बुधवार, ९ मार्च, २०१६

...... तर स्टेट बोर्ड बरखास्त करा .


प्रती ,
मा . शिक्षणमंत्री,
 महाराष्ट्र राज्य .

विषय : गैरप्रकारांनी मुक्त परीक्षा , परीक्षांचा दर्जा आणि पारदर्शकता शक्य नसेल  तर स्टेट बोर्ड बरखास्त करा .

           गेल्या काही वर्षात ; बोर्डाची परीक्षा =कॉपीचा सुकाळ , बोर्डाची परीक्षा =गैरप्रकारांना अभय , बोर्डाची परीक्षा =पेपरफुटी , पेपर मुल्यांकन =सावळा गोंधळ , बोर्डाची परीक्षा =केवळ सोपस्कार , बोर्डाची परीक्षा = शाळांची पास करून देण्याची जबाबदारी , बोर्डाची परीक्षा =
अंतर्गत मुल्यमापनाच्या नावाखाली गुणांची खैरात , बोर्डाची परीक्षा = पालक -नागरिकांनी केलेल्या तक्रारीला केराची टोपली , बोर्डाची परीक्षा =माहिती लपवणे , बोर्डाची परीक्षा = कोचिंग क्लासने महत्वाचे प्रश्न म्हणून जाहीर केलेल्या प्रश्नांची परीक्षा , बोर्डाची परीक्षा =कागदोपत्री ऑल वेल -अंमलबजावणीत मात्र सबशेल फेल यासम अनेक 'समीकरणे ' अधोरेखित  दिसत आहे   .



      गैरप्रकारांनी मुक्त बोर्डाची परीक्षा  हे गेल्या काही वर्षात दिवास्वप्न ठरते आहे . वस्तुतः उघड झालेले प्रकार हे केवळ हिमनगाचे टोक आहे . ग्रामीण भागात तर बोर्डाच्या परीक्षा या  केवळ सोपस्कार ठरत आहेत . शहरी भागात देखील कॉपीची कीड लागलेली आहे परंतु अजूनतरी ती 'पहिल्या स्टेज ' मध्ये आहे हेच काय ते वेगळेपण . परीक्षा नियंत्रण करणारे घटकच कॉपीचे पुरस्कर्ते झाल्यामुळे ' सब अंदर की बात ' झाकली जात आहे . पोलीस यंत्रणाच चोरी करू लागली तर चोर कोण पकडणार हे जसे न सुटणारे कोडे आहे तद्वतच जर संस्थाचालक , पर्यवेक्षक -केंद्रप्रमुख कॉपीचे खंदे समर्थक म्हणून काम करणार असतील तर कॉपी -गैरप्रकार कोण रोखणार हा यक्षप्रश्न आहे . प्रवेश घेतानाच पास करून देण्याची हमी देणाऱ्या शाळा कुठल्या तोंडाने कॉपीला आळा घालणार ? २०-३० हजारांचे पासिंगचे प्याकेज देणाऱ्या शाळा आजही अस्तित्वात आहेत .

   एका शिक्षकाने म्हटले आहे की , भविष्यात एखाद्या विद्यार्थ्याने नापास होण्यासाठी अर्ज केला तरी नापास होणे केवळ अशक्य आहे . यावरून बोर्डाच्या परीक्षांची दशा व दिशा सहज कळू शकते . हेच जर बोर्डाच्या परीक्षाचे अंतर्गत वास्तव असेन तर 'स्टेट बोर्ड 'नावाचा पांढरा हत्ती पोसण्यात काय हशील आहे . आम्हाला कोणीच काही विचारू शकत नाही आणि कोणी काही प्रश्न केले तरी आम्ही उत्तर देण्यास बांधील नाही अशी धारणा बोर्डाची झालेली दिसते .

         आनंददायी शिक्षण हे शिक्षण खात्याचे ब्रीदवाक्य आहे . त्याला साजेशी कृत्य म्हणजे बोर्ड बरखास्त करणे .म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद . ना विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेंशन ,ना पालकांना कोचिंग क्लासच्या लाखो रुपयांच्या फ़िसचे टेंशन . सर्वांसाठीच WIN -WIN सोल्युशन .

       बोर्डाच्या वर्तमान परीक्षा या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ' चालू ' असणारा खेळ ठरतो आहे . राज्यातील तमाम पालकांची मागणी आहे की , शिक्षण विभाग आणि बोर्ड दहावी -बारावीच्या परीक्षांकडे केवळ 'सोपस्कार ' म्हणून पाहणार असेन तर 'स्टेट बोर्ड ' बरखास्त करून या परीक्षा शाळा-महाविद्यालयांकडे सोपवाव्यात . सध्या आठवीपर्यंत असणारे ' प्रवेश घेणारे सर्व पास ' हे शासनाचे धोरण बारावीपर्यंत पुढे न्यावे . परीक्षांच्या केवळ सोपस्कारासाठी विद्यार्थी -पालकांचा  वेळ आणि श्रम वाया घालण्यात काय हशील आहे ,हा प्रश्न देखील ' योग्यच ' दिसतो .  सध्या खुल्या परीक्षा हा अलिखित नियम आहेच परंतु स्टेट बोर्ड बरखास्त करून कायदेशीर रित्या परीक्षा खुल्या केल्यास शैक्षणिक दुकानदारीला निश्चितपणे अच्छे दिन येतील आणि शासनाला देखील 'अच्छे दिनाची ' वचनपूर्ती केल्याचा झेंडा मिरवता येईल .

                 चूकभूल द्यावी -घ्यावी , तसदीबद्दल क्षमस्व .

        सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,९८६९२२६२७२  बेलापूर , नवी  मुंबई .


प्रत :सुयोग्य कार्यवाहीसाठी १) मा . शिक्षण आयुक्त , महाराष्ट्र राज्य , २) मा . शिक्षण सचिव ,महराष्ट्र राज्य , ३) मा . अध्यक्ष , स्टेट बोर्ड , महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा