प्रती ,
अध्यक्ष .
माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ ,
पुणे .
विषय : कॉपीला
आळा बसवत गुणवत्तेच्या खऱ्या कसोटीच्या तपासणीसाठी बोर्डाने हे करावे .
“ विद्यार्थी = टक्केवारी = गुणवत्ता ” हे
वर्तमान शिक्षण व्यवस्थेचे समीकरण झाले आहे . या समीकरणामुळेच विद्यार्थ्यांची ओळख
म्हणजे त्याने प्राप्त केलेली परीक्षेतील टक्केवारी आणि तीच त्याची गुणवत्ता ठरते
आहे . शिक्षणातील हे समीकरण मात्र व्यवहारी जीवनात प्रत्यक्षपणे अनेकवेळा 'अनुतीर्ण
' ठरत आहे. दिशाभूल करणारे ठरणारे ठरत आहे.
टक्केवारी = गुणवत्ता या समीकरणाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह असण्याचे मुलभूत कारण
हे आपल्या परीक्षा पद्धत्तीत दडलेले आहे . आपल्या एकूणच व्यवस्थेला जडलेल्या
टक्केवारीच्या रोगाची लागण शिक्षण व्यवस्थेला झाल्यामुळे गेल्या काही वर्षात गुणांची
बरसात करणारी अंतर्गत मूल्यमापन व्यवस्था , काठीण्य पातळीचे
सुलभीकरण , उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनात ढिला सोडलेला हात
याची प्रचीती येते आहे . कोणाला मान्य असो वा नसो वर्तमान शिक्षण व्यवस्थेच्या
गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे आणि त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करणे हे शिक्षण
विभाग , बोर्ड , शिक्षण आयुक्त
आणि तत्सम सर्वच घटकांचे प्राथमिक कर्तव्य आहे .
शिक्षण विभाग जर वाढत्या गुणवत्तेविषयी म्हणजेच
'स्काय रॉकेटींग मार्कांच्या टक्केवारी ' विषयी
निसंशय असेल तर त्यांनी पुढे दिलेल्या उपायाचा विचार करावा :
एकेकाळी विद्यार्थ्यांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या
गणिताचा या वर्षीच्या निकालात तब्बल १५ टक्यांची वाढ झाली आहे . सकृतदर्शनी हा स्वागतार्ह बदल दिसत असला तरी या
मागे गणिताच्या मुलभूत संकल्पनाची समज हे नसून गणिताचे प्रॉब्लेम सुद्धा पाठ करून लिहिण्याची कला , नवनीत
-गाईड मध्ये उपलब्ध असलेली उत्तरे आणि त्याचा कॉपी म्हणून होणारा उपयोग हे आहेत . यावर उपाय म्हणजे या
वर्षीपासून बोर्डाने गणिताच्या पेपर मध्ये छोटासा बदल करावा . प्रश्नपत्रिकेत
पुस्तकातील प्रश्नच या बोर्डाच्या धोरणाला अनुसरूनच प्रश्नपत्रिका असावी परंतु हे
करताना प्रश्नांच्या आकड्यात बदल करावेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना संकल्पना
समजली आहे त्यांना गणिते सोडवताना कुठलीही अडचण येणार नाही . अर्थातच मात्र
ज्यांच्या गणितीय संकल्पना पक्क्या नाहीत ,केवळ पाठांतर
करून उत्तरे लिहिण्याची सवय जडली आहे त्यांना मात्र अडचण होईल . दुसरे म्हणजे 'तयार
उत्तरे ' उपलब्ध नसल्यामुळे कॉपीचा ही प्रश्न उरणार नाही .
सांगावयाचा मुद्दा विस्तृतपणे ध्यान्यात
येण्यासाठी गेल्या वर्षीच्या भूमितेच्या एका प्रश्नाचा दाखल उपयोगी ठरेल . प्रश्न
असा : तीन पायरीचा विटांचा जिना तयार करावयाचा आहे . पायरीचे मोजमाप खालील प्रमाणे
: रुंदी २५ सेमी , उंची १२ सेमी , लांबी
५० सेमी . हा जिना तयार करण्यासाठी १२.५ सेमी x ६.
२५ सेमी x ४
सेमी आकराच्या किती विटा लागतील . मुलांनी हे उदाहरण संपूर्ण वर्षभरात वेगवेगळ्या
परीक्षेत किमान ४/५ वेळा सोडविलेले असते किंवा पाठ केलेले असल्यामुळे त्यांना
लागणाऱ्या विटांची संख्या पाठ असते . वस्तुत : प्रथम दिलेल्या माहितीवरून एका पायरीचा घनफळ काढून त्यास ६ (१+२+३ कारण दुसरी
पायरीचे घनफळ दुप्पट तर तिसऱ्या पायरीचे
घनफळ तिप्पट असणार ) ने गुणून आलेल्या उत्तरास विटाच्या घनफळाने भागून विटांची
संख्या काढणे अभिप्रेत आहे . विद्यार्थ्यांना
२८८ विटा हे उत्तर पाठ असते .
अर्थातच ज्या विद्यार्थ्यांची हि संकल्पना पक्की आहे त्यांना आकडेबदल
केल्यास काही फरक पडणार नाही . अर्थातच बोर्डालाही
विद्यार्थ्यांच्या पात्रतेवर शंका नसेल तर तत्सम बदलास हरकत नसावी .
दहावी -बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असूनही
अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकाचे वाचन करताना दिसत नाहीत . अगदी गाइड मधील ( * ) नसलेले प्रश्न देखील वाचत नाहीत हे वास्तव आहे . गणित विषया प्रमाणेच
अन्य विषयात देखील विद्यार्थ्यांच्या खऱ्या गुणवत्तेची कसोटी घेणारे बदल सहज शक्य
आहेत . मराठी , इतिहास-भूगोल , विज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ५० टक्के
गाळलेल्या जागा , जोड्या लावा , एका वाक्यातील उत्तरे या स्वाध्याया खालील
असव्यात आणि ५० टक्के नवीन प्रश्न असावेत जेणे करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके
वाचणे अनिवार्य होईल .
वर्णनात्मक प्रश्न देखील अगदी स्वाध्यायातिलच
असावेत हा अट्टाहास सोडून द्यायला हवा . ज्या विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकांचे
वाचन आहे त्यांना योग्य न्याय देण्यासाठी ५० टक्के प्रश्न हे नवीन स्वरूपाचे
असावेत . असे बदल केल्यास सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या मूळे कॉपीला आळा बसू
शकेल कारण तयार उत्तरे नसतील त्यामुळे पाहून उत्तरे लिहिण्याचा प्रश्नच निकालात
निघतो . अर्थातच हे उपाय बोर्डाच्या
कॉपीमुक्त परीक्षेच्या स्वप्नाला उभारी देणारे आहेत त्यामुळे याची अंमलबजावणी
करण्यात बोर्डाला हरकत नसावी .
शिक्षणातील तज्ञ यापेक्षा अधिक सक्षम उपाय
सुचवू शकतील परंतु त्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे बोर्डानी त्यासाठी एक पाऊल पुढे येण्याची. आज
स्टेट बोर्डाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे पडतात असा आरोप होत असतो त्या
मागील कारणांचा योग्य शोध घेत बोर्डाने परीक्षा पद्धतीत बदल करायला हवेत .
अर्थातच खऱ्या
गुणवत्तेची कसोटी जोखणाऱ्या बदलास बोर्डाचा मात्र जर विरोध असेल तर एकूणच
शिक्षणाच्या गुणवत्तेवर उभा केलेले प्रश्नचिन्ह अधिकच गडद होईल हे निश्चित .
प्रतिसादाच्या
प्रतीक्षेत .
कळावे आपला ,
सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,
प्रत : सर्व
विभागीय सचिव , माध्यमिक व उच्च
माध्यमिक मंडळ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा