एकूणच शिक्षण व्यवस्थेत ईयत्ता दहावीच्या परीक्षांना आणि पर्यायाने अभ्यासक्रमाला अनन्य साधारण महत्व आहे . याची दखल घेत महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीच्या गणित आणि विज्ञान अभ्यासक्रमाचे ' उच्चीकरण ' केले आहे . उच्चीकरण या अर्थाने की , स्टेट बोर्डाने केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर अभ्यासक्रम बनवला आहे आणि म्हणून तो पूर्वीच्या अभ्यासक्रमापेक्षा उच्च दर्जाचा आहे असे सांगितले जाते . (मुळात हा निष्कर्ष कोणत्या तौलनिक अभ्यासाच्या आधारे स्टेट बोर्डाने निष्कर्ष काढला आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे ) पूर्वी जीव-भौतिक-रसायन शास्त्र यासाठी वेगवेगळी पुस्तके होती आणि या सर्वांची प्रत्येकी ४० मार्काची परीक्षा होत असे . नवीन ' उच्चीकरणानुसार ' आता पर्यावरणासहीत जीव-भौतिक-रसायन शास्त्रासाठी एकच पुस्तक आहे . भाग ' अ ' मध्ये ७ तर भाग ' ब ' मध्ये ६ प्रकरणे आहेत . २ प्रकरणात आणि ८ मार्कात पर्यावरण गुंडाळले आहे , पूर्वी या साठी स्वतंत्र पुस्तक होते . सर्वात महत्वाचे हे की , ज्या परीक्षेच्या निकालालावर अनेकांच्या शैक्षणिक आयुष्याला दिशा मिळते त्या परीक्षेसाठी प्रत्येक विषयासाठी २४ मार्क वाट्याला आले आहेत . २४ मार्कात गाळलेल्या जागा , गटातील विसंगत घटक , जोड्या , चूक/बरोबर , सह्सबंध या वस्तुनिष्ठ प्रश्नासह कारणे द्या , टिपा लिहा , फरक ओळखा , आकृती काढा या सारख्या विस्तृत प्रश्नाचा समावेश आहे . आणखी हे कि बुद्धिमत्तेची कसोटी पाहणाऱ्या ' हॉटस ' प्रश्नाचाही यातच समावेश आहे .
मुद्दा हा आहे कि , ज्या उच्चीकरणाच्या गोडंस नावाखाली हा जो अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीत बदल केला आहे हा खरच विषयांना न्याय देणारा आहे का ? वर्षभर केलेला अभ्यासाचे मूल्यमापन केवळ २४ मार्कात करणे यास यास ' उच्चीकरण ' म्हणणे उचित ठरेल की केंद्रीय बोर्डाच्या कृत्रिम गुणवत्ता फुगवटा प्रणालीचे 'अंधानुकरण ' यावर राज्यातील मात्तबर समजल्या जाणाऱ्या शिक्षणतज्ञांनी भाष्य करणे इष्ट ठरेल . महत्वाचे हे कि विचारपूर्वक (?) केलेल्या विज्ञान आणि गणितातील काही भाग या वर्षी लगेचच वगळण्या मागचे 'इंगित ' कोणते याचा खुलासा बोर्डाने करावा …. अन्यथा "उच्चीकरण " हे केवळ गैरसमजावर आधारीत 'दिशाभूल' हि समाज मनातील समजूत अधिकच घट्ट होण्याचा धोका संभवतो .
वास्तविक पहाता गेल्या काही वर्षात शिक्षण विभागाने अशी पाऊले उचलली आहेत कि विद्यार्थ्याने जरी नापास व्हायचे मनोमन ठरवले तरी सहजासहजी तो नापास होऊ शकत नाही . त्यामुळे शिक्षण विभागाच्या मनात गुणवत्तेचे उच्चीकरण हा मानस आहे या वरच विश्वास ठेवणे महाकठीण होताना दिसत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा