रविवार, २२ जुलै, २०१८

घराणेशाहीला गाडत घटनेस अभिप्रेत लोकशाही जतन -संवर्धनासाठी मतदारांकडून अधिक सुज्ञ निर्णयाची अपेक्षा !!!


          मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत  यूपीतील कैराना महाराष्ट्रातील पालघर लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 'घराणेशाहीवर शिक्कामोर्तब म्हणजे लोकशाही असे मानत मतदारांना गृहीत धरत वडिलांच्या निधनानंतर त्या जागेवर माझाच हक्क अशा अविर्भावात पक्षांतर करणाऱ्या व त्यास साथ देणाऱ्या राजकीय पक्षासाठी सणसणीत चपराक " आहे असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही . अर्थातच भाजपा अतिशय धुतल्या तांदळा सारखा पक्ष आहे असे नाही आणि त्यामुळेच त्यांनी  उमेदवार आयात करून विजय मिळवला असला तरी एकुणातच पालघरमधील निवडणूकपूर्व आणि मतदान पश्चात जी राजकीय चिखलफेक पहावयास मिळाली ती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी 'निवडणुका लढवण्याबाबतची काही आचारसहिंता स्वयंपद्धतीने आखून घेण्याची गरज आहे " असे वाटते .
                 तसे पाहता कुठल्याच राजकीय पक्षाला पालघर निवडणूक प्रतिष्टेची करत 'साम-दाम-दंड ' धोरण राबवण्याची आवश्यकता नव्हती कारण या निडवणुकीच्या निकालाने  कुठल्याच पक्षाच्या सत्तेला सुरुंग लागणार नव्हता ना कुणाला सत्ताप्राप्ती होणार नव्हती . तरीही ज्या प्रकारे गेल्या २ महिन्यात राजकीय नेतृत्वाने स्वतःचे वस्त्रहरण करून घेतले ते पाहता राजकीय पक्षांच्या वर्तनाला पायबंद घालण्याची वेळ नक्कीच आली आहे असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही . वस्तुतः  वर्तमान सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेतृत्वाने कमी -अधिक प्रमाणात कमरेचे काढून ते डोक्याला देखील न बांधता सर्रासपणे फेकून देत लोकशाही प्रक्रियेला ज्या प्रकारे नागडे करण्याचे अंगिकारलेले धोरण पाहता आता 'लोकशाहीचे वस्त्रहरण 'धोपवण्याची खरी जबाबदारी हि भारतीय मतदारांची असल्याचे दिसते .
        लोकशाही व्यवस्थेत कुठलातरी पक्ष जिंकणार, कुठलातरी पक्ष हरणार हे ठरलेले असते . कुठल्याच पक्षाने आपली सत्ता हि 'अमर सत्ता ' आहे अशा अविर्भावात कारभाराचा गाडा हाकणे सुयोग्य ठरत नाही परंतू 'सत्तातुराणां न भयं न लज्जा' अशी अवस्था सर्वच राजकीय पक्षांची झालेली असल्यामुळे भविष्यात लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी ,घटनेस अभिप्रेत लोकशाहीच्या जतन -संवर्धनासाठी मतदारांनी अधिक सुज्ञपणे मतदान करणे काळाची गरज वाटते . नेता -राजकीय पक्ष कितीही मोठा असला तरी त्याला घरचा रस्ता हे सामान्य मतदारच दाखवू शकतात हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सामर्थ्य आहे व मतदारांनी त्याची प्रचिती वेळोवेळी आणून देणे अत्यंत निकडीचे आहे .
 कृतियुक्त योग्य संदेश देण्याची संधी :   स्वार्थाने बेभान झालेल्या राजकारण्यांना सरळ करण्याची ताकद मतदारांकडे आहे याची प्रचिती पालघर निवडणुकीत मतदारांनी भाजप -शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पराभूत करत अन्य तिसऱ्या उमेदवाराला निवडून दिले असते तर ऐनवेळी मतदारांना गृहीत धरत पक्षांतराच्या कोलांटउड्या घेणाऱ्या उमेदवारांना सुयोग्य इशारा मिळाला असता . भविष्यात तरी भारतीय मतदारांनी अतिशय सुज्ञपणे मतदान करणे अभिप्रेत आहे .राजकारण्यांना ५ वर्ष त्यांच्या निष्क्रियतेसाठी लाखोळी वाहणारे मतदार मतदानाच्या दिवशी मात्र भावकी -जात-धर्म-पक्ष यासम गोष्टींच्या संमोहनातून अयोग्य व्यक्तीला मतदान करणारे मतदार अधिक सजग आणि सुज्ञ होण्यासाठी प्रसारमाध्यमे -सामाजीक संस्था - साहित्यिक मंडळी -विचारवंत यांनी जनजागृती अभियान राबवणे अत्यंत अनिवार्य आहे .होय ! शेवटी अतिशय खेदाने नमूद करावे वाटते ते म्हणजे  भारतीय प्रसारमाध्यमांनी देखील अधिक सजग ,सुशिक्षीत आणि निःपक्ष होणे अत्यंत निकडीचे आहे .लोकशाहीस दिशा देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे ना की दिशाभूल करणे या तत्वाचा स्वीकार प्रसारमाध्यमांनी करावयास हवा .
सुज्ञ मतदार हेच लोकशाहीचे खरे आधारस्तंभ : ७ दशकाच्या लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना , नेतृत्वांना संधी दिली परंतू तरीही आज बहुतांश नागरीक हे जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गरजांपासून वंचीत आहेत . याचाच अर्थ एकतर व्यवस्थेत दोष आहे किंवा नागरीक सुज्ञपणे मतदान करत नाहीत . व्यवस्थेत दोष असेल तर तो दुरुस्त करणे मतदारांच्या हातात नाही , त्यांच्या हातात आहे ते म्हणजे आपल्यास प्राप्त अधिकाराचा सुयोग्य वापर करत योग्य व्यक्तींची निवड करणे . आजवर होते हे आहे की , अमुक एक पक्ष चांगला , अमुक एक नेता चांगला म्हणून त्याने दिलेल्या उमेदवारास मतदान केले जाते . यापुढे मतदारांनी हे टाळायला हवे . केवळ पक्ष किंवा नेतृत्व न पाहता आपले प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीची पात्रता , त्याचा इतिहास पाहून मतदान करायला हवे . स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना , क्रांतिवीरांना , राजकीय नेतृत्वांना अभिप्रेत असणारी लोकशाहीच्या पूर्ततेचे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर एक आणि एकमात्र मार्ग संभवतो तो म्हणजे भारतीय नागरीकांनी अगदी ग्रामपंचायत ते लोकसभेच्या निवडणुकीत अतिशय सजगपणे , आपला विवेक,  आपल्या बुद्धीच्या जागृत अवस्थेत मतदान करायला हवे .
व्यवस्थेचे "पारदर्शक परिवर्तन" हवेच : वर्तमान शासकीय -प्रशासकीय व्यवस्था हि सदोष असल्यामुळे अनेकवेळा राजकीय नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न करून देखील त्याचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यात अडथळा होतो . आज पारदर्शक व्यवस्थेचा डंका पिटला जात असला तरी प्रत्यक्षात व्यवस्थेची कार्यपद्धती अशी आहे की , अधिकाधिक माहिती हि नागरीकांपासून गुप्त ठेवली जाते . आजवरच्या सर्वच सरकारांनी , अगदी पारदर्शकतेचे पेटंट असल्याचा अविर्भावात वागणाऱ्या मोदी -फडणवीस सरकारकडून पारदर्शकतेची दवंडी पिटवली जात असली तरी आजही ग्रामपंचायती-पंचायत समिती -नगरपालिका -महानगरपालिका -आमदार /खासदार निधी याचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर टाकला जात नाही आणि त्यामुळेच जनता या सर्व कारभारापासून अनभिज्ञच असते . एवढेच कशाला अगदी आपली मुले ज्या शाळेत -महाविद्यालयात प्रवेश घेतात तिथे अध्यापन करणाऱ्या शिक्षक -प्राध्यापकांची शैक्षणिक अर्हता , त्या संस्थेतील पायभूत सुविधा याची माहिती पालकांपासून 'गुप्त ' ठेवण्यातच प्राधान्य दिले जाते . राज्य -केंद्र पातळीवरील कुठल्या योजनेचे कोण लाभार्थी आहेत हे देखील कधीच जनतेसमोर 'खुले' केले जात नाही .आणि म्हणूनच  लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमान व्यवस्थेत पारदर्शक परिवर्तन होणे हि काळाची गरज आहे . व्यवस्था अधिक दोषमुक्त , पारदर्शक केली , सत्तेच्या माध्यमातून मलाई लाटण्याच्या मार्गास प्रतिबंध केला तर आणि तरच लोकशाही व्यवस्थेत अभिप्रेत लाभ शेवटच्या घटकापर्यंत सहजपणे पोहचू शकतील .
         सर्वात महत्वाचे हे की ,    निवडणुकीत कुठली व्यक्ती , कुठला पक्ष निवडून आला यास महत्व आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे ते म्हणजे लोकशाहीचा पराभव टाळणे .
                                                                                                सुधीर लक्ष्मीकांत दाणी , danisudhir@gmail.com
भ्र. ९८६९ २२ ६२ ७२     

मंगळवार, १७ जुलै, २०१८

...तर प्लॅस्टिकबंदी हा निव्वळ फार्सच ठरतो !



       कुठल्याही समस्येच्या मुळाशी जात त्याची सोडवणूक करण्यापेक्षा त्या प्रश्नाला /समस्येला बगल कशी द्यावयाची यात भारतीय प्रशासन आणि राज्यकर्त्यांचा हातखंडा असतो याची प्रचिती देणारा निर्णय म्हणजे 'प्लॅस्टिक बंदी ' . सकृतदर्शनी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने नाले -गटारे -परिसर स्वच्छता , प्लॅस्टिक सेवनातून प्राण्यांची होणारी ससेहोलपट याकरीता अनिवार्य  आणि स्वागतार्ह  असल्याचे 'भासवले ' जात असले तरी व्यावहारिक दृष्टीने प्लॅस्टिक बंदीच्या यशस्वतेबाबत साशंकता आहे
 
                   वस्तुतः  कुठल्याही समस्येचे प्रामाणिक निराकरण करावयाचे असेल तर मुळात त्या समस्येचे मूळ जाणून घेणे आवश्यक असते . यामार्गाचा अवलंब केला तरच समस्येचे समूळ उच्चाटन शक्य होते . प्रश्न /समस्या नीटपणे समजून घेतली तरच त्या समस्येच्या निर्मूलनासाठी आवश्यक आणि परिणामकारक उपाययोजना करणे शक्य होते , अन्यथा समस्येचे निर्मूलन करण्यासाठी उचलली पाऊले केवळ आणि केवळ उपचार /फार्स ठरू शकतात . प्लॅस्टिक बंदीच्या बाबतीत असेच होण्याची शक्यता अधिक दिसते .


प्लॅस्टिकबंदी यशस्वीतेसाठी सक्षम पर्याय आवशकच :

      वर्तमानात दूध -तेल यासम द्रव पदार्थापासून ते औषधे यासारख्या गोष्टीसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक लक्षात घेता प्लॅस्टिक हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि त्यामुळेच प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्याअगोदर प्लॅस्टिकला समर्थ पर्याय उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे होते . दूध -तेल आता कागदाच्या पिशवीतून न्यायाचे का ? यासम समाजमाध्यमातून फिरणारे संदेश हेच अधोरेखीत करतात की , जनमानस देखील प्लॅस्टिक समस्येच्या निर्मूलनाबाबत जागरूक आहे परंतू ती संवेदनशीलता व्यवहारात उतरवण्यासाठी त्यास योग्य पर्यायाची गरज आहे .

        सरकारने मात्र याविषयीचा कुठलाही पर्याय उपलब्ध करता थेट प्लॅस्टिकबंदीचा अव्यवहार्य निर्णय घेतला आणि आता पुन्हा एक एक पाऊल मागे घेण्यास सुरुवात केली आहे

      प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामागे  सरकारने पर्यावरण रक्षणाचा मूद्दा महत्वाचा असल्याचे म्हटले आहे . पर्यावरणाप्रती सरकारची  एकुणातच असेलेली संवेदशीलता लक्षात घेता हे कारण देखील समर्थनीय ठरत नाही . एकुणातच आपल्याकडील राजकीय आणि प्रशासकीय संस्कृती लक्षात घेता "पर्यावरण आणि सरकार " हे चुंबकाचे दोन टोक ठरतात आणि त्यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी प्लँस्टिकबंदी हे समर्थन देखील शुद्ध दांभिकताच ठरते . ज्या ठिकाणी शहरातील घराघरामधील सांडपाणी -मलमूत्र , गटाराचे पाणी , फॅक्टरीचे दूषित पाणी  कुठलीही प्रक्रिया करता सर्रासपणे नदीत सोडले जाते , टेकड्या उद्धवस्त करून इमारती निर्माण केल्याजातात आणि त्यास सरकारी परवानगी मिळते ते पाहता सरकार राज्यकर्त्यांचे पर्यावरण रक्षणाचे आश्रू हे केवळ मगरीचे आश्रू ठरतात .

पूर्वतयारीतील अपयश म्हणजे अपयशाची तयारी ..

    सरकारचा प्लॅस्टिकबंदी  अंशतः शिथिल हा निर्णय पाहता सर्वांनी आधीच गृहीत धरल्याप्रमाणे आपल्या कडील प्रशासकीय आणि राजकीय रूढीपरंपरेस धरून अखेर प्लास्टिकबंदीची "अपयशाकडे " वाटचाल सुरु झालेली आहे असे दिसते . प्लॅस्टिक बंदी हा अभ्यासपूर्ण निर्णय नव्हता तर केवळ एक नाटक होते हेच यातून दिसून येते . शैक्षणिक असो की जीवन व्यवहारातील कुठलीही परीक्षा असो त्यात यश प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी हवीच हा साधा नियम . अन्यथा " पूर्वतयारीतील अपयश म्हणजे अपयशाची तयारी " या नियमाप्रमाणे परीक्षेत नापासाचा शिक्का ठरलेलाच .


  वापरलेले प्लॅस्टिक संकलन -विघटन : खरी समस्या :
         
      गृहीतक चुकले की अंतिम निष्कर्ष चुकणारच हा नियम लक्षात घेता प्लॅस्टिकचा भस्मासुर (?) निर्मूलनाकरिता प्लॅस्टिकबंदी हा निर्णय केवळ धूळफेक करणारा ठरतो . मुळातच प्लॅस्टिकच्या संपूर्णबंदी मागे मुंबईतील " २६ जुलै" सारखी  जी कारणे पुढे केली जातात तीच दिशाभूल करणारी आहेत . भारतात प्लॅस्टिकचा भस्मासुर उभा राहण्यामागे प्लॅस्टिकचा वापर हि मूलभूत समस्या नसून प्लॅस्टिकचे निर्मूलन हि खरी समस्या आहे . सक्षम प्लॅस्टिक निर्मूलन व्यवस्था उभा करणे , प्लॅस्टिकच्या सुयोग्य वापराबाबत नागरीकांमध्ये सजगता संवेदशीलता निर्माण करणे हि सरकारची जबाबदारी आहे आणि आपले मूलभूत कर्तव्य टाळण्यासाठी सरकार 'संपूर्ण प्लँस्टिकबंदी सारखा उपाय आणि दंडात्मक कारवाईतून नागरिकांची पिळवणूक ' या अव्यवहार्य मार्गाचा वापर करते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

        बहुतांश युरोपियन देशात प्लॅस्टिकचा सर्रासपणे वापर केला जात असला तरी तिथे कुठेही रस्त्यावर वा परीसरात प्लॅस्टिकचा कचरा दिसत नाही . यामागचे प्रमुख कारण म्हणजे या -या ठिकाणच्या स्थानिकप्रशासनाने निर्माण केलेली 'प्लॅस्टिक संकलन प्लॅस्टिक निर्मूलन व्यवस्था नागरीकांचे संवेदनशील वर्तन  '.  प्रश्न हा आहे की , जे अन्य देशातील प्रशासनाला ,राजकीय नेतृत्वाला शक्य आहे ते भारतीय प्रशासनाला ,राजकीय नेतृत्वाला का शक्य नाही ?

             शैक्षणिक असो की जीवन व्यवहारातील कुठलीही परीक्षा असो त्यात यश प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी हवीच हा साधा नियम . अन्यथा " पूर्वतयारीतील अपयश म्हणजे अपयशाची तयारी " या नियमाप्रमाणे परीक्षेत नापासाचा शिक्का ठरलेलाच .

               कुठलाही नियम पाळणे हाच खरा नियम हि कार्यपद्धती लक्षात घेता प्लॅस्टिकबंदी नागरीक -सरकार -राज्यकर्त्यांच्या विस्मरणात जाईल आणि पुन्हा कधीतरी ती लादली जाईल .  अभ्यास करता परीक्षेला बसलयास नापास होणे निश्चितच असते याचा विचार करून सरकारने भविष्यात प्लॅस्टिकबंदी लावण्याआधी प्लॅस्टिकबंदीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक सर्व तयारी करणे अपेक्षीत आहे अन्यथा सरकारचे नियम 'कचकड्या प्लॅस्टिक'चे असतात आणि त्यामुळेच त्याचे पालन करणे आपल्यावर बंधनकारक नसते हि धारणा अधिक बळावू शकेल आणि लोकशाही व्यवस्थेसाठी ते अधिक घातक ठरू शकते .

दृष्टिक्षेपातील उपाय :


  • ·         सर्वात महत्वाचे म्हणजे प्लॅस्टिक वापर हि समस्या नसून वापरलेले प्लॅस्टिक संकलन -विघटन हि खरी समस्या आहे हे मान्य करत सरकारने आणि स्थानिक पालिकांनी शहरांमध्ये ठिकठिकाणी डस्टबिन ठेवावेत , ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यात प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्र उभारावीत .

  • ·         भाजीसारख्या दैनंदिन अनेक  गोष्टींसाठी प्लॅस्टिकवापर टाळणे शक्य आहे आणि स्वच्छ परिसर हि केवळ सरकारची जबाबदारी आहे या धारणेला तिलांजली देत नागरिकांनी शक्य तेवढ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापर टाळावा .

  • ·         प्लॅस्टिक वापर कमी करण्यासाठी द्रव पदार्थ साठवणूक -वितरण प्रणालीत आवश्यक बदल करावेत .




सुधीर लक्ष्मीकांत दाणी   .   danisudhir@gmail.com 9869226272