मंगळवार, १७ जुलै, २०१८

...तर प्लॅस्टिकबंदी हा निव्वळ फार्सच ठरतो !



       कुठल्याही समस्येच्या मुळाशी जात त्याची सोडवणूक करण्यापेक्षा त्या प्रश्नाला /समस्येला बगल कशी द्यावयाची यात भारतीय प्रशासन आणि राज्यकर्त्यांचा हातखंडा असतो याची प्रचिती देणारा निर्णय म्हणजे 'प्लॅस्टिक बंदी ' . सकृतदर्शनी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने व नाले -गटारे -परिसर स्वच्छता , प्लॅस्टिक सेवनातून प्राण्यांची होणारी ससेहोलपट याकरीता अनिवार्य  आणि स्वागतार्ह  असल्याचे 'भासवले ' जात असले तरी व्यावहारिक दृष्टीने प्लॅस्टिक बंदीच्या यशस्वतेबाबत साशंकता आहे . 
 
                   वस्तुतः  कुठल्याही समस्येचे प्रामाणिक निराकरण करावयाचे असेल तर मुळात त्या समस्येचे मूळ जाणून घेणे आवश्यक असते . यामार्गाचा अवलंब केला तरच समस्येचे समूळ उच्चाटन शक्य होते . प्रश्न /समस्या नीटपणे समजून घेतली तरच त्या समस्येच्या निर्मूलनासाठी आवश्यक आणि परिणामकारक उपाययोजना करणे शक्य होते , अन्यथा समस्येचे निर्मूलन करण्यासाठी उचलली पाऊले केवळ आणि केवळ उपचार /फार्स ठरू शकतात . प्लॅस्टिक बंदीच्या बाबतीत असेच होण्याची शक्यता अधिक दिसते .


प्लॅस्टिकबंदी यशस्वीतेसाठी सक्षम पर्याय आवशकच :

      वर्तमानात दूध -तेल यासम द्रव पदार्थापासून ते औषधे यासारख्या गोष्टीसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक लक्षात घेता प्लॅस्टिक हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि त्यामुळेच प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्याअगोदर प्लॅस्टिकला समर्थ पर्याय उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे होते . दूध -तेल आता कागदाच्या पिशवीतून न्यायाचे का ? यासम समाजमाध्यमातून फिरणारे संदेश हेच अधोरेखीत करतात की , जनमानस देखील प्लॅस्टिक समस्येच्या निर्मूलनाबाबत जागरूक आहे परंतू ती संवेदनशीलता व्यवहारात उतरवण्यासाठी त्यास योग्य पर्यायाची गरज आहे .

        सरकारने मात्र याविषयीचा कुठलाही पर्याय उपलब्ध न करता थेट प्लॅस्टिकबंदीचा अव्यवहार्य निर्णय घेतला आणि आता पुन्हा एक एक पाऊल मागे घेण्यास सुरुवात केली आहे . 

      प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामागे  सरकारने पर्यावरण रक्षणाचा मूद्दा महत्वाचा असल्याचे म्हटले आहे . पर्यावरणाप्रती सरकारची  एकुणातच असेलेली संवेदशीलता लक्षात घेता हे कारण देखील समर्थनीय ठरत नाही . एकुणातच आपल्याकडील राजकीय आणि प्रशासकीय संस्कृती लक्षात घेता "पर्यावरण आणि सरकार " हे चुंबकाचे दोन टोक ठरतात आणि त्यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी प्लँस्टिकबंदी हे समर्थन देखील शुद्ध दांभिकताच ठरते . ज्या ठिकाणी शहरातील घराघरामधील सांडपाणी -मलमूत्र , गटाराचे पाणी , फॅक्टरीचे दूषित पाणी  कुठलीही प्रक्रिया न करता सर्रासपणे नदीत सोडले जाते , टेकड्या उद्धवस्त करून इमारती निर्माण केल्याजातात आणि त्यास सरकारी परवानगी मिळते ते पाहता सरकार व राज्यकर्त्यांचे पर्यावरण रक्षणाचे आश्रू हे केवळ मगरीचे आश्रू ठरतात .

पूर्वतयारीतील अपयश म्हणजे अपयशाची तयारी ..

    सरकारचा प्लॅस्टिकबंदी  अंशतः शिथिल हा निर्णय पाहता सर्वांनी आधीच गृहीत धरल्याप्रमाणे आपल्या कडील प्रशासकीय आणि राजकीय रूढीपरंपरेस धरून अखेर प्लास्टिकबंदीची "अपयशाकडे " वाटचाल सुरु झालेली आहे असे दिसते . प्लॅस्टिक बंदी हा अभ्यासपूर्ण निर्णय नव्हता तर केवळ एक नाटक होते हेच यातून दिसून येते . शैक्षणिक असो की जीवन व्यवहारातील कुठलीही परीक्षा असो त्यात यश प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी हवीच हा साधा नियम . अन्यथा " पूर्वतयारीतील अपयश म्हणजे अपयशाची तयारी " या नियमाप्रमाणे परीक्षेत नापासाचा शिक्का ठरलेलाच .


  वापरलेले प्लॅस्टिक संकलन -विघटन : खरी समस्या :
         
      गृहीतक चुकले की अंतिम निष्कर्ष चुकणारच हा नियम लक्षात घेता प्लॅस्टिकचा भस्मासुर (?) निर्मूलनाकरिता प्लॅस्टिकबंदी हा निर्णय केवळ धूळफेक करणारा ठरतो . मुळातच प्लॅस्टिकच्या संपूर्णबंदी मागे मुंबईतील " २६ जुलै" सारखी  जी कारणे पुढे केली जातात तीच दिशाभूल करणारी आहेत . भारतात प्लॅस्टिकचा भस्मासुर उभा राहण्यामागे प्लॅस्टिकचा वापर हि मूलभूत समस्या नसून प्लॅस्टिकचे निर्मूलन हि खरी समस्या आहे . सक्षम प्लॅस्टिक निर्मूलन व्यवस्था उभा करणे , प्लॅस्टिकच्या सुयोग्य वापराबाबत नागरीकांमध्ये सजगता व संवेदशीलता निर्माण करणे हि सरकारची जबाबदारी आहे आणि आपले मूलभूत कर्तव्य टाळण्यासाठी सरकार 'संपूर्ण प्लँस्टिकबंदी सारखा उपाय आणि दंडात्मक कारवाईतून नागरिकांची पिळवणूक ' या अव्यवहार्य मार्गाचा वापर करते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . 

        बहुतांश युरोपियन देशात प्लॅस्टिकचा सर्रासपणे वापर केला जात असला तरी तिथे कुठेही रस्त्यावर वा परीसरात प्लॅस्टिकचा कचरा दिसत नाही . यामागचे प्रमुख कारण म्हणजे या -या ठिकाणच्या स्थानिकप्रशासनाने निर्माण केलेली 'प्लॅस्टिक संकलन व प्लॅस्टिक निर्मूलन व्यवस्था व नागरीकांचे संवेदनशील वर्तन  '.  प्रश्न हा आहे की , जे अन्य देशातील प्रशासनाला ,राजकीय नेतृत्वाला शक्य आहे ते भारतीय प्रशासनाला ,राजकीय नेतृत्वाला का शक्य नाही ?

             शैक्षणिक असो की जीवन व्यवहारातील कुठलीही परीक्षा असो त्यात यश प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी हवीच हा साधा नियम . अन्यथा " पूर्वतयारीतील अपयश म्हणजे अपयशाची तयारी " या नियमाप्रमाणे परीक्षेत नापासाचा शिक्का ठरलेलाच .

               कुठलाही नियम न पाळणे हाच खरा नियम हि कार्यपद्धती लक्षात घेता प्लॅस्टिकबंदी नागरीक -सरकार -राज्यकर्त्यांच्या विस्मरणात जाईल आणि पुन्हा कधीतरी ती लादली जाईल .  अभ्यास न करता परीक्षेला बसलयास नापास होणे निश्चितच असते याचा विचार करून सरकारने भविष्यात प्लॅस्टिकबंदी लावण्याआधी प्लॅस्टिकबंदीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक सर्व तयारी करणे अपेक्षीत आहे अन्यथा सरकारचे नियम 'कचकड्या प्लॅस्टिक'चे असतात आणि त्यामुळेच त्याचे पालन करणे आपल्यावर बंधनकारक नसते हि धारणा अधिक बळावू शकेल आणि लोकशाही व्यवस्थेसाठी ते अधिक घातक ठरू शकते .

दृष्टिक्षेपातील उपाय :


  • ·         सर्वात महत्वाचे म्हणजे प्लॅस्टिक वापर हि समस्या नसून वापरलेले प्लॅस्टिक संकलन -विघटन हि खरी समस्या आहे हे मान्य करत सरकारने आणि स्थानिक पालिकांनी शहरांमध्ये ठिकठिकाणी डस्टबिन ठेवावेत , ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यात प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्र उभारावीत .

  • ·         भाजीसारख्या दैनंदिन अनेक  गोष्टींसाठी प्लॅस्टिकवापर टाळणे शक्य आहे आणि स्वच्छ परिसर हि केवळ सरकारची जबाबदारी आहे या धारणेला तिलांजली देत नागरिकांनी शक्य तेवढ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापर टाळावा .

  • ·         प्लॅस्टिक वापर कमी करण्यासाठी द्रव पदार्थ साठवणूक -वितरण प्रणालीत आवश्यक बदल करावेत .




सुधीर लक्ष्मीकांत दाणी   .   danisudhir@gmail.com 9869226272






गुरुवार, १० मे, २०१८

परीक्षा काॅपीमुक्त का हाेत नाहीत?

(दिव्य मराठी वृत्तपत्रात १० मे २०१८ रोजी प्रकाशीत झालेला लेख )
दरवर्षी बाेर्डाच्या परीक्षेतील त्याच त्या चुकांच्या पुनरावृत्तीमुळे न्यायपूर्ण परीक्षांची स्वप्नपूर्ती असंभव असेल तर अशा बोर्डाची बरखास्ती हाच सर्वोत्तम पर्याय ठरतो ही जनभावना रास्त नव्हे काय? बोर्डच बरखास्त करा ही भावना निश्चितपणे वेदनादायी असली तरी केवळ परीक्षांचा खेळखंडोबाच होणार असेल तर विद्यार्थी, पालकांनी हा अन्याय किती दिवस सहन करायचा? हादेखील एक प्रश्नच आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या वेळेस चूक झाली तर समजू शकते, पण ती जर संस्कृतीच ठरणार असेल तर ते अक्षम्यच ठरत नाही का? 
विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अध्ययनाचे मूल्यमापन करत सदरील विद्यार्थी पुढील वर्गात शिक्षणासाठी पात्र आहे की नाही यासाठीच्या मूल्यमापनाचा एकमेव मार्ग म्हणजे परीक्षा. यामुळे वर्तमान शिक्षण व्यवस्थेत परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात दहावी -बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हटल्या तर विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंबच वर्षभरासाठी परीक्षेतील यशासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतात. अन्य सर्व गोष्टींना फाटा देत परीक्षेची तयारी केली जाते. या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या परीक्षा या संपूर्णपणे पारदर्शक, गैरप्रकारांनी मुक्त, अभ्यास करून परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणाऱ्या, तटस्थपणे योग्य मूल्यमापन करणाऱ्या असायलाच हव्यात, असे महाराष्ट्रातील तमाम पालकांचे स्वप्न असते. वास्तवात मात्र प्रतिवर्षी विद्यार्थी-पालकांचा स्वप्नभंग होतो आणि बोर्ड प्रत्येक वेळेस चौकशी करून सुयोग्य कारवाई करू, अशी 'सरकारी छाप' उत्तरे देऊन वेळ मारून देताना दिसत आहे. बोर्डाच्या निष्क्रियतेमुळे
परीक्षा = पेपरफुटी, परीक्षा =कॉपी , परीक्षा =सावळा गोंधळ' अशी नवनवीन समीकरणे समाेर येत अाहेत. 

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पेपरफुटी, उत्तरपत्रिका गहाळ होणे -जळणे, परीक्षा केंद्रांना येणारे जत्रेचे स्वरूप, परीक्षा केंद्रांतील पर्यवेक्षकाकडूनच कॉपीला मिळणारे अभय, इंटर्नल गुणांसाठी अर्थपूर्ण ठरणारी पाकीट संस्कृती, कृत्रिम गुणवत्ता फुगवट्यासाठी मूल्यांकन पद्धतीतील लवचिकता, स्वयंअर्थसाहाय्यित शाळा -कॉलेजांकडून प्रवेश घेतानाच परीक्षेतील यशाची दिलेली १०० टक्के खात्री, ज्या शिक्षक -प्राध्यापकांची कडक पर्यवेक्षक म्हणून ख्याती आहे त्यांना जाणीवपूर्वक पर्यवेक्षक म्हणून टाळणे, परीक्षापूर्व हॉलतिकिटांमधील घोळ, परीक्षापश्चात गुणांकन -मार्कशीटमध्ये होणारे घोळ, बोर्डातील व्यक्तीशी संधान साधून गुण वाढवले जाण्याची संस्कृती यासम घटनांची मालिका अटळपणे सुरू आहे. प्रश्न हा आहे की, बोर्डाची भूमिका संवेदनशील आणि गैरकृत्यांना आळा घालणारी असेल तर प्रतिवर्षी गैरप्रकारांची व्याप्ती का वाढते आहे? 
मुंबई विभागात यावर्षी तर दहावीच्या पाच प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झालेले आहे. अर्थातच उघडकीस येणारे प्रकार हे गैरप्रकारांच्या हिमनगाचे केवळ टोक आहेत. बारावीच्या रसायनशास्त्रात प्रश्न चुकल्यामुळे ७ गुणांची खैरात करण्याची नामुष्की बोर्डावर ओढवली आहे. भोंगळ कारभाराची परिसीमा म्हणजे विज्ञान परीक्षेचा बोर्डाचा पेपर आणि वर्तमानपत्रात सराव प्रश्नपत्रिका म्हणून छापलेला पेपर एकच असल्याचे म्हटले जाते आहे. यापेक्षा असंवेदनशील कारभाराचा नमुना तो काय असू शकतो? 
१९६५ ला स्थापन झालेल्या आणि सध्या ९ विभागीय मंडळांच्या मदतीने महाराष्ट्र राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा घेणारे मंडळ याही वर्षी प्रकाशझोतात आहे ते नकारात्मक गोष्टींमुळे. होय! मान्य आहे की, कुठलीच यंत्रणा १०० टक्के परिपूर्ण असत नाही, पण प्रश्न आहे की त्याच त्या चुकांची पुनरावृत्ती करण्यात काय शहाणपण असू शकते. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणाऱ्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांतील चुका टाळण्यासाठी स्काय रॉकेटिंग तंत्रज्ञानाची गरज नाही, गरज आहे ती सतर्कता, संवेदनशीलता व जबाबदारीची जाणीव असण्याची. पेपर सेट करण्यासाठी सीनियर आणि अभ्यासू १० सदस्यांची टीम असते. प्रश्न हा आहे की, एवढ्या एक्स्पर्ट मंडळींना ४ पानी प्रश्नपत्रिकेतील चुका 'नजरेत' का येत नाहीत? ७० मार्कांच्या प्रश्नपत्रिकेत ७ मार्कांच्या चुका हाेतात, हे कशाचे द्याेतक ठरते. आदर्श उत्तरपत्रिकेतील (Model Answer) चुकांसाठी ज्या बोर्डाला २ सप्लिमेंटची गरज लागते, ज्या जबाबदार व्यक्तींकडून या चुका झाल्या आहेत त्यांच्यावर बोर्ड काय कारवाई करणार आहे? दरवर्षी त्याच त्या चुकांच्या पुनरावृत्तीमुळे न्यायपूर्ण परीक्षांची स्वप्नपूर्ती असंभव असेल तर अशा बोर्डाची बरखास्ती हाच सर्वोत्तम पर्याय ठरतो ही जनभावना रास्त नव्हे काय? बोर्डच बरखास्त करा ही भावना निश्चितपणे वेदनादायी असली तरी परीक्षांचा केवळ खेळखंडोबाच होणार असेल तर विद्यार्थी, पालकांनी हा अन्याय किती दिवस सहन करायचा? हादेखील एक प्रश्नच आहे. अन्य बोर्डांच्या बाबतीत अशी ओरड का होत नाही? राज्य बोर्डाची विद्यार्थी संख्या जास्त असली तरी या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका काढावी लागते ना? अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या वेळेस चूक झाली तर समजू शकते, पण ती जर संस्कृतीच ठरणार असेल तर ते अक्षम्यच ठरते. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांचीदेखील जास्त ओरड न झाल्यामुळे हे प्रकरण दडपून टाकण्यात अाल्याचे शिक्षक खासगीत सांगतात. 
इच्छा तेथे मार्ग या न्यायाने बोर्डाने प्रामाणिकपणे दोषमुक्त परीक्षा घ्यायच्याच ठरवल्या तर अनेक मार्ग उपलब्ध आहेत. परंतु, खरे तर आजवरचा इतिहास पाहता बोर्डाचेच प्रामाणिक धाडस हे गैरप्रकारमुक्त परीक्षा' घेण्याचे दिसत नाही. खऱ्या अर्थाने कॉपीमुक्त परीक्षा घेतल्यास बोर्डाचा निकाल अर्ध्यावर येईल या धास्तीमुळे बोर्ड केवळ कॉपीमुक्त अभियानाचे नाटक' करताना दिसते आहे. समाजाला दिशा देणे ज्या शिक्षण व्यवस्थेतून अभिप्रेत आहे, त्याच शिक्षण व्यवस्थेकडून समाजाची दिशाभूल होणे समाजहिताचे ठरत नाही, म्हणूनच विद्यमान शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री या विषयाकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहून शिक्षण व्यवस्थेत 'अच्छे दिन' आणतील, अशी अपेक्षा. 

गैरप्रकारावर संभाव्य उपाय बोर्डाची 'गैरप्रकारमुक्त परीक्षा' हेच प्रामाणिक ध्येय असेल तर बोर्डाने गणिताची प्रश्नपत्रिका तयार करताना स्वाध्यायाखालील प्रश्न जसेच्या तसे न देता, प्रश्नाचे स्वरूप तेच ठेवत त्यातील किमान आकडे बदलावेत. यामुळे गाइडच्या आधारे केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कॉपीला प्रतिबंध बसेल. असेच उपाय अन्य विषयांबाबतीतदेखील संभव होऊ शकतात. 
ज्या विषयाचा पेपर आहे त्या सर्व विषय शिक्षकांना अन्य कामात व्यग्र ठेवल्यास स्वतःच्या विषयाचा निकाल वाढवण्यासाठी शिक्षक पुरस्कृत कॉपीला आळा घालता येऊ शकेल. 
मदर सेंटर म्हणजे विद्यार्थ्यांना तो ज्या शाळेत शिकत होता तीच शाळा /कॉलेज परीक्षा केंद्र म्हणून देणे ही संकल्पना मोडीत काढत विद्यार्थ्यांना त्रयस्थ शाळा /कॉलेज परीक्षा केंद्र म्हणून देणे हा उपायदेखील उत्तम उपाय ठरू शकतो. 
प्रसारमाध्यमांना परीक्षा केंद्राच्या चित्रीकरणास परवानगी दिल्यास गैरप्रकारांना आळा बसू शकेल. 
प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करून त्या त्या विभागातील शिक्षणबाह्य सरकारी अधिकारी, त्रयस्थ पालक, सामाजिक संस्था यांच्यासाठी ते केंद्राच्या एका वर्गात उपलब्ध करून दिल्यास ते त्रयस्थ पर्यवेक्षकाची भूमिका बजावू शकतील.