रविवार, २ ऑगस्ट, २०२०

शिक्षण व्यवस्थेस हानिकारक 'कृत्रिम गुणवत्तेच्या फुगवट्याला ' लगाम हवाच ....


                राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर सर्वत्र आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत याचे कारण म्हणजे यावर्षीचा " विक्रमी निकाल " . १०० टक्के मार्क्स मिळवणाऱ्यांची ९० टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्यांच्या संख्येत काही पटींनी वाढ झालेली दिसते . प्रश्न हा आहे की , गेल्या वर्षात शिक्षण खात्याने , शिक्षकांनी असा कुठला उपक्रम राबवला की , विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले ? याचे उत्तर नकारात्मक आहे . यावरून हेच अधोरेखीत होते की  " गुवत्तेतील खरे तर गुणांमधील वाढ हा कृत्रिम फुगवटा आहे आणि म्हणूनच त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे .

            ज्या व्यक्तीला आधीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये 'गंभीर आजार ' असल्याचे निदान झालेले असताना त्याच व्यक्तीच्या 'फुल बॉडी चेकअप ' च्या   मेडिकल रिपोर्ट मध्ये ती व्यक्ती संपूर्णपणे सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र ज्या प्रमाणे प्रश्नांकित ठरते तद्वतच एकीकडे 'प्रथम ' या संस्थेने वेळोवेळी खाजगी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा ,गणित या सारख्या विषयांचे मूलभूत कौशल्य जसे वाचन -लेखन , मूलभूत संकल्पना जसे बेरीज-वजबाकी -गुणाकार-भागाकार त्या त्या वर्गास आवश्यक पातळीचे नसल्याचे दाखवून दिलेले असताना बोर्डाच्या परीक्षेत मात्र तेच विद्यार्थी 'शंभर नंबरी हुशार , मेरीटवाले ' ठरतात , बोर्डाचा निकाल उच्चांकी लागतो हे सारे प्रश्नांकीतच आहे .

              दुःख निकाल उच्चांकी लागल्याचे नसून अशा कृत्रिम गुणवत्ता फुगवट्या मुळे  स्वतः विद्यार्थी पालकांची होणाऱ्या दिशाभुलीबाबतचे  हे  दुःख आहे . अशा फसव्या गोष्टींमुळे ज्या शिक्षणामुळे आयुष्याला 'दिशामिळणे अभिप्रेत आहे ते 'दिशाहीन ' करणारे ठरू शकते .

            'गुणवत्ता 'कागदावर दाखवली जात असली तरी प्रथम सारख्या स्वायत्त संस्थेच्या अहवालातून ती देखील केवळ दिशाभूलच आहे हे अनेकवेळा दिसून येते ते सत्यच असल्याचे उघड आहे कारण आजवर प्रथमच अहवाल नाकारण्याचे धाडस कोणी ही दाखवलेले नाही . आपल्या दुकानदारीला ग्राहक कमी पडू नयेत म्हणून मोकळ्या हाताने गुणांची खैरात केली जाते  त्यामागे महाविद्यालयांचे अर्थकारण कारणीभूत आहे हे ही नागडे सत्य आहे .

             केंद्रीय बोर्डाच्या निकालाची स्पर्धा  ( केंद्रीय मंडळाचे सर काही दर्जेदार आहे हि देखील एक शैक्षणिक अफवाच आहे , हेही ध्यानात ठेवायला हवे ) करताना 'गुणवत्तेचा निकाल ' लागू नये एवढीच माफक अपेक्षा शिक्षणप्रेमींना आहे . वाढता निकाल अनेकांना अभिमानस्पद वाटतही असेल पण अशा व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की  'वृथा स्वाभिमान आणि वास्तव ' यांच्यामध्ये ' सत्य ' नावाचा पडदा असतो तो पारदर्शक असल्यामुळे असत्याचा बुरखा कधी ना कधी फाटतोच .

गुणवत्तेचे प्रतिंबीब नीट ,सीईटी या स्पर्धा परीक्षेत का प्रतीत होत नाही ?:     ज्या महाराष्ट्रात केवळ ४८ हजाराच्या च्या जवळपास ९०  पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्यात भर CBSE आणि ICSE ची घातली की हा आकडा ६० हजारांच्या च्या आसपास जाईल तिथे राज्याच्या MHTCET मध्ये २००  पैकी १९०  च्या वर गुण घेणारे केवळ १० विद्यार्थी आणि ७५  टक्के म्हणजे १५०  गुण घेणारे केवळ हजार नऊशे. म्हणजेच  ६० हजार पैकी केवळ टक्के विद्यार्थी मागील वर्षी होते . हि विसंगती कशामुळे ? जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत गुणवंत दिसतात तेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आपली गुणवत्ता का सिद्ध करू शकत नाहीत . अर्थातच बोर्डाचा निकाल हा कृत्रिम गुणवत्तेचा फुगवटा आहे हेच सिद्ध होते .

      ज्यांनीही दहावीच्या मार्कांच्या बाबतीत लिबरल धोरण ठेवलं मग ते कोणतेही बोर्ड असो त्यांनी या शिक्षणाची वाट लावली हे मात्र नाकारता येणार नाही . कृत्रिम फुगवट्यामुळे अनेक पालकांची दिशाभूल होते आहे . बोर्डातील मार्क्स पाहून ते आपल्या पाल्याला डॉक्टर ,इंजिनियर 'बनवण्यासाठी ' / लाख फीस असलेले क्लास लावतात . परतू शेवटी वर्षांनी पितळ उघडे पडते पदरी निशारा पडते . त्यांना जर दहावीच्या निकालातच त्यांची खरी लायकी दिसली असती तर अशी स्थिती निर्माण झालीच नसती.

     गुणवत्तेच्या कृत्रिम फुगवट्यामागे अंतर्गत गुणांची खैरात हे ज्या प्रमाणे प्रमुख कारण आहे त्याच प्रमाणे परीक्षेत शिक्षक -पर्यवेक्षक -संस्थाचालक बोर्डाच्या सहकार्य अभयामुळे मोठया प्रमाणात  होणारी कॉपी हे देखील प्रमुख कारण आहे . सोप्या कडून अधिक सोप्याकडे असा शिक्षण व्यवस्थेचा होणारा प्रवास वास्तवात मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रवास मात्र अधिकाधिक खडतर बनवताना दिसतो आहे . भविष्यात यात बदल होणे अत्यतं निकडीचे आहे .


       गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आपल्या देशाचा गाडा हा टक्केवारीवरच चालतोटक्केवारीची लागण शिक्षण क्षेत्राला देखील झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणपत्रक हिच त्याची ओळख ठरु लागली   त्यामुळे  टक्केवारीचे भूत विद्यार्थी-पालक आणि शिक्षकाच्या मानगुटीवर स्वार  झाले  पर्यायाने त्यातूनच शिक्षण व्यवस्थेशी निगडित सर्व घटक कृत्रिम गुणवत्तेच्या  फुगवटा  करण्यास हातभार लावत आहेत . निकालाची वाढती टक्केवारी , विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये आकाशाला गवसणी घालणारी वाढ हि विद्यार्थी -पालक -शाळांना सकृतदर्शनी वरवर सुखावणारी असली तरी ती एकुणातच शिक्षण व्यवस्थेच्या आरोग्यास घातक आहे . कृत्रिम गुणवतेच्या फुगवट्याचा शिक्षण व्यवस्थेवर होणारा दूरगामी दुष्परिणाम लक्षात घेता , 'टक्केवारीच्या फुगवट्याला टाचणी लावण्याचे , लगाम घालण्याचे'   धाडस  शिक्षण खात्याने , शिक्षण मंत्र्यांनी बोर्डाने करणे अत्यंत निकडीचे आहे .

             सारांशाने , बहुतांश शिक्षणप्रेमी , शिक्षणतज्ञांचे हेच मत आहे की , मार्कांची  खिरापत वाटणारे धोरण बदला विद्यार्थ्यांना त्यांच्यातील वास्तवाचे भान राहील अशा परीक्षा पद्धतीचा स्वीकार करा .

                                                                                                                             सुधीर लक्ष्मीकांत दाणी

                               प्रतिक्रियेसाठी संपर्क :  danisudhir@gmail.com 9869226272  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा