सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

शिक्षक -समाज 'संवाद ' पूल हवाच ...




                    समाज मग तो कालचा असेल , आजचा असेल वा उद्याचा असेल या समाजाचा खरा शिल्पकार हा 'शिक्षक'च होता , आहे आणि असेल हे गृहीतक समाजमान्य आहे . 
      यातील भूतकाळ  आणि काही अंशी वर्तमानकाळाबाबत शिक्षकवर्गाने आपल्या कृतीतून शिक्कामोर्तब  केलेले आहे . याविषयी समाजाला सार्थ अभिमान आहे  आणि समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कृतीतून त्यावर वेळोवेळी  शिक्कामोर्तब केलेले आहे . थोडक्यात काय तर शिक्षक वर्ग  हा समाजासाठी  दिशादर्शकाचे काम करणारा प्रमुख मार्गदर्शक आहे . 





    ....काळाच्या स्थित्यंतरात शिक्षकाच्या सामाजिक वर्तनाविषयी आणि पर्यायाने त्याच्या  समाजाच्या जडणघडणीच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे नाकारता न येणारे कटू सत्य आहे . याच दृष्टिकोनातून आजचा समाज आणि शिक्षक यावर भाष्य करणारे हे टिपण . हा लेख वाचताना वाचकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे अपेक्षीत आहे की , या लेखात केलेले भाष्य हे शिक्षकांप्रती आदर ठेवूनच केलेले आहे .

शिक्षक हाच राष्ट्राचा  खरा शिल्पकार: 

        पाचवीत शिकणाऱ्या माझ्या मुलीला शिकवत असताना वेळोवेळी तिची प्रतिक्रिया असते की , " नाही ! असे नाही . आमच्या टिचरने असे सांगितले आहे आणि तेच बरोबर आहे .आमच्या टीचर अशा !! .. आमच्या टीचर तशा !!  एकुणात काय तर  आमच्या टीचर म्हणजेच योग्य , सत्य , बरोबर आणि आदर्श  ...  "   हि केवळ एक प्रातिनिधिक भावना झाली . सर्वच विद्यार्थ्यांची आणि त्यातही खासकरून जडखडणीच्या वयातील  १०० टक्के  विद्यार्थ्यांची शिक्षकांप्रती हीच भावना असते .

शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी दैवत असते आणि भक्ताचा जसा देवावर विश्वास असतो तद्वतच विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास असतो . शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी दैवत असते आणि भक्ताचा जसा देवावर विश्वास असतो तद्वतच विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास असतो .

     शिक्षकाच्या केवळ अध्यापनाचाच विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर प्रभाव नसतो तर , शिक्षकाच्या वर्गातील वागण्या -बोलण्याच्या , वेशभूषा आणि एकुणातच सर्वच वर्तवणुकीचा विद्यार्थ्यांवर प्रभाव होत असतो . एवढेच कशाला तर शिक्षकाच्या सामाजिक वर्तनाचा देखील यात सिंहाचा वाटा असतो आणि ग्रामीण भागात याची  मोठ्या प्रमाणात प्रचिती येते .   एका शिक्षकाच्या कार्यकाळात त्या शिक्षकाच्या हाताखालून किमान दोन पिढ्या जातात . आजचे विद्यार्थी हेच उद्याचे नागरीक असतात या न्यायाने नागरीकांची जडघडण  ,समाजाची जडणघडण आणि पर्यायाने राष्ट्राची जडघडणीचे खरे शिल्पकार हे शिक्षकच असतात .




सुवर्ण भूतकाळ , अस्वस्थ वर्तमान :

               स्थित्यंतर हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यास कोणीही अपवाद असत नाही . साधारणपणे १५-२० वर्षांपर्यंत म्हणजे डिजिटल क्रांतीचा प्रसार  होण्यापूर्वी शिक्षक  संपूर्ण गावासाठी  कॉऊन्सलर , मार्गदर्शक , तारणहार , हिशोबनीस ,  संकटमोचक आणि फॅमिली मेंबर असे . माझे बालपण आणि शिक्षण खेड्यात झालेले असल्यामुळे याची प्रचिती अनेकवेळा आलेली आहे . घर -जमीन खरेदीचा निर्णय असो , लग्न जुळवण्याचा निर्णय असो , घर -समाजातील कलह असो अशा जन्मापासून ते मरणापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगी शिक्षकांची भूमिका महत्वाची असे . 'गुरुजी ' सांगितलं तो अंतिम निर्णय असा तो काळ होता . राजकारणी देखील गुरुजींच्या घराचा उंबरठा ओलांडत असत . असा तो सुवर्णकाळ होता .

        गेल्या २ दशकांत सर्वच व्यवस्थांच्या पुलाखालून पाणी वाहिले आहे . काही ठिकाणी ते गढूळ झाले आहे . शिक्षण व्यवस्था , शिक्षण व्यवस्थेचा कणा असणारा शिक्षक आणि समाज देखील त्यास अपवाद असू शकत नाही . गुरुजी ते सर (मास्तर !) हे  शिक्षकाच्या बाबतीतील मोठे स्थित्यंतर . शिक्षकांचा अंगरखा घालून निश्चिम सेवेचे व्रत घेत ज्ञानार्जन करणारी पिठी रिटायर होत गेली. त्यांची जागा मॉडर्न शिक्षकांनी घेतली . जागतिकीकरण , आर्थिक क्रांती याचे वारे जसे जसे ग्रामीण भागात पोहचू लागले, हातात मिळणाऱ्या पगारावरचे 'शून्य ' वाढू लागले  तसे तसे गावात राहून गावाच्या ड्रायवर सीटवर असणारे गुरुजी काळाच्या ओघात ;अडचणींचा ' गाव सोडून 'सुविधांनी परिपूर्ण ' अशा तालुक्याच्या -जिल्ह्याच्या गावी राहण्यासाठी  गेले . येथूनच गुरुजींची समाजाशी असणारी नाळ तुटत गेली . सवड मिळेल त्याप्रमाणे शाळेवर येणाऱ्या शिक्षकांनी  वर्गाच्या ४ भिंती बाहेरील  विश्वासी फारकत घेण्यात धन्यता मानल्यामुळे समाज आणि शिक्षक यांच्या मध्ये भिंत उभी राहिली . समाज- शिक्षक नात्यातील ओलावा काळाच्या ओघात उडून गेल्यामुळे त्यांच्यात केवळ आणि केवळ व्यावहारिक नाते निर्माण झाले .


             समाज आणि शिक्षकांतील नात्याची वीण विसविशीत होण्यामागे अर्थातच  समाज आणि  गेल्या २ दशकातील सामाजिक -राजकीय -सांस्कृतिक -आर्थिक स्थित्यंतरे कारणीभूत जबाबदार आहे . शिक्षणाचे वारे जसे जसे घरोघरी पोहचले तसे तसे खेड्यातील कर्ताधर्ता स्वतःस 'शहाणा -सवरता' समजू लागला , त्यास कोणाच्या मार्गदर्शनाची गरज उरली नाही . दरम्यानच्या काळात शिक्षणाचे खाजगीकरण झाले . गावोगावी खाजगी  शैक्षणिक संस्था  ' उघडल्या '. त्यात ज्ञानार्जनसाठी 'प्रवेश'  मिळवण्यासाठी भावी शिक्षकांना ''किंमत" मोजण्याचा 'प्रगत काळ ' सुरु झाला . प्रत्यक्ष कागदावरील पगारांपेक्षा कमी पगार देणे हा आपला 'घटनादत्त ' अधिकार असल्याची धारणा फ्लेक्सवरील शिक्षण महर्षींची झाल्यामुळे शिक्षक स्वतःच 'अन्यायग्रस्त ' होऊ लागला . " कालाय तस्मै नम: " या न्यायानुसार शिक्षकांची भूमिका बदलत गेली . समाज मार्गदर्शकाचा सदरा खुंटीला टांगून शिक्षकांनी संस्थाचालकांच्या 'राजकीय कार्यकर्त्याचा ड्रेस ' स्वीकारला . समाजातील त्याच्या आदराच्या स्थानास ओहोटी लागू लागली .   जो शिक्षक स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडू शकत नाही त्याच्या कडून समाजास न्याय देण्याची अपेक्षा हे  दिवास्वप्न भासू लागल्यामुळे तर 'शिक्षक आणि समाज  नात्याचा '  वर्तमान काळवंडला गेला .


समाज -शिक्षक : परस्परांचे प्रतिबिंबच :

                     शिक्षक हा घटक समाजातूनच येत असल्यामुळे समाज आणि शिक्षक हे सर्वच दृष्टीने एकमेकांचे प्रतिबिंब असतात . मग तो काळ पूर्वीचा असेल , आत्ताचा असेल की पुढचा असेल , कुठलाच काळ अपवाद असत नाही .
            म्हणूनच वर्तमानातील शिक्षकांच्या नैतिक,सांस्कृतिक  अधःपतनास समाज देखील शंभर टक्के जबाबदार आहे . असे असले तरी शिक्षक हा बुद्धिजीवी घटक मानला जात असल्यामुळे त्याची जबाबदारी अधिकची ठरते आणि त्यामुळेच समाजातील विविध घटक त्यांना  बोल लावताना दिसतात . आजही बहुतांश शिक्षक हे आपली जबाबदारी अतिशय 'नेटाने ' पार पाडताना दिसतात . सरकारी शाळांतील अनेक शिक्षक -शिक्षिकांनी आपल्या कृतीतून ते सिद्ध केले आहे .

          दुर्दैवाने अधिकाधिक शिक्षकीपेशातील वर्ग हा व्यसनाधीनताकडे वळल्यामुळे , अनेक शिक्षकांचा जुगार -बलात्कार यासम गैरकृत्यात सहभागाची निष्पत्ती , ज्यांच्यावर कळ्या जपण्याची नैतिक जबाबदारी आहे अशा पालकत्व समान शिक्षकांनी कळ्या घुडण्याचे कृत्य यामुळे शिक्षकी पेशाच्या 'पवित्रेवर ' कलंक लागला जात आहे . होय ! पुन्हा तेच म्हणावे लागेल की , समाज आणि शिक्षक हे परस्परांचे प्रतिबिंब असल्यामुळे शिक्षकीपेशावर निर्माण झालेल्या 'प्रश्नचिन्हा' स वर्तमानातील सामाजिक नैतिक -सांस्कृतिक अध:पतनाचा सिंहाचा वाटा आहे हे नमूद करावे लागेल .

शिक्षक 'गूगल' स्मार्ट हवेत : पूर्वीच्या काळी कुठल्याही समस्या /प्रश्नाचे उत्तर म्हणजे गुरुजी हा नागरीकांची धारणा होती . आजच्या काळात मोठ्या प्रमाणात ती गरज 'गूगल ' च्या माध्यमातून पूर्ण केली जाते . प्रत्येक व्यक्तीला गूगल करणे शक्य नसते , त्यामुळे शिक्षकांनी गूगल स्मार्ट असायला हवे म्हणजे त्यांनी सातत्याने ज्ञानाच्या बाबतीत अद्यावत असायला हवे . ज्ञानी व्यक्तीला समाजात सर्वोच्च स्थान असते आणि म्हणूनच जनतेच्या मनात पूर्वीचे आदराचे स्थान पुनर्स्थापित करण्यासाठी शिक्षकांनी गूगल स्मार्ट असणे अत्यंत आवश्यक दिसते .

दृष्टिक्षेपातील उपाय :
·         शिक्षकांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांच्या जडघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावत असल्यामुळे शिक्षकांचे वर्तन हे अत्यंत आदर्शवादी असणे काळाची गरज आहे .
·         विद्यार्थ्यांना ओरडायचे नाही , मारायचे नाही यासम नियमांमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात दुरावा होत असल्यामुळे शिक्षकांवरील अनावश्यक निर्बंध उठवायला हवे.
·         एक अपात्र शिक्षक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह हे ध्यानात घेत , शिक्षक अधिक मॅच्युर्ड असण्यासाठी शिक्षकांसाठीची किमान पात्रता पदवीची असावी .
·         शिक्षक आणि समाज यांच्या नात्यातील शिवण अधिक घट्ट होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्याच ठिकाणी निवासास असणे अनिवार्य असावे .
·            विद्यार्थ्यांच्या मनातील  शिक्षक प्रतिमाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासमोर शिक्षकांविषयी अपशब्द वापरणे कटाक्षाने  टाळावेत
·            शिक्षकांचे वर्तन हा समाजाचा आरसा असल्यामुळे शिक्षकांनी अपकृत्य -व्यसने यासम गोष्टींपासून चार हात दूर रहायला हवे .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , ९८६९ २२ ६२ ७२ danisudhir@gmail.com

रविवार, २२ जुलै, २०१८

घराणेशाहीला गाडत घटनेस अभिप्रेत लोकशाही जतन -संवर्धनासाठी मतदारांकडून अधिक सुज्ञ निर्णयाची अपेक्षा !!!


          मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत  यूपीतील कैराना व महाराष्ट्रातील पालघर लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 'घराणेशाहीवर शिक्कामोर्तब म्हणजे लोकशाही असे मानत मतदारांना गृहीत धरत वडिलांच्या निधनानंतर त्या जागेवर माझाच हक्क अशा अविर्भावात पक्षांतर करणाऱ्या व त्यास साथ देणाऱ्या राजकीय पक्षासाठी सणसणीत चपराक " आहे असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही . अर्थातच भाजपा अतिशय धुतल्या तांदळा सारखा पक्ष आहे असे नाही आणि त्यामुळेच त्यांनी  उमेदवार आयात करून विजय मिळवला असला तरी एकुणातच पालघरमधील निवडणूकपूर्व आणि मतदान पश्चात जी राजकीय चिखलफेक पहावयास मिळाली ती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी 'निवडणुका लढवण्याबाबतची काही आचारसहिंता स्वयंपद्धतीने आखून घेण्याची गरज आहे " असे वाटते .
                 तसे पाहता कुठल्याच राजकीय पक्षाला पालघर निवडणूक प्रतिष्टेची करत 'साम-दाम-दंड ' धोरण राबवण्याची आवश्यकता नव्हती कारण या निडवणुकीच्या निकालाने  कुठल्याच पक्षाच्या सत्तेला सुरुंग लागणार नव्हता ना कुणाला सत्ताप्राप्ती होणार नव्हती . तरीही ज्या प्रकारे गेल्या २ महिन्यात राजकीय नेतृत्वाने स्वतःचे वस्त्रहरण करून घेतले ते पाहता राजकीय पक्षांच्या वर्तनाला पायबंद घालण्याची वेळ नक्कीच आली आहे असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही . वस्तुतः  वर्तमान सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेतृत्वाने कमी -अधिक प्रमाणात कमरेचे काढून ते डोक्याला देखील न बांधता सर्रासपणे फेकून देत लोकशाही प्रक्रियेला ज्या प्रकारे नागडे करण्याचे अंगिकारलेले धोरण पाहता आता 'लोकशाहीचे वस्त्रहरण 'धोपवण्याची खरी जबाबदारी हि भारतीय मतदारांची असल्याचे दिसते .
        लोकशाही व्यवस्थेत कुठलातरी पक्ष जिंकणार, कुठलातरी पक्ष हरणार हे ठरलेले असते . कुठल्याच पक्षाने आपली सत्ता हि 'अमर सत्ता ' आहे अशा अविर्भावात कारभाराचा गाडा हाकणे सुयोग्य ठरत नाही परंतू 'सत्तातुराणां न भयं न लज्जा' अशी अवस्था सर्वच राजकीय पक्षांची झालेली असल्यामुळे भविष्यात लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी ,घटनेस अभिप्रेत लोकशाहीच्या जतन -संवर्धनासाठी मतदारांनी अधिक सुज्ञपणे मतदान करणे काळाची गरज वाटते . नेता -राजकीय पक्ष कितीही मोठा असला तरी त्याला घरचा रस्ता हे सामान्य मतदारच दाखवू शकतात हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सामर्थ्य आहे व मतदारांनी त्याची प्रचिती वेळोवेळी आणून देणे अत्यंत निकडीचे आहे .
 कृतियुक्त योग्य संदेश देण्याची संधी :   स्वार्थाने बेभान झालेल्या राजकारण्यांना सरळ करण्याची ताकद मतदारांकडे आहे याची प्रचिती पालघर निवडणुकीत मतदारांनी भाजप -शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पराभूत करत अन्य तिसऱ्या उमेदवाराला निवडून दिले असते तर ऐनवेळी मतदारांना गृहीत धरत पक्षांतराच्या कोलांटउड्या घेणाऱ्या उमेदवारांना सुयोग्य इशारा मिळाला असता . भविष्यात तरी भारतीय मतदारांनी अतिशय सुज्ञपणे मतदान करणे अभिप्रेत आहे .राजकारण्यांना ५ वर्ष त्यांच्या निष्क्रियतेसाठी लाखोळी वाहणारे मतदार मतदानाच्या दिवशी मात्र भावकी -जात-धर्म-पक्ष यासम गोष्टींच्या संमोहनातून अयोग्य व्यक्तीला मतदान करणारे मतदार अधिक सजग आणि सुज्ञ होण्यासाठी प्रसारमाध्यमे -सामाजीक संस्था - साहित्यिक मंडळी -विचारवंत यांनी जनजागृती अभियान राबवणे अत्यंत अनिवार्य आहे .होय ! शेवटी अतिशय खेदाने नमूद करावे वाटते ते म्हणजे  भारतीय प्रसारमाध्यमांनी देखील अधिक सजग ,सुशिक्षीत आणि निःपक्ष होणे अत्यंत निकडीचे आहे .लोकशाहीस दिशा देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे ना की दिशाभूल करणे या तत्वाचा स्वीकार प्रसारमाध्यमांनी करावयास हवा .
सुज्ञ मतदार हेच लोकशाहीचे खरे आधारस्तंभ : ७ दशकाच्या लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना , नेतृत्वांना संधी दिली परंतू तरीही आज बहुतांश नागरीक हे जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गरजांपासून वंचीत आहेत . याचाच अर्थ एकतर व्यवस्थेत दोष आहे किंवा नागरीक सुज्ञपणे मतदान करत नाहीत . व्यवस्थेत दोष असेल तर तो दुरुस्त करणे मतदारांच्या हातात नाही , त्यांच्या हातात आहे ते म्हणजे आपल्यास प्राप्त अधिकाराचा सुयोग्य वापर करत योग्य व्यक्तींची निवड करणे . आजवर होते हे आहे की , अमुक एक पक्ष चांगला , अमुक एक नेता चांगला म्हणून त्याने दिलेल्या उमेदवारास मतदान केले जाते . यापुढे मतदारांनी हे टाळायला हवे . केवळ पक्ष किंवा नेतृत्व न पाहता आपले प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीची पात्रता , त्याचा इतिहास पाहून मतदान करायला हवे . स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना , क्रांतिवीरांना , राजकीय नेतृत्वांना अभिप्रेत असणारी लोकशाहीच्या पूर्ततेचे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर एक आणि एकमात्र मार्ग संभवतो तो म्हणजे भारतीय नागरीकांनी अगदी ग्रामपंचायत ते लोकसभेच्या निवडणुकीत अतिशय सजगपणे , आपला विवेक,  आपल्या बुद्धीच्या जागृत अवस्थेत मतदान करायला हवे .
व्यवस्थेचे "पारदर्शक परिवर्तन" हवेच : वर्तमान शासकीय -प्रशासकीय व्यवस्था हि सदोष असल्यामुळे अनेकवेळा राजकीय नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न करून देखील त्याचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यात अडथळा होतो . आज पारदर्शक व्यवस्थेचा डंका पिटला जात असला तरी प्रत्यक्षात व्यवस्थेची कार्यपद्धती अशी आहे की , अधिकाधिक माहिती हि नागरीकांपासून गुप्त ठेवली जाते . आजवरच्या सर्वच सरकारांनी , अगदी पारदर्शकतेचे पेटंट असल्याचा अविर्भावात वागणाऱ्या मोदी -फडणवीस सरकारकडून पारदर्शकतेची दवंडी पिटवली जात असली तरी आजही ग्रामपंचायती-पंचायत समिती -नगरपालिका -महानगरपालिका -आमदार /खासदार निधी याचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर टाकला जात नाही आणि त्यामुळेच जनता या सर्व कारभारापासून अनभिज्ञच असते . एवढेच कशाला अगदी आपली मुले ज्या शाळेत -महाविद्यालयात प्रवेश घेतात तिथे अध्यापन करणाऱ्या शिक्षक -प्राध्यापकांची शैक्षणिक अर्हता , त्या संस्थेतील पायभूत सुविधा याची माहिती पालकांपासून 'गुप्त ' ठेवण्यातच प्राधान्य दिले जाते . राज्य -केंद्र पातळीवरील कुठल्या योजनेचे कोण लाभार्थी आहेत हे देखील कधीच जनतेसमोर 'खुले' केले जात नाही .आणि म्हणूनच  लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमान व्यवस्थेत पारदर्शक परिवर्तन होणे हि काळाची गरज आहे . व्यवस्था अधिक दोषमुक्त , पारदर्शक केली , सत्तेच्या माध्यमातून मलाई लाटण्याच्या मार्गास प्रतिबंध केला तर आणि तरच लोकशाही व्यवस्थेत अभिप्रेत लाभ शेवटच्या घटकापर्यंत सहजपणे पोहचू शकतील .
         सर्वात महत्वाचे हे की ,    निवडणुकीत कुठली व्यक्ती , कुठला पक्ष निवडून आला यास महत्व आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे ते म्हणजे लोकशाहीचा पराभव टाळणे .
                                                                                                सुधीर लक्ष्मीकांत दाणी , danisudhir@gmail.com
भ्र. ९८६९ २२ ६२ ७२