरे प्रतिबिंब समोर येऊ शकेल . त्याच बरोबर शाळा पातळीवरील मूल्यमापनात किती गुण असले तरी लेखी परीक्षेत विशिष्ट किमान गुणांची अट  सुरु करावी . या आधी बोर्डाने तसे जाहीर केले होते पण शिक्षण संस्थाचालकांच्या दबावापुढे झुकत तो निर्णय मागे घेण्यात आला .

 शिक्षणातून 'दिशा ' मिळणे अभिप्रेत आहे , 'दिशाभूल ' नव्हे .





 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

(लेखक विविध सामाजिक राजकीय विषयांवरील भाष्यकार आहेत )

लेखक संपर्क :

भ्र : ९८६९२२६२७२

Mail : danisudhir@gmail.com

 

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

कॉपीमुक्त परीक्षांच्या स्वप्नपूर्तीसाठी ......

 

तंत्रज्ञानाची मदत ,नाविन्यपूर्ण  प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रामाणिक अंमलबजावणीतून कॉपीमुक्त परीक्षांची स्वप्नपूर्ती  संभव !

         गैरप्रकार आणि कॉपीमुक्त परीक्षेच्या स्वप्नपूर्तीसाठी  बोर्डाने  पावले उचलत , व्हॉटसअँप वरील पेपरफुटी व परीक्षेतील अन्य गैरप्रकार , परीक्षा नियोजनातील त्रुटी , गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना यासाठी उपाययोजना करण्यासाठी जनतेचे अभिप्राय हा उपक्रम राबवला आहे . परंतू आजवरचा शिक्षण विभाग आणि बोर्डाचा कॉपीमुक्त परीक्षांची आश्वासने -घोषणा आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये चुंबकाच्या २ टोकाइतके अंतर राहिलेले असल्याने शिक्षण विभाग आणि बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा योजना  नेहमीच प्रश्नांकित राहिलेलया आहेत . तरीही एक सकारात्मक दृष्टिकोनातून  एक पालक या नात्याने , गैरप्रकाराची कारणे आणि संभाव्य उपाययोजना यावर एक प्रकाशझोत टाकण्यासाठी हा एक प्रयत्न .

                 " परीक्षा = कॉपी ", " परीक्षा = गैरप्रकार "  यांचे नाते किती अतूट आहे हे अनेकवेळा अधोरेखीत झाले आहे  . " परीक्षे पे चर्चा " या कार्यक्रमातून मा . पंतप्रधानांनी देखील परीक्षेतील शॉर्टकट आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरत नाहीत असे म्हटलेले आहे. तरीदेखील विद्यमान परिस्थितीत परीक्षा कुठलीही असो ती " गैरप्रकारापासून मुक्त " राहीलच याची खात्री शिक्षणमंत्री सोडा खुद्द ब्रम्हदेव देखील देऊ शकेल काय याविषयी संद्धीगता आहे .

         कॉपी हा वर्तमान शिक्षण व्यवस्थेला लागलेला शाप आहे. कुठलेही कष्ट, मेहनत न करता यश मिळवायचे अशी नीतिशून्य धारणा समाजात दिसते. तिचे नितळ  प्रतिबिंब म्हणजे परीक्षेतील कॉपी होय. सामूहिक कॉपी व संबंधित यंत्रणेकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळणारे अभय ही एक फक्त कृती नसून सामाजिक-नैतिक मूल्यांची घसरण दर्शवणारी प्रवृत्तीच म्हणावी लागेल. मूल्यरहित समाजव्यवस्थेचे बीजांकुर शिक्षणातील गैरप्रकारामुळे रुजले जाणे निश्चितच अधिक धोकादायक संभवते, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे वाटते.


असरचा अहवाल सांगतो की ४० टक्के विद्यार्थ्यांना गुणाकार ,भागाकार या गणिताच्या मूलभूत संकल्पना अवगत नाहीत , ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी भाषा विषयाचे वाचन अवगत नाही . असे असले तरी बोर्डाचा निकाल मात्र "शंभरी " च्या मार्गावर आहे . कॉपीचा हातभार हाच बोर्डाच्या निकालाचा पाया आहे हे नागडे सत्य आहे . 

      शिक्षणाचे बाजारीकरण ,  भूछत्राप्रमाणे गल्लोगल्ली बालवाडी ते अभियांत्रिकी -वैद्यकीय यांची थाटलेली दुकाने व  त्यातून निर्माण झालेली अस्तित्वाची जीवघेणी स्पर्धा यामुळे कॉपी , मूल्यमापनातील गैरप्रकार , पेपरफुटी असे प्रकार शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले आहेत हे कोणीच नाकारू शकत नाही. १०० टक्के निकालाचे धनुष्य पेलण्यासाठी स्वतः शिक्षक -मुख्याध्यापक -संस्थाचालक यांनी कॉपीचा अंगीकार केला असल्यामुळे आणि शासनाला  वाढत्या निकालाच्या आकडेवारीच्या आधाराने शिक्षणातील गुणवत्तेचा डांगोरा पीटत आपली पाठ थोपटता येत असल्यामुळे  परीक्षेतील गैरप्रकारांना अभय मिळताना दिसत आहे . कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार असल्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा महाराष्ट्रासाठी दिवास्वप्न ठरत आहे .

    काही वर्षांपूर्वी  परीक्षातील गैरप्रकारांनी निर्लज्जपणाचे टोक गाठले होते आणि कॉपीचे प्रकार अतिशय उघडपणे होत होते . पालक -प्रसार माध्यमांनी ओरड केल्यावर बोर्डाने ' गैरमार्गाविरुद्ध लढा ' अभियान राबविले . अर्थातच तेही सरकारी धोरणाप्रमाणे . निव्वळ धूळफेक . केवळ भोभाटा . प्रत्यक्ष कारवाई शून्य . या अभियानचे एकमात्र यश ते हे की जे अगदीच उघडपणे घडत होते ते आता पडद्याआड घडते आहे .

                 निवडणूक आयुक्त शेषन यांच्या कारकिर्दीनंतर जसे प्रचाराचा धूमधडाका, उघड उघड मतदान केंद्रावरील हस्तक्षेप यास जसा आळा बसला तरी छुप्या पद्धतीने पैसा-दारू, साम-दाम-दंड-भेद याचा सर्वश्रुत - सर्वमान्य वापर चालू आहे हे कटू वास्तव सत्य आहे, तद्वतच गैरमार्गाविरुद्ध लढा या अभियानामुळे परीक्षा केंद्राला येणारे जत्रेचे स्वरूप, शिक्षक-पर्यवेक्षकांचा कॉपीच्या उत्तेजनास ‘ उघडउघड ’ सक्रिय सहभाग यासम गोष्टींना आळा बसलेला दिसत असला तरी अपवादात्मक परिस्थिती सोडता आजही कॉपीला प्रतिबंध करण्याची शाळा-पर्यवेक्षकांची मानसिकता दिसत नाही हेही वास्तव आहे. प्रती वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेतून हीच गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना दिसते. भरारी पथकांना ' चुकून ' तरी कॉपी दिसते मात्र पण वर्गावरील पर्यवेक्षकांना ती  ' का ? ' दिसत नाही हे अनाकलीय आहे. 'कॉपीमुक्त महाराष्ट्र' हे दिवास्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे..

गैरप्रकारांची काही प्रमुख कारणे :

          ' मदर ' सेंटर कॉपीचे माहेरघर : विद्यार्थ्यांच्या 'सोयी'साठी ( खरतर शाळेच्या निकालाच्या सोयीसाठी !) बहुतांश विद्यार्थ्यांना आपलीच शाळा /महाविद्यालय बोर्डाचे परीक्षाकेंद्र म्हणून दिले जाते . विद्यार्थी त्याच शाळेतले आणि पर्यवेक्षकही त्याच शाळेतले . यांची 'युती ' हेच गैरप्रकाराचे मूळ आहे . शाळांना आपला निकाल कृत्रिम रित्या वाढवता येतो तर पात्रता नसताना विद्यार्थी भरघोस टक्के मिळवतात . अगदी शहरी भागात २ किमीच्या आत पर्यायी शाळा /महाविद्यालय उपलब्ध असताना देखील 'मदर सेंटर'चाच अट्टाहास धरला जातो . ग्रामीण असो की शहर , मदर सेंटर हि संकल्पना पूर्णतः बंद केली पाहिजे

          अतिरिक्त पर्यवेक्षक : गैरप्रकाराचे वाहक : एखाद्या शाळेचे ३५-४० विद्यार्थी परीक्षेला बसले असल्यास परीक्षा केंद्रावर त्या शाळेमार्फत फार फार तर 2 शिक्षक पर्यवेक्षक म्हणून पाठवायला हवेत. परंतु ग्रामीण भागातून ६-६ शिक्षक केंद्रावर पाठवले जातात. हेच शिक्षक संस्थाचालकाच्या आदेशानुसार शंभर टक्के निकालासाठी फक्त परीक्षेच्या काळातच जिवाची बाजी लावतात

          सोयीचे परीक्षा केंद्र एक पळवाट : शाळा महाविद्यालयांना "सोयीचे "  परीक्षा केंद्र निवडण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे अनेक शाळा - महाविद्यालये  दूरवरच्या ग्रामीण भागातील केंद्राची  निवड करते. स्थानिक शिक्षणाधिकारी यास अनुमती देतात तर बोर्ड त्यास मान्यता देते. अशा प्रकारे अनेक सोयीची केंद्रे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत.

          प्रवेश घेतानाच उत्तीर्णतेची हमी : विनाअनुदानित धोरणांतर्गत शाळा-महाविद्यालयांचे पीक अमाप आले आहे. निकोप स्पर्धेला बगल देत विद्यार्थी-पालकांना प्रवेश घेतानाच पास करून देण्याची हमी दिली जाते. यामुळे 'विद्यार्थी मुंबईला, प्रवेश परभणीला' असे प्रकार घडतात.

          अपात्र परीक्षक : वास्तविक १२ वीच्या अध्यापनासाठी पदव्युत्तर शिक्षणासह एमएड असणे आवश्यक असताना, पदवी-बीएड शिक्षकांची नेमणूक प्रात्यक्षिक परीक्षांसह अन्य परीक्षांसाठी केली जाते.

बाह्य परीक्षकांचे साटेलोटे : दहावी, बारावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा असते. एक अंतर्गत व एक बाह्य परीक्षक असतो. वर्षानुवर्षे तेच ते बाह्य परीक्षक नेमले जातात. प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे हा फक्त सोपस्कार ठरतो. खाणे-पिणे, डिझेलसहित व्यवस्था करून बाह्य परीक्षकाची बोळवण केली जाते. लेखी परीक्षेत देखील बाह्य पर्यवेक्षकाची 'योग्य व्यवस्था ' केली की बाह्य पर्यवेक्षक केवळ बुजगावण्याची भूमिका बजावतात . मराठवाड्यात तर पर्यवेक्षकासाठी 'पाकीट ' परंपरा अजूनही चालते . यासाठी परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून शिक्षणबाह्य वर्ग २ अधिकाऱ्याची नेमणूक केंद्रप्रमुख म्हणून करावी .

प्रश्नपत्रिकेत स्वाध्यायातीलच प्रश्न : बोर्डाच्या परीक्षेत केवळ आणि केवळ पुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न ( गाईडच्या भाषेत * प्रश्न ) जशेच्या तसे विचारले जातात . या सर्व प्रश्नांची उत्तरे नवनीत/गाईड /अपेक्षित संच यामध्ये उपलब्ध असतात . ग्रामीण भागामध्ये परीक्षेच्या ४/५ दिवस आधी गाईडला भरघोस मागणी असते . गाईड उघडली जातात ते थेट परीक्षा केंद्रातच .

       हे टाळण्यासाठी बोर्डाने केवळ स्वाध्यायाखालील प्रश्नच बोर्डाच्या परीक्षेत हि परंपरा बंद करावी . अभ्यासक्रमावर आधारीत कुठलाही प्रश्न विचारण्याचे सुरु करावे . गणितात केवळ आकडेवारी बदलणे हा सोपा मार्ग स्वीकरता येईल . उदा : समजा  स्वाध्यायात ९ पायऱ्याच्या जिन्यासाठी १२X ४ X २ इंच  लांबी -रुंदी -उंची असणाऱ्या विटांची संख्या काढा ? असा प्रश्न असेन तर बोर्डाच्या परीक्षेत पायऱ्यांची संख्या बदला , विटांचे आकारमान बदला . सायन्सच्या न्यूमेरिकल प्रॉब्लेममधील डिजिटस बदलून प्रश्न विचारता येतील .

          मानसिकतेचा अभाव : मुळात आजही शिक्षकांची गैरप्रकारांना आळा घालण्याची मानसिकता दिसत नाही. तीच गत पालक व समाजाची आहे.

         प्रश्न फक्त कॉपी करून पास होण्याच्या मानसिकते पुरता मर्यादित नाही. मूल्यरहित समाजव्यवस्थेचे बीजारोपण शाळांच्या पवित्र मंदिरात होणे सर्वाधिक घातक आहे. गैरप्रकारातून गुण मिळवण्याच्या प्रकारामुळे निकोप स्पर्धेच्या मूलभूत अधिकारापासून हुशार, प्रामाणिक विद्यार्थी वंचित राहतात हेही महत्त्वाचे आहे. परीक्षेतील गुणांना अवास्तव महत्त्व असू नये, हुशारी आणि गुणांचा परस्पर संबंध नसतो, परीक्षा या मूल्यमापनाचा एकमेव मार्ग नाही अशा 'राजकारणी', बोलायला ठीक असणाऱ्या  बाबींचा दाखला देऊन परीक्षेतील गैरप्रकारांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ' तथाकथित तत्त्ववेत्यांनी एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. आजही भविष्यातील अनेक निवडी, नियुक्त्या या फक्त परीक्षेतील मार्कावरच होत असतात. परीक्षेतील एका गुणामुळे संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. कुठल्याही परीक्षेतील गैरप्रकार निषेधार्हच आहेत व ते थांबवण्यासाठी विविध उपाययोजना व त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संपूर्णपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचीच आहे. मंडळाच्या उपायांना साथ देणे हे शिक्षण क्षेत्राचे आणि समाजाचे प्राथमिक कर्तव्य ठरते.

   शिक्षण मंत्र्यांनी स्वत: केंद्रांना भेटी द्याव्यात .

     दहावी_ बारावी परीक्षेतील कॉपी संदर्भात बोर्डाशी संपर्क साधणाऱ्या तक्रारदारांना येणारा  अनुभव अतिशय संतापजनक होता . प्राप्त माहितीनुसार बोर्डाच्या तक्रार   कक्षाकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेण्याऐवजी तक्रार दाराच्या संपूर्ण तपशीलासह fax पाठविण्यास सांगितले . बोर्ड अध्यक्षांच्या कार्यालयात फोन लावून देखील टोलवाटोवीचे उत्तर मिळाले . ज्या पालकाचे पाल्य परीक्षा देते आहे तो पालक संपूर्ण तपशिलासह परीक्षा केंद्रावरील कॉपी संदर्भात माहिती कशी देईल ?  हि माहिती संबंधीत शाळा -महावियालायाकडे पोहोचणार नाही आणि त्याच्या मुले आपल्या पाल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केले जाणार नाही याची हमी बोर्ड लेखी देईल का ? बोर्डाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी अन्यथा कॉपी मुक्त परीक्षाच्या वल्गना बंद कराव्यात . जनतेवर विश्वास नसेल तर भविष्यात शिक्षण मंत्र्यांनी स्वत: परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात .

     शिक्षण क्षेत्रातील वास्तवता कधीच पुढे आणली जात नाही .शिक्षणक्षेत्रातील शिक्षक -अधिकारी यांचा कल हा नेहमीच ' ऑल इज ओके ' रिपोर्ट पाठवण्याकडे असतो . याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बोर्डाच्या दहावी / बारावीच्या परीक्षा . शिक्षण क्षेत्राचा अभ्यासक या नात्याने अनेक विद्यार्थी -शिक्षक -पालक यांच्याशी संपर्क येतो . आजही ग्रामीण आणि शहरी भागात बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होतेच आहे . फरक एवढाच पडला आहे की , पूर्वी केंद्राबाहेर जी जत्रा असायची , बाहेरून कॉप्यांचा पुरवढा व्हायचा त्याला प्रतिबंध बसला आहे परंतु त्याची परिपूर्ती हि विषय शिक्षक , संस्था चालक करताना दिसत आहेत .

       मुळातच परीक्षा जर कॉपीमुक्त पद्धत्तीने घेतल्या तर निकालाचा आलेख ढासळेल याची भीती शिक्षक-संस्था चालक -बोर्ड -आणि शिक्षण खाते या सर्वांना असल्यामुळे अनेक सहज सोपे उपाय दृष्टीक्षेपात असणारे संभाव्य उपाय वेळोवेळी  प्रत्यक्ष शिक्षण सचिव , बोर्डाचे अध्यक्ष , विभागीय सचिव आणि शिक्षण मंत्री यांना पाठवून देखील त्याला केराची टोपली दाखवली जाते . कॉपी होतच नाही असे भासविले जाते त्यामुळे उपाय योजना आपसूकच निकालात निघतात . बोर्डाच्या परीक्षांचे वास्तव जाणून घेण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी स्वतः केंद्रांना आकस्मित भेटी द्याव्यात . त्याच बरोबर शिक्षक खात्यातील सचिव व अन्य अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत .

  दृष्टिपथातील   उपाय :   शिक्षण  विभाग आणि बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षांसाठी उपायांचा विचार करावा :    

          झूममीट द्वारे तटस्थ पर्यवेक्षण : ज्या ज्या वर्गात परीक्षा सुरु आहे त्या त्या वर्गाचे चित्रीकरण पालकांसाठी , प्रसारमाध्यम प्रतिनिधी , शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी झूम मीटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास हे सर्व घटक तटस्थ पर्यवेक्षकांची भूमिका बजावू शकतात . परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येऊ शकते .

          सिसिटीव्ही अनिवार्यच असावेत : परीक्षा हॉल मध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असावेत . कॉपी नियंत्रणासाठी  कमी खर्चिक सूचना हव्यात अशी बोर्डाची भूमिका असली तरी वर्तमान काळाचा विचार करता ज्या ज्या शाळेत दहावी -बारावीचे परीक्षा केंद्र आहे त्या त्या शाळेत सीसीटीव्ही असणे अनिवार्य असावे . तसे तर शिक्षण विभागाने या पूर्वीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही अनिवार्य च केलेले आहेत .

                         सीसीटीव्ही प्रत्येक शाळेत बसवण्यासाठी खाजगी कंपन्यांची मदत घ्यावी . खाजगी कंपन्या लाखो रुपयांचा सीएसआर फंड खर्च करत असतात . शिक्षण विभागाने "शाळा दत्तक योजना " उपक्रम राबवावा आणि खाजगी कंपन्यांना शाळा दत्तक देत त्यांच्या सीएसआर फंडातून सीसीटीव्ही बसवण्यास सांगावे . माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले तरी काही लाखो रुपयांचा निधी जमा केला जाऊ शकतो .

          सामूहिक कॉपीला आळा घालण्यासाठी :   सामूहिक कॉपीला आळा घालण्यासाठी स्वाध्यायातील प्रश्न जसेच्या तसे देण्याऐवजी धड्यावर आधारित रिकाम्या जागा , जोड्या जुळवा , एका वाक्यात उत्तरे अशा प्रकारचे स्वाध्यायाव्यतिरिक्त देखील प्रश्न विचारावेत .

                      गणित विषयाच्या बाबतीत स्वाध्यायातील प्रश्न विचारताना प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेत न टाकता प्रश्नांच्या आकडेवारीत (numbers ) बदल करत प्रश्न विचारावेत . उदा : जसे जिन्याच्या १० पायऱ्यांसाठी विटांची संख्या स्वाध्यायात विचारलेली असल्यास प्रश्नपत्रिकेत  १२/१५ पायऱ्यासाठी विटांची संख्या विचारावी . स्वाध्यायात मैदानाला ३  तारांचे कुंपण घालण्यासाठी  लागणारी तारेची लांबी विचारण्याऐवजी ५ तारांचे कुंपणाला लागणाऱ्या तारेची लांबी विचारावी . असे केल्यास गाईड च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कॉपीला सहजपणे आळा बसू शकेल . तसेच परीक्षा हॉल मधील सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्नपत्रिका देण्याऐवजी प्रश्नपत्रिकेचे ए ,बी ,सी व डी असे प्रश्नसंच करावेत  . यामुळे उत्तरपत्रिकांची देवाणघेवाण , खाणाखुणांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या खुणा व त्यातून होणारे कॉपीचे प्रकारांना आळा घातला जाऊ शकतो  .

          विषय शिक्षकांना मज्जाव असावा : आपल्या विषयाच्या निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी  शिक्षक प्रत्यक्ष कॉपीस प्रोत्साहन देत असल्याने विषय शिक्षकांना त्या त्या पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रावर येण्यास पूर्णपणे मज्जाव असावा . याची अंमलबाजावणी करण्यासाठी  ज्या विषयाचा पेपर आहे त्या सर्व शिक्षकांना तहसील कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य असावे . 

          प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कॉपीस पूरक नसावे : वर्तमानातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप हे कॉपीस पूरक आहे . केवळ स्वाध्यायातील प्रश्न जसेच्या तसे देण्याच्या पद्धतीमुळे नवनीत अपेक्षित /-गाईड च्या माध्यमातून कॉपीला बळ मिळते . गणित -विज्ञान प्रश्नपत्रिकेत बदल करावेत . गणिताच्या प्रश्नपत्रिकेत स्वाध्यायातील प्रश्नांचे स्वरूप तेच ठेवत गणितातील आकडे बदलल्यास सामूहिक कॉपीला मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो. विज्ञानात देखील जे प्रॉब्लेम्स असतात त्यात देखील आकडे बदलावेत . त्याच प्रमाणे  गाळलेल्या जागा -जोड्या -एका वाक्यातील उत्तरे या सारखे प्रश्न केवळ स्वाध्यायातील(च ) विचारायचे धोरण सोडून त्या धड्यातील  आशयावर आधारित  कुठलेही प्रश्न विचारण्याचे धोरण अवलंबावे . या मुळे विद्यार्थी धडे वाचण्यास प्राधान्य देतील आणि शिक्षणाचा दर्जा देखील वृद्धिंगत होऊ शकेल . सध्या विद्यार्थी धडे न वाचता केवळ  गाईडमधील (*) असणारे प्रश्नच पाठ करताना दिसतात . धडे वाचतच नाहीत .

          केंद्रप्रमुख तटस्थ हवेत :  त्या शाळेतील /कॉलेजमधील शिक्षक /प्राध्यापकांची नियुक्ती केंद्रप्रमुख न करता त्या गावातील शाळा /कॉलेज व्यतिरिक्त अन्य ठिकाणावरील शिक्षक /प्राध्यापकांची नियुक्ती केंद्रप्रमुख म्हणून करावी . 

          रोटेशन /लॉटरी पद्धतीचा वापर करावा : गावातील /परिसरातील विशिष्ट विद्यार्थ्यांना सहाय्य व्हावे या करिता विशिष्ट शिक्षकांना /प्राध्यापकांनाच त्या त्या वर्गावर पर्यवेक्षक म्हणून टाकले जाते .  अशा प्रकारचे लागेबांधे टाळण्यासाठी  पर्यवेक्षकांची नियुक्ती लॉटरी पद्धतीने करावयाचा नियम करावा .

          तटस्थ बैठे पथक नेमावे :  समाजात अनेक व्यक्ती , शिक्षणप्रेमी कॉपीमुक्त परीक्षांसाठी "निशुल्क मोबदल्यात " मोलाची भूमिका बजावू शकतात . बोर्डाने इच्छुकांना आवाहन केल्यास अनेक निवृत्त शासकीय अधिकारी , सजग नागरिक आपले नावे बोर्डाकडे नोंदवू शकतात . अशा ५ लोकांचे एक बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर नेमावे .

          कॉपी कारवाई प्रक्रिया सुलभ असावी : वर्तमानातील कॉपी कारवाई प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि विद्यार्थ्यांना फेव्हर करणारी आहे . पर्यवेक्षकाने कॉपी पकडल्यानंतर आजूबाजूच्या ४ विद्यार्थ्यांच्या सह्या घेणे , केंद्रावरील पोलिसांची साक्षीदार म्हणून सही घेणे , विद्यार्थ्याने जीवाचे काही बरे -वाईट करू नये यासाठी पालकांना शाळेत बोलावणे , कारवाई सुरु झाल्यावर वारंवार बोर्डाच्या कार्यालयात हजर होणे अशा क्लिष्ट प्रक्रियेमुळे "भीक नको पण कुत्रे आवर " अशा मानसिकतेततून पर्यवेक्षक , केंद्रप्रमुख , शाळा प्रशासन कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला केवळ पोकळ धमक्या देत प्रकरण मिटवण्यात धन्यता मानताना दिसतात . वर्गात सीसीटीव्ही असतील तर कॉपी पकडणाऱ्या शिक्षकाची बाजू अधिक मजबूत होऊ शकते कारण सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून उपयोगात येऊ शकते .

         शिक्षकांना विश्वास देण्यासाठी कॉपी कारवाई प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करणे आवश्यक आहे .

          क्लिष्ट डॉक्युमेंटेशन प्रक्रिया टाळावी : प्रत्यक्ष पेपर सुरु झाल्यानंतर पर्यवेक्षकांना पर्यवेक्षण करण्या बरोबरच एबी फॉर्म्स , अटेन्डन्स फॉर्म अशा प्रकारचे विविध फॉर्म्स भरण्यासाठी ४०/४५ मिनिटांचा कालावधी लागतो . त्यामुळे पर्यवेक्षणाच्या दर्जावर नकारात्मक परिणाम होतो . यावरील उपाय म्हणजे एका वर्गावर एक शिक्षक पर्यवेक्षक आणि दुसरी शिक्षकेत्तर कर्मचारी अशा २ व्यक्तींची नेमणूक करावी . शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याकडे डॉक्युमेंटेशन प्रक्रिया सोपवावी . शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अन्य शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी किंवा निवडणूक मतदान प्रक्रियेत केली जाते त्या प्रमाणे राज्य  सरकारी  कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी . परीक्षा हि शिक्षणातील अत्यंत महत्वाची प्रक्रिया  आहे हे ध्यानात घेत अन्य शाळेतील शिक्षकांना देखील पर्यवेक्षणात समाविष्ट करावे .

          परीक्षा केंद्रातील घटकांची मानसिकता कॉपीला पूरकच :     आज परिस्थिती अशी आहे की  फ्लायिंग स्कॉड  आल्याची वर्दी देण्यासाठी शाळेकडे येणाऱ्या रस्त्यांवर माणूस बसवला जातो . स्कॉड आल्याची वार्ता मोबाईल द्वारे केंद्र प्रमुखाला दिली जाते  . हा प्रकार म्हणजे "कुंपणानेच शेत खाण्याचा " प्रकार आहे . असे कृष्णकृत्य करणाऱ्या घटकांवर बोर्डाने कडक कार्यवाही करायला हवी  .अशा घटकांचे समुपदेशन करणे निकडीचे आहे . 

          परीक्षा केंद्राची मान्यता काढण्याचा नियम असावा : दक्षता पथक , फ्लाईंग स्कॉड ला जर एखाद्या केंद्रावर ५ पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी , अन्य तत्सम गैरप्रकार करताना आढळले तर त्या केंद्राची मान्यता ५ वर्षासाठी रद्द करण्याचा नियम असावा .

 

          ज्यांचे पाल्य परीक्षार्थी आहेत अशा शिक्षकांना कोणत्याही सबबीखाली (पर्यवेक्षकांचा तुटवडा, पाल्य असल्याची माहिती नव्हती) पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती देऊ नये.

          अनेक पालक, शिक्षणप्रेमी 'व्हिसल स्लोअर'चे काम करू इच्छितात. केंद्रातील गैरप्रकारासंदर्भात त्वरित माहिती देण्यासाठी बोर्डाचा स्वतंत्र कक्ष असावा. अशा केंद्राचा पत्ता, दूरध्वनी, फॅक्स क्रमांक जाहीर करावा.

          'मदर सेंटर ' हि संकल्पना हद्दपार करत विद्यार्थ्यांना अन्य शाळा /महाविद्यालय केंद्र म्हणून द्यावीत .

          बोर्डाच्या परीक्षेसाठी केवळ स्वाध्यायाखालील जसेचं तसे प्रश्न हि संकल्पना बाद करत अभ्यासक्रमावर आधारीत अन्य प्रश्न विचारले जावेत . स्वाध्यायातील प्रश्नातील आकडेवारी बदलून प्रश्न विचारावेत .

          कडक पर्यवेक्षण करणार्या् पर्यवेक्षकांना जाणीवपूर्वक परीक्षेत समाविष्ट केले जात नाही. पर्यवेक्षण सर्वांना अनिवार्य असावे, ते रोटेशनल पद्धतीने द्यावे. (विषय शिक्षक वगळता)

          बोर्डाच्या परीक्षेचे ' वास्तव 'समाजासमोर येण्यासाठी प्रसारमाध्यमांना परीक्षा केंद्राचे छायाचित्रण करण्याची परवानगी असायला हवी .

          ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची सुविधा आहे त्या ठिकाणी ज्यांना त्रयस्थ पंच म्हणून भूमिका निभावयाची आहे त्यांच्या साठी सर्व वर्गाचे चित्रण परीक्षाकेंद्रातील एका रूममध्ये उपलब्ध असावे .

          विद्यार्थ्यांचा रोष टाळण्यासाठी कॉपी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करताना भेदाभेद टाळावा.

          पर्यवेक्षण करताना कर्तव्यात कसूर करणारया  पर्यवेक्षकाची वेतनवाढ रोखण्याचा अधिकार थेट बोर्डाकडेच असावा. संस्थाचालकाकडे तो असल्यास ते पाठीशी घालण्याची शक्यता वाढते.

          'शिक्षा सूचीची' प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी.

          भरारी पथकांची संख्या वाढवावी .

          परीक्षा केंद्रात विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोबाईला पूर्णपणे बंदी असावी. 

          दहावीच्या परीक्षेत प्राथमिक शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करावी . तर बारावीच्या परीक्षेसाठी शाळेतील व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक यांना पर्यवेक्षण दयावे .

          व्हाट्सअँप नंबरची सुविधा : एखाद्या ठिकाणी परीक्षेत गैरप्रकार घडत असेन , सर्रासपणे कॉपी चालत असेन तर अशा केंद्राची तक्रार करण्यासाठी शिक्षण विभागाने व्हाट्सअँप नंबर जाहीर करावा .

          अनुदानासाठी किमान निकालाचे बंधन नसावे : अनुदानासाठीनिकाल कमी लागणाऱ्या शाळांवर विविध बंधने लादले जात असल्याने कृत्रिम पद्धतीने निकाल वाढवण्यासाठी स्वतः शिक्षक , संस्थाचालक कॉपी सारख्या गैरप्रकारांना प्रोत्साहन , अभय देत असतात . या करिता किमान निकालाची अट शैक्षणिक संस्थांवर लादू नये . कॉपीचे उच्चाटन होण्यासाठी संबंधित घटकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. याकरिता आगामी 3 वर्षांकरिता शाळा /महाविद्यालयावर किमान निकालाचे बंधन नसावे.

          कॉपीमुक्त परीक्षा धोरण प्रामाणिक हवे : गैरप्रकारांनी मुक्त , कॉपीमुक्त परीक्षांसाठी सर्वात महत्वाचा उपाय हा की कॉपीमुक्त परीक्षांबाबत बोर्डाचे धोरण प्रामाणिक हवे आणि ते प्रत्यक्ष कृतीत प्रामाणिक पणे उतरवणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने शिक्षक -पर्यवेक्षक -संस्थाचालकांचे समुपदेशन निकडीचे ठरते  .

                 विद्यार्थ्यांना स्वतःची शाळा केंद्र म्हणून न देणे , शाळा-शाळातील पर्यवेक्षकांची अदलाबदल करणे , गणितासारख्या विषयात स्वाध्यायातील प्रश्नच प्रश्नपत्रिकेत देताना आकडे बदल करणे , शिक्षणबाह्य लोकांची त्रयस्त पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करणे , परीक्षा केंद्रावर मोबाईलला पूर्णतः बंदी घालणे , परीक्षार्थी विद्यार्थी / पालकांचा फीड बॉक घेणे , प्रसारमाध्यमांना केंद्राला भेट देण्याची परवानगी देणे , संस्थाचालकांना परीक्षेच्या काळात प्रवेशबंदी , कॉपीची तक्रार करण्यासाठी   तक्रार कक्ष , जे विद्यार्थी -शिक्षक-पालक व्हिसलब्लोअरची भूमिका निभाऊ इच्छितात त्यांना आपले मत निनावी किंवा नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पाठवण्याची व्यवस्था निर्माण करणे उपायांचा देखील विचार करावा  .

       उपाय अनेक आहेत परंतु जो पर्यंत त्यांची  अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासनिक -राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती प्रबळ होत नाही तो पर्यंत सर्व उपाय वांझोटे ठरत राहणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्याची अर्थातच गरज असत नाही .  बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात कॉपीचा सिंहाचा वाटा आहे हे बोर्ड -शिक्षण खाते नाकारत असले तरी असरचा रिपोर्ट त्याला छेद देतो हे डोळ्याआड करता येणार नाही . याविषयीचे मत शिक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक मंचावरून व्यक्त करावेत म्हणजे “ कॉपीमुक्त परीक्षां ” चे अच्छे दिन कधी येणार की येणारच नाहीत याविषयीचा संभ्रम दूर होईल.

                                                                                                                

                                                          


तळटीप :  हा लेख दिव्य मराठी मधुरिमा पुरवणीत  ( ७ फेब्रुवारी २०२३ ) प्रकाशित झालेला आहे 



                            
सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,  

                                                                               भ्रमणध्वनी : ९८६९२२६२७२

                                                                     मेल :  danisudhir@gmail.com

                                          ( लेखक शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवरील भाष्यकार आहेत )