शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

खाजगी क्लासच्या कार्यपद्धतीत "पारदर्शकता " येण्यासाठी सरकारने नियमावली बनवावी ….



             नीट /जेईई चा निकाल लागल्यानंतर बहुतांश  वर्तमानपत्रात पान -पान भरून आम्हीच कसे फर्स्ट 'क्लास' आहोत हे विद्यार्थी -पालकांच्या मनावर बिंबवणाऱ्या जाहिराती प्रकाशीत होत असतात . या वर्षी ऑल इंडिया रँक १ असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फोटोसह जवळपास ३ क्लासवाल्यानी या विद्यार्थ्यांच्या यशात आपलाच सिंहाचा वाटा असल्याचे जाहिराती प्रकाशीत झालेल्या असल्यामुळे क्लासच्या यशाची 'बनवा -बनवी ' समोर आली आहे . या आधीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत


 .
   सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की , जे क्लास चालक लाखो रुपये खर्च करून  क्लास जॉईन केल्यामुळे   ५/१० टक्के विद्यार्थ्यांनी रँक प्राप्त केलेल्या यशाचे  जाहीर प्रदर्शन करतात तेच क्लास अन्य ९० टक्के विद्यार्थ्यांच्या यशाबाबत गुप्तता का पाळतात . आपला क्लास  जॉईन केल्यामुळे विद्यार्थी  १०० टक्के विद्यार्थी  उत्तम यश प्राप्त करतात असा दावा करणारे क्लासचालक आपल्या क्लासमध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा लेखाजोखा विद्यार्थी व पालकांसाठी खुला का करत नाहीत ? हा जाहीर प्रश्न असल्यामुळे , क्लास चालकांनी याचे जाहीर उत्तर द्यावे अशी तमाम पालकांची अपेक्षा आहे .

खाजगी क्लाससाठी नियमावली हवीच :
     खाजगी क्लासेस हा व्यवसाय आहे हे नागडे सत्य आहे आणि ते कोणीच नाकारू शकत नाही . व्यवसाय म्हटलं की तिथे येणारे 'ग्राहक ' ठरतात . कुठल्याही व्यवसायासाठी काही नियम असतात आणि त्याच बरोबर ग्राहक म्हटले की 'ग्राहक हक्क ' देखील आलाच . या क्लासला जाणारे विद्यार्थी  हे 'ग्राहक ' आहेत आणि म्हणून त्यांच्या हक्कांचे जतन करणे देखील महत्वाचे आहेच . दुर्दैवाने वर्तमानात खाजगी क्लासवर कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे विद्यार्थी -पालकांना 'गिऱ्हाइक ' बनवले जात आहे .

          सर्वात महत्वाचे म्हणजे बहुतांश क्लास चालक हे संपूर्ण फीस प्रवेशाच्या वेळेसच घेत असल्यामुळे विद्यार्थी –पालकांचेपरतीचे दरवाजे ' आपसूकच बंद होतात . दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये जमीन -अस्मानाचे अंतर असले तरी एकदा भरलेले लाखो रुपयांचे शुल्क परत मिळत नसल्यामुळे पालक हतबल ठरतात . ज्या अपेक्षेने क्लासला घातले जाते त्याची परिपूर्ती होताना दिसत नाही हे ध्यानात येऊन देखील 'ठेविले अनंते तैसेची रहावे ' हा उपदेश पाळण्याशिवाय हातात काहीच नसते . एक प्रकारे हि पालकांची आर्थिक लूटच ठरते . हे टाळण्यासाठी क्लास नियंत्रण असणाऱ्या सरकारी नियंत्रकाने क्लाससाठी सर्वसमावेशक पालक -विद्यार्थी -क्लासचालक व त्याठिकाणी कार्यरत असणारे टिचिंग व नॉनटिचिंग स्टाफ या सर्व घटकांना समन्यायी असे नियम बनवणे व त्याची अंमलबजावणी करणे हि काळाची गरज आहे . आज शाळा -कॉलेजात जाणारी जेवढी विद्यार्थी संख्या आहे तेवढीच विद्यार्थी संख्या क्लासची देखील आहे . त्यामुळे क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना वाऱ्यावर सोडणे निश्चितपणे न्यायोचित ठरत नाही .



       क्लाससाठी पारदर्शकता अनिवार्य असावी :

              गुणवत्तेची परंपरा , विषयवार प्रभुत्व असणारा व प्रदीर्घ अनुभवी शिक्षक -अध्यापक , परिपूर्ण पायाभूत सुविधा , तणावमुक्त वातावरण , गुणवत्तेचा ध्यास असणारे प्रशासन , अभ्यासाचे उत्तम नियोजन , यशाची १०० टक्के खात्री , नियमीत सराव परीक्षा , प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष यासम आश्वासन ( खरं तर यास 'प्रलोभनं ' म्हणणं जास्त रास्त ठरेल ) मोठं मोठया जाहिराती म्हणून दिल्या जातात . अनेक ठिकाणी वास्तव मात्र वेगळेच असते .

             जाहिरातीतील प्रलोभने आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील तफावत आणि त्यातून विद्यार्थी -पालकांची होणारी दिशाभूल टाळण्यासाठी प्रत्येक क्लासला पारदर्शकता आणणे सक्तीचे करावे . यासाठी शासन -प्रशासनाने पाऊले उचलणे अभिप्रेत आहे कारण वर्तमान सरकार हे 'पारदर्शक कारभाराचे ' प्रणेते आहेत .

    सुरुवातीला नमूद एकाच विद्यार्थ्यांच्या यशावर अनेक क्लासचा दावा लक्षात घेता प्रत्येक क्लासला आपल्याकडे शिकत असणाऱ्या व गेल्या ५ वर्षात शिकलेल्या व यशप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा पब्लिकडोमेनवर टाकणे सक्तीचे असावे . आमच्याच क्लासचे विद्यार्थी हे एअर रँक मध्ये टॉप असतात असा छातीठोक दावा करणाऱ्या तथाकथीत बड्या क्लासने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नाव , प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतानाचे गुण , ४/५ लाख रुपये भरून प्राप्त केलेले गुण , ४/५ लाख रुपये घेऊन नीट /सीईटी मध्ये प्राप्त केलेले पर्सेन्टाइल , लाख /दोन लाख भरून दहावी /बारावीला प्राप्त केलेले गुण  यासम किमान गेल्या ३/५ वर्षांचा डेटा संकेतस्थळावर टाकायला हवा , नव्हे तशी सक्तीच असायला हवी जेणेकरून 'क्लासच्या यशाची परंपरा ' पाहूनच विद्यार्थी -पालकांना क्लासची निवड करता येईल , जाहिरातींच्या माध्यमातून होणाऱ्या दिशाभुलीला आळा बसू शकेल .

      त्याही पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी क्लासमधील शिक्षक /प्राध्यापकांची शैक्षणिक अर्हता . अनेक नामवंत क्लासमध्ये त्या त्या विषयांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नसणारे शिकवत असल्याचे विद्यार्थी -पालक सांगतात . हि सर्वात धक्कादायक गोष्ट आहे ,कारण आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार ? यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे क्लासमध्ये अध्यापन करणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक अर्हता संकेतस्थळावर टाकणे सक्तीचे असायला हवे.

क्लास ही शाळांना समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे . कितीही नामवंत शाळा असली तरी अगदी केजी पासून क्लास अनिवार्य ठरत आहेत . त्यामुळे खाजगी क्लाससाठी स्वतंत्र नियमावली अत्यंत आवश्यक असून "पारदर्शकतेची मशाल " खांद्यावरघेऊन राज्यकारभार करणाऱ्या सरकारने क्लासच्या कार्यपद्धतीत तातडीने पारदर्शकता आणण्याची गरज आहे . विद्यार्थी हे क्लासचे ग्राहक आहेत आणि त्यामुळेच त्यांना ग्राहक हक्काचे अधिकार देखील मिळायला हवेत .

दृष्टीक्षेपातील उपाय :

  • ·         क्लासमधील शिक्षक /अध्यापकांची शैक्षणिक अर्हता संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य करावे .
  • ·         मागील ३/५ वर्षातील क्लासमधील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मार्कांचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर टाकणे अनिवार्य असावे .
  • ·         प्रत्येक क्लासचालकाला  फीस केवळ चेकने व कार्डने घेणे सक्तीचे करावे .
  • ·         संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरक्कमी भरण्याचा नियम रदद्द करत ३/३ महिन्याचे शुल्क भरण्याची सुविधा पालकांना प्राप्त व्हावी .
  • ·         शुल्क परताव्याबाबत कालसचालकांची 'बनवेगिरी ' थांबण्यासाठी शुल्क परताव्यासाठीचे नियम बनवावेत .
  • ·         किमान ३ दिवसांचा डेमो क्लास विद्यार्थ्यांना मिळायला हवा .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी ९८६९ २२ ६२ ७२ danisudhir@gmail.com



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा