गुरुवार, १७ मार्च, २०२२

खाजगी शैक्षणिक संस्थांना “लगाम” हवाच !

  


सरकारी यंत्रणांचे अर्थपूर्ण अभय ,  शैक्षणिक संस्थांच्या मनमानीला कारणीभूत !

  "विद्येचे माहेरघर "  अशी ओळख असणाऱ्या पुणेस्थित बिबेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल  स्कूलमध्ये फीस संदर्भात खुलासा मागण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकाला महिला बाउन्सर कडून झालेली मारहाण राज्यातील खाजगी शाळांची दादागिरीवर शिक्कामोर्तब करणारा आहे . अर्थातच हे अपवादात्मक प्रकार आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करणे आत्मघातकी पणाचे  खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराला खतपाणी घालत्यासारखे होईल .

    खेदाची गोष्ट हि आहे की ज्या ज्ञानमंदिरात देशाचे भावी सुसंकृत ,सुशिक्षित नागरिक घडवणे अपेक्षित आहे त्याच ज्ञानमंदिराला  बाऊन्सरची गरज पडावी हा एका अर्थाने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचाच पराभव ठरतो .

    राज्यात अनेक ठिकाणी पालक आणि संस्थचालक , पालक  शालेय प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष सुरु असतो . राज्यात विविध ठिकाणी अनियंत्रित शुल्कवाढीबाबत आंदोलने झालेली आहेत , होत आहेत .

       गेल्याच आठवड्यात नवी मुंबईतील एका नामांकित शाळेत ज्या विद्यार्थ्यांची फीस पूर्ण भरलेली नाही त्यांना २०/२५ मिनिटे वर्गाच्या बाहेर उभा केले  त्यांना हे सांगितले की , तुम्ही तर बेशरम आहातच पण तुमचे पालक देखील बेशरम आहेत . फीस  भरता तुम्हाला शाळेत पाठवताना त्यांना लाज वाटत नाही का ?  त्या संदर्भात काही पालक पुढे येत शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याचे समजते . अर्थात अशा तक्रारींचे  पुढे काय होते याचा इतिहास फारसा आशावादी नाही आहे .

        नाण्याला दोन बाजू असतात तद्वतच खाजगी शाळांच्या बाबतीत देखील संस्थाचालक -प्रशासनची एक बाजू आणि विद्यार्थी -पालकांची दुसरी बाजू असणार आहे . पूर्णतः पालक रास्त असतील किंवा चुकीचे असतील तसेच पूर्णतः संस्थाचालक -प्रशासन रास्त किंवा चुकीचे असतील . असे असले तरी शाळेत बाउन्सरची गरज पडणे यात प्रशासन - संस्थाचालकांच्या कारभारात कुठेतरी खोट आहे हेच दिसते . आजवर बाउंन्सरची गरज डान्सबार -बियरबार मध्ये ग्राहकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी  लागत होती ती वेळ शाळेवर येणे हे सुचिन्ह नव्हे .

खाजगी शाळांना दुट्टपी भूमिका :

              खाजगी शाळा संस्थाचालकांची भूमिका दुट्टपी असल्याचे वारंवार दिसून येते . एकीकडॆ 'खाजगी'च्या नावाखाली या संस्था माहिती अधिकारासह विविध नियमांना  कात्रजचा घाट दाखवतात तर दुसरीकडे मात्र 'सामाजिक संस्था " म्हणत  समाजहिताची झूल पांघरून अल्पदरात भूखंड पदरात पाडून घेतात . सिडको नवी मुंबई  कडून माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार नवी मुंबईतील अनेक नामवंत शाळांना सिडकोने अगदी  रु . इतक्या अल्पदराने भूखंड दिलेले आहेत .  केवळ शाळेच्या इमारतीसाठीच नव्हे तर शाळेसाठी ग्राऊंडची जागा देखील अल्पदरात दिलेली आहे . पण याच शाळा वर्तमानात "सामाजिक उत्तरदायित्वाला ' तिलांजली देत पूर्णतः "व्यावसायिक दृष्टीने " चालवताना दिसतात .  अगदी नर्सरीचे प्रवेशासाठी लाख -दीडलाख डोनेशन  लाखभर फीस आकारात आहेत . हि दुट्टपी भूमिका नव्हे काय ?

"धंदेवाईक"  दृष्टिकोनामुळे पारदर्शकतेचे वावडेच !

          वस्तुतः शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे . या क्षेत्रात येणाऱ्या व्यक्ती या सामाजिक भान असणाऱ्या अभिप्रेत आहेत . नव्हे महाराष्ट्राला तसा स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेगोरानडेभांडारकरलोकहितवादी आगरकरमहर्षी कर्वेगोपाळ कृष्ण गोखलेसयाजीराव गायकवाडविठ्ठल रामजी शिंदेशाहू महाराजविश्राम रामजी घोले असा दैदिप्यमान इतिहास आहे .

        अलीकडच्या काळात मात्र विद्यार्थी केंद्री शिक्षणव्यवस्था 'व्यवसायकेंद्री ' झालेली दिसते आहे . व्यवसाय म्हटला की त्यात नफेखोरी , गुप्ततेला महत्व असते . खाजगी शैक्षणिक संस्था  देखील  याच सूत्राने चालवलेल्या जात असल्याने त्यांना पारदर्शकतेचे वावडे असल्याचे दिसते . त्यांना पारदर्शकतेचे इतके वावडे असते की  अगदी बोर्डाच्या परीक्षेतील 'शाळांतर्गत मार्क्स ' देखील गुप्त ठेवण्याकडे त्यांचा कल असतो .  नवी मुंबईतील एका पालकाला १२वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेतील मार्क्स  प्राप्त करण्यासाठी थेट राज्य माहिती आयुक्तांचा दरवाजा ठोठवावा लागला होता यावरून खाजगी संस्थांना पारदर्शकतेचे किती वावडे आहे हे सहजपणे ध्यानात येते .

    या शैक्षणिक संस्थांचे दरवाजे पालकांसाठी केवळ फीस भरण्यापुरते उघडे असतात बाकी बाबतीत मात्र दरवाजे पूर्णतः बंद असतात .  लाख -दीडलाख शुल्क भरून  देखील आपल्या पाल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता ज्ञात करून दिली जात नाही . खरे तर खाजगी शाळातील शिक्षक  शिक्षण दर्जेदार असतात हाच मुळात जाणीवपूर्वक पसरवलेला "गैरसमज " आहे . "कमी पगारात जी व्यक्ती तयार होईल , जी व्यक्ती ५०/६० हजार पगारावर सही करत २०/२५ हजारात काम करण्यास तयार असतात अशाच व्यक्ती या पात्र ठरत असल्याने अगदी कलाशाखेचे पदवीधर विज्ञान -गणितासाठी नेमल्या जातात ".  पण खाजगी पणाच्या नावाखाली अशा गोष्टींबाबत गुप्तता पाळली जाते .

         सर्व सरकारी शाळा दर्जाहीन तर सर्व खाजगी शाळा दर्जेदार हा भ्रम आहे . नावात  'इंटरनॅशनल ' बिरुदावली लावणाऱ्या शाळांतील  विद्यार्थ्यांचा दर्जा देखील प्रश्नांकीतच असतो . 

    वस्तुतः शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र असल्याने सव शैक्षणिक संस्थांचा आर्थिक लेखाजोखा म्हणजेच फीस मधून प्राप्त रक्कम किती , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं पगारावर खर्च  , वीजबिल ,मालमत्ता कर , अन्य देखभाल खर्च याबाबतचा लेखाजोखा पालकांसाठी खुला असणे अभिप्रेत आहे . पण वास्तव अगदी याच्या विसंगत आहे .  रोगावरील औषधच भेसळयुक्त असेल , दर्जाहीन असेल तर रोग अधिक बळावतो तसेच भारतीय व्यवस्थांच्या बाबतीत होते आहे . व्यक्ती -राष्ट्राची जडघडण करणारे शिक्षणच "भ्रष्ट " झाल्याने देशातील सर्व व्यवस्था अधिकाधिक भ्रष्ट होताना दिसत आहेत .  करोड रुपये खर्च करून  खाजगी मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर होणाऱ्याकडून रुग्णसेवेची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे नव्हे काय ? शिक्षणाला वाघीनेचे दूध म्हटले जाते पण आज भारतात हे दूधच नासले आहे आणि म्हणुनच व्यवस्था देखील नासताना दिसत आहेत .

नियंत्रणशून्य व्यवस्था मनमानीस कारणीभूत :`111

     खाजगी शैक्षणिक संस्थांना देखील अनेक नियम लागू आहेत पण ते केवळ 'नावापुरतेच ' . राज्यातील बहुतांश शैक्षणिक संस्था या लोकप्रतिनिधी - नोकरशहा शी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष संलग्न असल्याने शासन कुठलेही असले तरी त्यांचा नियम -कायद्यांच्या अंमलबजावणी बाबत सॉफ्ट कॉर्नर असतोच असतो आणि म्हणून  खाजगी संस्थांना  मोकळे रान मिळते आहे , शिक्षण नियंत्रण  शासकीय यंत्रणाच धाक उरलेला नाही .

 कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षण असल्याने शाळांच्या अनेक गोष्टींवरील खर्चाच्या बाबतीत बचत झालेली असल्याने खुद्द मा . न्यायालयाने शुल्कात १५ टक्के  कपातीचा आदेश दिला होता पण अनेक शाळांनी त्या आदेशाचे पालन केलेले नाही . उलटपक्षी पालकांनी शुल्क भरले नाही या नावाखाली शिक्षकांना ५० ते ८० टक्के पगार दिला तर दुसरीकडे पालकांकडून पूर्ण शुल्क वसूल केले . 

अल्पसंख्याक दर्जाची ढाल नियमांना टाळण्यासाठी :

  अल्पसंख्याक दर्जाच्या  शैक्षणिक संस्थांना  नियंत्रणाच्या अनेक नियम /कायद्यापासून सूट असते . याचा गैरफायदा उठवत महाराष्ट्रातील गेल्या -१० वर्षात 'अल्पसंख्याक दर्जा ' प्राप्त  करून घेतला आहे . वस्तुतः अल्पसंख्याक दर्जासाठी त्या त्या वर्गाचे किमान ५० टक्क्याहून अधिक ऍडमिशन असणे अनिवार्य असते . सलग  वर्षापेक्षा अधिक काळ या अटींची पूर्तता झाली नाही तर अल्पसंख्यांक दर्जा लागू होत नाही . पण प्रत्यक्षात ९० टक्के अल्पसंख्याक दर्जा प्राप्त  शैक्षणिक संस्थात  १०./२० टक्के देखील विद्यार्थी अल्पसंख्याक गटातील नसतात . तरीही अल्पसंख्याक दर्जाची ढाल वापरून नियम -कायद्यांना केराची टोपली दाखवली जाते .

  सारांश हाच की  केवळ एखाद्या दुसऱ्या शाळेवर कारवाई करून फारसा फरक पडणार नाही . सरकारची धारणा 'प्रामाणिक ' असेल तर राज्यातील सर्वच खाजगी शैक्षणिक संस्थांवर  अत्यंत कडक निर्बंध लावणे क्रमप्रात ठरते . ज्या रोगावर शस्त्रक्रियेची गरज आहे तिथे मलमपट्टी करणे म्हणजे रोग अधिक बळावण्यास संधी देण्यासारखे ठरते . 

  महाराष्ट्रात तूर्त तेच होताना दिसते आहे आणि म्हणून शैक्षणिक संस्थांना "अच्छे दिन"  आहेत  विद्यार्थी -पालकांची मानसिक -आर्थिक ससेहोलपट होते आहे . 

विद्यार्थी -पालकांना अच्छे दिन येण्यासाठी जनरेटा , सामाजिक संस्थांचा मोठा रेटा आवश्यक आहे आणि वर्तमानात त्याचा दुष्काळ आहे .

 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,

९८६९२२६२७२ danisudhir@gmail.com

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा