.
कॉपी मुक्त परीक्षा हा मुलभूत अधिकार असावा !!!
परीक्षांचे पडघम वाजू लागले आहेत. अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणारी बारावीची परीक्षा अखेर २१ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. अगदी शालेय पातळीवरील परीक्षापासून ते पदव्युत्तर परीक्षेपर्यंत कुठलीही परीक्षा असो तिला "कॉपी"चा विळखा हा ठरलेलाच असतो . परीक्षा प्रमुख सोडा खुद्द ब्रह्मदेवही एखादी परीक्षा पेपर सेटिंग पासून ते निकाल लागे पर्यंत 'गैरप्रकार मुक्त ' होईलच याची खात्री देऊ शकणार नाही. शिक्षण समाजाला 'घडवते' हे खरे कि समाज शिक्षण व्यवस्थेला /शिक्षणाला 'बिघडवतो ' हे तपासण्याची वेळ आली आहे . गैरप्रकारांनी बरबटलेल्या समाजाचे प्रतिबिंब शिक्षणात पडते की शिक्षण/परीक्षा तील गैरप्रकार ,बजबजपुरीचे प्रतिबिंब म्हणजे आजचा समाज हा कळीचा मुद्दा आहे.
मोफत दर्जेदार शिक्षण हा जसा कायद्याने हक्क झाला आहे तद्वतच 'कॉपी मुक्त 'परीक्षा हा मुलभूत अधिकार होणे काळाची गरज वाटते . आज सर्वत्र स्पर्धा असल्याचा नगIरI पिटला जातो परंतु त्या स्पर्धेचे प्रवेशद्वार असणाऱ्या परीक्षा मात्र आजही 'कॉपी मुक्त ,गैरप्रकार मुक्त ' नाहीत. परीक्षा पूर्व आणि परीक्षोत्तर सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षेच्या संबंधातील सर्व घटकांनी प्रामाणिक उपाय योजना आखून त्यांची अंमलबजावणी तितक्याच प्रामाणिक पणे करणे अत्यंत गरजेचे ठरते . स्पर्धा निकोप असणे हा प्रत्येक स्पर्धकाचा आणि त्याच्याशी निगडीत सर्व घटकांचा मुलभूत अधिकार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि प्राप्त गुण हे अनेकांच्या भविष्याच्या मार्गातील मैलाचे दगड असतात.प्रवास योग्य दिशेने चालला आहे कि नाही याचे मैलाच्या दगडावरील आकडे जसे दर्शक असतात तसेच या परीक्षातील मार्कांचे आहे. भविष्यातील अनेक प्रवेश हे याच परीक्षांच्या मार्कावरून होत असतात. 'सीईटी'तील गुणांइतकेच आता महत्व हे बारावीच्या मार्कांना आहे. फक्त मार्कांना महत्व आहे म्हणून सर्व परीक्षा ह्या गैरप्रकार मुक्त व्हायला हव्यात असे नाही तर शिक्षणातील अपप्रवृतीत मुल्यरहित समाज निर्मितीचे बीजांकुर दडलेले असतात याचे गाभिर्य ओळखून शिक्षण विभागाने आणि या परीक्षांचे उत्तरदायित्व असणाऱ्या बोर्डाने अधिक सजग होत स्वच्छ् ,पारदर्शक ,कॉपी आणि गैरप्रकार मुक्त परीक्षासाठी कंबर कसावी.
सजग पर्यवेक्षण , अपप्रवृतीना कठोर शिक्षा , चांगल्या परीक्षा केंद्रांना प्रोस्ताहन , प्रसारमाध्यमांचा अंकुश , पालकांची पारदर्शक परीक्षासाठी सक्रीय चळवळ , परीक्षेच्या काळात शिक्षण क्षेत्रातील घटकांचा समावेश नसणारा २४ बाय ७ केंद्रीय तक्रार कक्ष यासम उपाय गैरप्रकार मुक्त परीक्षांसाठी 'गुरुकिल्ली " ठरू शकतात . अर्थात यापेक्षाही इतर हजार उपाय योजिले जाऊ शकतात. प्रश्न उपाय योजनांच्या संख्येचा नाही.अंतिम निष्पती काय आहे हा खरा प्रश्न आहे.
...... “केल्याने होत आहे रे”...या न्यायाने कठोर व प्रामाणिक इच्छा शक्ती असेल तर एकच उपाय योजना स्वप्नपूर्ती घडवून आणू शकते अन्यथा हजार उपाययोजनाही निष्फळ ठरू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा