शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

खाजगी क्लासच्या कार्यपद्धतीत "पारदर्शकता " येण्यासाठी सरकारने नियमावली बनवावी ….



             नीट /जेईई चा निकाल लागल्यानंतर बहुतांश  वर्तमानपत्रात पान -पान भरून आम्हीच कसे फर्स्ट 'क्लास' आहोत हे विद्यार्थी -पालकांच्या मनावर बिंबवणाऱ्या जाहिराती प्रकाशीत होत असतात . या वर्षी ऑल इंडिया रँक १ असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फोटोसह जवळपास ३ क्लासवाल्यानी या विद्यार्थ्यांच्या यशात आपलाच सिंहाचा वाटा असल्याचे जाहिराती प्रकाशीत झालेल्या असल्यामुळे क्लासच्या यशाची 'बनवा -बनवी ' समोर आली आहे . या आधीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत


 .
   सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की , जे क्लास चालक लाखो रुपये खर्च करून  क्लास जॉईन केल्यामुळे   ५/१० टक्के विद्यार्थ्यांनी रँक प्राप्त केलेल्या यशाचे  जाहीर प्रदर्शन करतात तेच क्लास अन्य ९० टक्के विद्यार्थ्यांच्या यशाबाबत गुप्तता का पाळतात . आपला क्लास  जॉईन केल्यामुळे विद्यार्थी  १०० टक्के विद्यार्थी  उत्तम यश प्राप्त करतात असा दावा करणारे क्लासचालक आपल्या क्लासमध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा लेखाजोखा विद्यार्थी व पालकांसाठी खुला का करत नाहीत ? हा जाहीर प्रश्न असल्यामुळे , क्लास चालकांनी याचे जाहीर उत्तर द्यावे अशी तमाम पालकांची अपेक्षा आहे .

खाजगी क्लाससाठी नियमावली हवीच :
     खाजगी क्लासेस हा व्यवसाय आहे हे नागडे सत्य आहे आणि ते कोणीच नाकारू शकत नाही . व्यवसाय म्हटलं की तिथे येणारे 'ग्राहक ' ठरतात . कुठल्याही व्यवसायासाठी काही नियम असतात आणि त्याच बरोबर ग्राहक म्हटले की 'ग्राहक हक्क ' देखील आलाच . या क्लासला जाणारे विद्यार्थी  हे 'ग्राहक ' आहेत आणि म्हणून त्यांच्या हक्कांचे जतन करणे देखील महत्वाचे आहेच . दुर्दैवाने वर्तमानात खाजगी क्लासवर कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे विद्यार्थी -पालकांना 'गिऱ्हाइक ' बनवले जात आहे .

          सर्वात महत्वाचे म्हणजे बहुतांश क्लास चालक हे संपूर्ण फीस प्रवेशाच्या वेळेसच घेत असल्यामुळे विद्यार्थी –पालकांचेपरतीचे दरवाजे ' आपसूकच बंद होतात . दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये जमीन -अस्मानाचे अंतर असले तरी एकदा भरलेले लाखो रुपयांचे शुल्क परत मिळत नसल्यामुळे पालक हतबल ठरतात . ज्या अपेक्षेने क्लासला घातले जाते त्याची परिपूर्ती होताना दिसत नाही हे ध्यानात येऊन देखील 'ठेविले अनंते तैसेची रहावे ' हा उपदेश पाळण्याशिवाय हातात काहीच नसते . एक प्रकारे हि पालकांची आर्थिक लूटच ठरते . हे टाळण्यासाठी क्लास नियंत्रण असणाऱ्या सरकारी नियंत्रकाने क्लाससाठी सर्वसमावेशक पालक -विद्यार्थी -क्लासचालक व त्याठिकाणी कार्यरत असणारे टिचिंग व नॉनटिचिंग स्टाफ या सर्व घटकांना समन्यायी असे नियम बनवणे व त्याची अंमलबजावणी करणे हि काळाची गरज आहे . आज शाळा -कॉलेजात जाणारी जेवढी विद्यार्थी संख्या आहे तेवढीच विद्यार्थी संख्या क्लासची देखील आहे . त्यामुळे क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना वाऱ्यावर सोडणे निश्चितपणे न्यायोचित ठरत नाही .



       क्लाससाठी पारदर्शकता अनिवार्य असावी :

              गुणवत्तेची परंपरा , विषयवार प्रभुत्व असणारा व प्रदीर्घ अनुभवी शिक्षक -अध्यापक , परिपूर्ण पायाभूत सुविधा , तणावमुक्त वातावरण , गुणवत्तेचा ध्यास असणारे प्रशासन , अभ्यासाचे उत्तम नियोजन , यशाची १०० टक्के खात्री , नियमीत सराव परीक्षा , प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष यासम आश्वासन ( खरं तर यास 'प्रलोभनं ' म्हणणं जास्त रास्त ठरेल ) मोठं मोठया जाहिराती म्हणून दिल्या जातात . अनेक ठिकाणी वास्तव मात्र वेगळेच असते .

             जाहिरातीतील प्रलोभने आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील तफावत आणि त्यातून विद्यार्थी -पालकांची होणारी दिशाभूल टाळण्यासाठी प्रत्येक क्लासला पारदर्शकता आणणे सक्तीचे करावे . यासाठी शासन -प्रशासनाने पाऊले उचलणे अभिप्रेत आहे कारण वर्तमान सरकार हे 'पारदर्शक कारभाराचे ' प्रणेते आहेत .

    सुरुवातीला नमूद एकाच विद्यार्थ्यांच्या यशावर अनेक क्लासचा दावा लक्षात घेता प्रत्येक क्लासला आपल्याकडे शिकत असणाऱ्या व गेल्या ५ वर्षात शिकलेल्या व यशप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा पब्लिकडोमेनवर टाकणे सक्तीचे असावे . आमच्याच क्लासचे विद्यार्थी हे एअर रँक मध्ये टॉप असतात असा छातीठोक दावा करणाऱ्या तथाकथीत बड्या क्लासने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नाव , प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतानाचे गुण , ४/५ लाख रुपये भरून प्राप्त केलेले गुण , ४/५ लाख रुपये घेऊन नीट /सीईटी मध्ये प्राप्त केलेले पर्सेन्टाइल , लाख /दोन लाख भरून दहावी /बारावीला प्राप्त केलेले गुण  यासम किमान गेल्या ३/५ वर्षांचा डेटा संकेतस्थळावर टाकायला हवा , नव्हे तशी सक्तीच असायला हवी जेणेकरून 'क्लासच्या यशाची परंपरा ' पाहूनच विद्यार्थी -पालकांना क्लासची निवड करता येईल , जाहिरातींच्या माध्यमातून होणाऱ्या दिशाभुलीला आळा बसू शकेल .

      त्याही पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी क्लासमधील शिक्षक /प्राध्यापकांची शैक्षणिक अर्हता . अनेक नामवंत क्लासमध्ये त्या त्या विषयांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नसणारे शिकवत असल्याचे विद्यार्थी -पालक सांगतात . हि सर्वात धक्कादायक गोष्ट आहे ,कारण आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार ? यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे क्लासमध्ये अध्यापन करणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक अर्हता संकेतस्थळावर टाकणे सक्तीचे असायला हवे.

क्लास ही शाळांना समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे . कितीही नामवंत शाळा असली तरी अगदी केजी पासून क्लास अनिवार्य ठरत आहेत . त्यामुळे खाजगी क्लाससाठी स्वतंत्र नियमावली अत्यंत आवश्यक असून "पारदर्शकतेची मशाल " खांद्यावरघेऊन राज्यकारभार करणाऱ्या सरकारने क्लासच्या कार्यपद्धतीत तातडीने पारदर्शकता आणण्याची गरज आहे . विद्यार्थी हे क्लासचे ग्राहक आहेत आणि त्यामुळेच त्यांना ग्राहक हक्काचे अधिकार देखील मिळायला हवेत .

दृष्टीक्षेपातील उपाय :

  • ·         क्लासमधील शिक्षक /अध्यापकांची शैक्षणिक अर्हता संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य करावे .
  • ·         मागील ३/५ वर्षातील क्लासमधील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मार्कांचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर टाकणे अनिवार्य असावे .
  • ·         प्रत्येक क्लासचालकाला  फीस केवळ चेकने व कार्डने घेणे सक्तीचे करावे .
  • ·         संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरक्कमी भरण्याचा नियम रदद्द करत ३/३ महिन्याचे शुल्क भरण्याची सुविधा पालकांना प्राप्त व्हावी .
  • ·         शुल्क परताव्याबाबत कालसचालकांची 'बनवेगिरी ' थांबण्यासाठी शुल्क परताव्यासाठीचे नियम बनवावेत .
  • ·         किमान ३ दिवसांचा डेमो क्लास विद्यार्थ्यांना मिळायला हवा .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी ९८६९ २२ ६२ ७२ danisudhir@gmail.com



लैंगिक शोषणाला आळा व लैंगिक शिक्षणास पूरक वातावरणासाठी समाजाचा दृष्टिकोन वैज्ञानिक व शास्त्रीय हवाय ...


    " ताकाला जाऊन भांडे लपवण्याच्यादृष्टिकोनातून 'लैंगिकते ' कडे पाहिले जात असल्यामुळे कितीही आधुनिकतेच्या गप्पा मारल्या जात असल्यातरी आजही आपल्याकडे  'लैगिक शिक्षण ' शालेय अभ्यासक्रमात हवे की नको याबाबत मतमतांतरे आहेत
      सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की , मानवी शरीरातील  पचनसंस्था , श्वसनसंस्था , मज्जासंस्था या प्रमाणेच 'प्रजननसंस्था ' हि देखील मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे उघडपणे मान्य करायला हवे . यास एकदा समाज मान्यता मिळाली की  ' लैंगिक शिक्षण ' असण्या -नसण्या बाबतचा प्रश्नच निकालात निघतो . तसेही  'कुठल्याही शिक्षणामुळे माणूस घडतोच , बिघडत तर नक्कीच नाही ' हा सार्वत्रिक अनुभव लक्षात घेता 'लैंगिक शोषण   लैंगिक शिक्षण ' हा विषय शालेय पातळीवर अनिवार्य असायला हवा असे दिसते .
वैज्ञानिक नाव हवे : नावात काय आहे? नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. नावावाचून कुणाचे काही अडत नाही, असे त्याला सांगायचे असेल, पण नावाला असे दुर्लक्षित करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीचे ,विषयाची नाव हीच  ओळख असते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ' सेक्स एज्युकेशन '.   सेक्स म्हटले की केवळ अश्लीलता, नर -मादी शारीरिक  संबंध या संकुचित दृष्टिकोनामुळे 'सेक्स एज्युकेशन ' म्हटले की नाके मुरडली जातात . त्यामुळे शालेय पातळीवर ' लैंगिक शोषण लैंगिक शिक्षण ' यास 'खऱ्या अर्थाने ' अंमलात आणावयाचे असेल तर सर्वप्रथम याच्या नावात बदल करणे गरजेचे दिसते .

                         सेक्स एज्युकेशन ऐवजी ' प्रजनन संस्थांचा अभ्यास '  , ‘ नैतिक शिक्षण ' , ‘ सेन्स एज्युकेशन’  किंवा  तत्सम वैज्ञानिक नावाने या विषयाचा अंतर्भाव करायला हवा जेणेकरून हा विषय शिकण्यासाठी येणाऱ्यांचा पूर्वग्रहदूषित असणार नाही . आपल्या समाजाच्या दांभिकतेमुळे आजवर या कडे 'झाकली मूठ ' किंवा 'अळीमिळी गुपचिळीयाच पद्धतीने पाहिले जात असल्यामुळे आवश्यक ज्ञानाचा /माहितीचा अभाव राहिल्यामुळे लैंगिक शोषणाच्या समस्येने ग्रासले आहे . या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात 'लैंगिक शिक्षण' अनिवार्यच करणे काळाची नितांत गरज आहे त्यासाठी सरकारने शिक्षण विभागाने तातडीने पाऊले उचलायला हवीत . आज जे काही थोड्याफार प्रमाणात काही शाळांमध्ये सेक्स एजुकेशन दिले जात आहे तो केवळ 'कागदी सोपस्कार ' आहे हे नागडे सत्य आहे . लैंगिक शिक्षणास पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी सर्वात आधी त्याच्या नावात 'नामबदल ' मात्र हवाच .  

तज्ज्ञांच्या मदतीनेच शिक्षण द्यायला हवे :   समाजात सेक्स एज्युकेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन 'निकोप नसल्यामुळे ' कार्यरत असणाऱ्या शिक्षक /शिक्षिकेकडून लैंगिक शिक्षणाचे धडे देताना शिकवणाऱ्या शिकणाऱ्या मध्ये अवघडलेपणा निर्माण होताना दिसतो . हे टाळण्यासाठी केवळ अभ्यासक्रमात समावेश करण्याचा सोपस्कार करण्यापेक्षा याबाबतीतील शिक्षण 'शास्त्रीय पद्धतीने ' देण्यासाठी तज्ञ् मंडळींच्या मार्फतच हे शिक्षण दिल्यास उद्दिष्टपूर्ती अधिक परिणामकारक पद्धतीने होऊ शकते .
           आजही काही शाळा ' टाटा सामाजिक विज्ञान संस्था' या सारख्या संस्थांच्या माध्यमातून लैंगिक शिक्षणाचे धडे देताना दिसतात आणि त्यांचे सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत असल्याचे त्या शाळा /कॉलेजस सांगतात .
   तज्ज्ञांच्या मार्फतच शिक्षण द्यायला हवे असा अट्टाहास करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे लैंगिक शिक्षण देताना योग्य भाषेचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे . शास्त्रीय भाषेतून हा विषय शिकवला जायला हवा त्यासाठी योग्य प्रशिक्षित तज्ञ हवेत .

सहेतुक -निर्हेतुक स्पर्शाचे ज्ञान हवे : 

               कृती मागच्या हेतू नुसार त्या कृतीचा परिणाम संभवतो  त्यामुळे  शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रयस्त व्यक्तीच्या स्पर्शाबाबतचे ज्ञान हि सेक्स एजुकेशनची पहिली पायरी ठरते . सहेतुक स्पर्श म्हणजे विशिष्ट भावनेने ,हेतूने केलेला स्पर्श तर निर्हेतुक स्पर्श म्हणजे निरपेक्ष भावनेने ,हेतूने केलेला स्पर्श . इंग्रजी भाषेत त्यास 'गुड टच '   ' बॅड टच ' असे संबोधले जाते .

                 'गुड टच '   ' बॅड टच ' यातील फरक वेळीच ओळखता येण्यामुळे बालकांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होते आहे नव्हे हि भारतातील मुलांच्या बाबतीतील सर्वात ज्वलंत समस्या आहे . जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) भारतामध्ये जगातल्या सर्वाधिक लैंगिक शोषित मुलांची संख्या आहे. प्रत्येक १५५ मिनिटामध्ये १६ वर्षाच्या आतील बालकावर बलात्कार होतो. तर दररोज बाल लैंगिक शोषणाचा एक तरी गुन्हा नोंदवला जातो.

             लहान मुलांना बऱ्याच वेळेला आपल्याशी काय होते आहे हेच कळत नाही . याचाच गैरफायदा घेत समाजकंटक एक एक पाऊल पुढे टाकत जातात . यासाठी बाल वयातच आई -वडील , आप्त स्वकीय यांनी केलेला स्पर्श त्रयस्त व्यक्तीने गैरहेतून केलेला स्पर्श ओळखता यावा या साठी त्यांना सर्वात आधी आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची योग्य माहिती जाणीवपूर्वीक पालकांनी शाळॆतून दयायला हवी .

       त्यानंतर टप्याटप्याने वाढत्या वयानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक ते वयाला समजतील अशा शब्दात जेवढे समजेल त्या प्रमाणात  ज्ञान दिल्यास मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषणाला आळा घालणे शक्य होऊ शकेल .

लैंगिक शोषणाची संकल्पना समजवा :

            बाल लैंगिक शोषण म्हणजे लहान मुलांच्या असहाय्यतेचा आणि दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन ताकदवान व्यक्तींकडून केले गेलेले शोषण होय.  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वात आधी ज्याच्यावर अन्याय होतो त्याला किमान आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव तर आधी  व्हायला हवी .  कोणत्याही प्रकारच्या असंमत लैंगिक छळास लैंगिक शोषण अशी संज्ञा आहे. कोणाच्याही मनाविरुद्ध केलेला कोणताही शारीरिक जवळकीचा प्रयत्न लैंगिक शोषण या सदरात मोडतो. सहकारी, कर्मचारी, कोणीही व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे अशी मनाविरुध्द शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करत असेल तर ते शोषण प्रकारात मोडते.      
       लैंगिक शोषण म्हणजे केवळ थेट शारीरिक आघात असे नसून अश्लील विनोद करणे, दिसण्यावरून, पोषाखावरून भाष्य करणे, काम करताना द्वयर्थी (वरवर सहज, पण ज्यातून अश्लील अर्थ सूचित होऊ शकतो अशी) भाषा वापरणे, मनावर विचित्र ताण येईल असे वागणे. असे सर्वच प्रकार लैंगिक शोषणामध्ये मोडतात. याशिवाय उगाचच स्पर्श करणे, रोखून पाहत राहणे, अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करणे, चिकटून उभे राहणे, स्वच्छतागृहात अश्लील मजकूर लिहिणे, मुद्दाम एकटक रोखून पाहत राहणे, इत्यादी प्रकारे शोषण होऊ शकते. लैंगिक शोषण हे एका प्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे असे मानले जाते. (व्याख्या: सौजन्य : विकिडपीडिया )

...  म्हणून औपचारिक शिक्षणाची गरज

     विविध कामसमस्यांनी मनोगंडांनी पछाडलेला तरुणवर्ग पाहताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे या सर्वाचे मूळ हे एकतर लैंगिकतेच्या अज्ञानात, डिजटल मीडियातून मिळणाऱ्या अपुऱ्या ज्ञानात किंवा विकृत ज्ञानातच दडलेले असते.  सेक्स एज्युकेशन बाबत अनेक सामाजिक गैरसमज असल्यामुळे अनेकांचा हा प्रश्न असतो की , सेक्स एज्युकेशनची गरजच काय ? पूर्वी आमच्या काळी कुठे होते सेक्स एज्युकेशन ? तरी आमचे काही अडले का ? आम्हालाही पोरंबाळं झालेच की ! ( अपत्याला जन्म देणे म्हणजेच सेक्स  हा सर्वात मोठा गैरसमज आहे

      होय ! हे ध्यानात घ्या की आता काळ बदलला आहे . पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे , ग्रामीण भागातील जीवन पद्धतीमुळे   अनेक प्रकारे अनौपचारिक शिक्षण मिळत असे . आता बदलत्या कालानुरूप अनौपचारिक शिक्षण लोप पावले गेले आहे . आजकाल आई सुद्धा आपल्या छोट्या मुलासमोर कपडे बदलत नाही . अपत्याने विचारलेल्या 'नको त्या  प्रश्नांना ' काय उत्तरे द्यायचे असा त्यामागील त्यांचा विचार दिसतो . '  मी कसा जन्मलो ' यासम प्रश्नांना गैरसमज पसरवणारे उत्तरे मिळत गेल्यामुळे  शरीराच्या विशिष्ट अवयवयाविषयी नाहक कमालीचे कुतुहूल निर्माण होते . अगदी / वर्षाच्या मुला -मुलींना  स्वतःच्याच विशिष्ट अवयवांना हात लावू , इथे हात लावू नको , तिथे हात लावू नको असे दरडावले जाते . त्यामुळे बालवयात संभ्रम निर्माण होतो , भीती निर्माण होती .

 नात्यातील अवघडले पणामुळे शिक्षण मिळत नसल्यामुळे शालेय पातळीवर औपचारिक सेक्स एज्युकेशन हि बदलत्या काळाची अनिवार्य गरज ठरते आहे .

दुर्दैवाची गोष्ट हि आहे की , लैंगिक शोषण करणारे हे बहुतांश वेळेला आप्तस्वकीय किंवा ओळखीतलेच असतात . यामुळे माहितीच्या अभावामुळे ज्यांच्यावर अत्याचार होतो आहे त्याला सुरवातीला या बाबत काहीच कळत नाही . त्यामुळे अशा प्रकारांना लवकर वाचा फुटत नाही आणि याचाच गैरफायदा घेत दीर्घकाळ अत्याचार केले जातातलैगिंक शोषणबाबत योग्य माहिती दिल्यास वेळीच विरोध केला जाऊ शकेल , त्याबद्दल वाच्यता केली जाईल मोठ्या प्रमाणात अशा प्रकारांना आळा घालणे शक्य होऊ शकेल .  ... आणि म्हणूनच लैंगिक शिक्षण असायलाच हवे .

      समाजाच्या प्रत्येक वर्गामध्ये अगदी बालवयापासून मुलगा -मुलगी हा भेद सातत्याने केला जात असल्यामुळे मुला -मुलींमध्ये आकर्षणाची भावना अधिक प्रबळ होते . पूर्वीच्या काळी १०-१५ वयापर्यँत मुलं-मुली एकत्र अनेक मैदानी खेळ खेळत असे त्यामुळे आपसूकच एकमेकाविषयीच्या नाहक आकर्षणाला मर्यादा येत असे . खेळातील स्पर्शातून , एकत्रितपणामुळे नजर मेली जात असल्यामुळे केवळ शारीरिक दृष्टीने बघितले जायचे नाही . वर्तमानात बाळ वयापासूनच खेळाच्या माध्यमातून होणारा  संवाद लोप पावल्यामुळे अधिकाधिक आकर्षणाच्या भावनेला खतपाणी मिळते आहे . त्यात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या माहितीच्या विस्फोटामुळे सेक्स एज्युकेशन 'नाजूक वळणावर ' आलेले आहे त्याला योग्य दिशा देण्यासाठी औपचारिक सेक्स एज्युकेशन हाच सर्वोत्तम पर्याय ठरतो .

सेक्स एज्युकेशनचा  “ व्यापक  “ परीघ :

                     सेक्स एज्युकेशन म्हणजे केवळ शरीर संबंधाबाबत माहिती या संकुचीत परिघाबाहेर गेल्यास लक्षात येईल की  , सेक्स एज्युकेशन चा परीघ व्यापक आहे . अगदी साधे उदाहरण घ्या . स्त्रियांच्या मासिक पाळीबाबत खुद्द वयात येणाऱ्या मुलींमध्ये देखील अज्ञान असल्यामुळे अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे . वस्तुतः ती एक स्त्री जीवनातील अत्यंत महत्वाची अशी ' शास्त्रीय शरीर प्रक्रिया ' आहे . पण योग्य वेळी त्याबाबतची माहिती दिली जात नसल्यामुळे अनेकांना मासिक पाळी हे संकट वाटते . सुरवातीलाच त्या बाबतची नाहक धास्ती बसतेयोग्य शिक्षणाने हे टाळले जाऊ शकते .

           पुरुषांच्या बाबतीत देखील हीच गत आहे . वस्तुतः वयात येणाऱ्या , मुलांमध्ये नैसर्गिक  शारीरिक बदलास अनुसरून   वीर्य निर्मीती हि नैसर्गिक प्रक्रिया आहे . लग्नापूर्वी हस्तमैथुनाच्या माध्यमातून त्याचे विरेचन हि देखील अगदी नैसर्गिक क्रिया पण त्याबाबत देखील योग्य माहिती अभावी गैरसमज निर्माण झालेले आहेत . नको त्या गोष्टीबाबतचा बागुलबुवा निर्माण केला गेल्यामुळे स्त्री -पुरुषांच्या नैसर्गिक क्रियांना पायबंद घालण्याच्या प्रवृत्तीमुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होताना दिसतात . शालेय अभ्यासक्रमात यासम मूलभूत नैसर्गिक  गोष्टींचा समावेश केल्यास अनेक समस्यांना आळा बसू शकेल . परंतु अगदी सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे ' " ताकाला जाऊन भांडे लपवण्याच्या " सामाजिक दृष्टिकोनामुळे  समस्यांचे क्लिष्टीकरण होते आहे .

डोळस लैंगिक शिक्षण निकोप समाजाचा पायाच :

         वर्तमानातील लैंगिक अत्याचारांबाबतची विस्फोटक  परिस्थिती पहाता  वस्तुतः आपल्याकडे बाल -किशॊर -तरुण प्रौढांसाठी देखील डोळस लैंगिक शिक्षणाची निकड आहे .  ‘लैंगिकतावयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे हाताळायला शिकण्याकरीता , लैंगिकतेच्या गैरस्वप्नात वाहत जाणे टाळण्यासाठी , सदोष लैंगिक प्रक्रियेमुळे उदभवणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधी टाळण्यासाठी डोळस ,शास्त्रीय ,वैज्ञानिक भाषेतील शिक्षण समाजातील सर्वच स्तरातील , वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर असणाऱ्यांसाठी गरजेनुसर देणे हा निकोप समाजाचा पाया ठरतो .

दांभिकतेची चौकट मोडायला हवी :  लैंगिकतेकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन हा दांभिकतेचा असल्यामुळे लैंगिकता ही खासगी, व्यक्तिगत घनिष्ट  बाब असते अशी सर्वसाधारण समाजधारणा असल्यामुळे बहुतांश व्यक्ती सहजपणे,उघडपणेसार्वजनिकपणे हा विषय मांडायला उद्युक्त होत नाही.  
    समस्या -प्रश्न नाकारल्याने ते अधिकच उग्र स्वरूप धारण करतात हे उघड्या डोळ्याने वर्तमानातील शालेय विद्यार्थ्यांचे , कॉलेजातील युवकांचे , आयटी क्षेत्रातील तरुण तरुणांचे स्वैर लैंगिक संबंधातून स्पष्ट होते .अशा प्रकारांमागचे मूलभूत कारण म्हणजे समाजाची लैंगिकतेबाबतची दांभिकता .लैंगिक सुखाविषयीची उत्सुकता वाटल्याने नवयुवावस्थेतील ही उत्तेजना विवाहापूर्वी कशी हाताळावी याचे योग्य ज्ञान मिळाल्याने घडलेले स्वैर लैंगिक संबंधाचे प्रमाण वाढते आहे आणि त्यातूनच वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होत आहेत . यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वात आधी आपल्या समाजाला दांभिकतेची चौकट मोडायलाच हवी . अन्यथा भविष्यात लैंगीक समस्यांची प्रमाण त्यातून उदभवणाऱ्या शारीरिक सामाजिक समस्यांचे प्रमाण वाढत जाईल हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्याची नक्कीच गरज असत नाही .

               नुकत्याच जाहीर झालेल्या क्राय या संस्थेने  जाहीर केलेल्या सरर्वेक्षणानुसार मुलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा रा क्रमांक आहे . लैंगिक शिक्षणाच्या अभाव हा अशा गोष्टींना पूरक ठरत आहे . मुलांचे लैंगिक शोषण , अल्पवयातील  गर्भधारणा त्याचे स्त्रीच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम ,लैंगिक संबंधातून पसरणारे रोग , लैंगिक शिक्षणाच्या अभावमुळे जडणारे विविध रोग तत्सम अनेक समस्यांवर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला लैंगिक शिक्षण अनिवार्यच हवे ... नव्हे ती एकविसाव्या शतकाची ती विशेष गरजच आहे .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी . ९८६९२२६२७२ /9004616272