शुक्रवार, ३ मे, २०१३

मुख्य न्यायमूर्ती साहेब मुंबई उच्च न्यायालय यांना पत्र


                                                                                             श्री. सुधीर  लक्ष्मीकांत दाणी , 
                                                                                  प्लॉट बी-२७ , फ्लॅट २०१ , शिवमंदिराजवळ , 
                                                                                 आग्रोळी सेक्टर २९, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई .
                                                                                             भ्र . ९ ८ ६ ९ २ २ ६ २ ७ २ . 
प्रती ,
मुख्य न्यायमूर्ती साहेब ,
 मुंबई उच्च न्यायालय . 
विषय : शिक्षणाचे वाढते बाजारीकरण आणि त्याचे सामाजिक दुष्परिणाम . 
महोदय , 
         १ एप्रिल २ ० १ ० पासून देशात 'मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा ' लागू झाला. 'मोफत' सोडा, 'माफक' दरात शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. वर्तमान शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारास पूरक ठरत आहे . गुणवंताला डावलून शिक्षण व्यवस्था ' धनवंताची ' मक्तेदारी होते आहे . समाजिक विषमतेची बीजे शिक्षण व्यवस्थेतून पेरली जात आहेत .  राज्यकर्ते आणि अधिकारी यांच्या 'वेस्टेड इंटरेस्ट ' मुळे शिक्षण क्षेत्रात अनेक जनतेच्या हिताच्या समस्या प्रलंबीत आहेत. समाजाला - देशाला ' दिशा ' देणारे शिक्षणच वर्तमानात 'दिशाहीन ' झालेले दिसते आणि हे खचितच योग्य नाही. शिक्षण विभागात सध्या संवेनदनशीलता , दूरदृष्टीकोन याचा दुष्काळ आहे . सरकार दरबारी जागरूक पालक , सामाजिक संघटना , प्रसार माध्यमे यांनी कितीही धडका मारल्या  तरी या यंत्रणांना पाझर फुटण्याची सुतराम शक्यता दिसत नाही . आज राज्यात किंवा देशात एक हि ‘ शिक्षण नियमन ‘ यंत्रणा नाही कि जिच्या कडे विश्वासाने दाद मागितली जाऊ शकते  सद्यपरिस्थितीत एक आणि एकमात्र उपाय संभवतो तो म्हणजे मा . न्यायालयांनी शिक्षण व्यवस्थेतील सर्व समस्यांची दखल घेऊन सरकारला आणि शिक्षण विभागाला विशिष्ट कालमर्यादेत या प्रश्नावरील उपाय योजना आखून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्व्यावेत. बाजारू शिक्षण व्यवस्थेमुळे आज सामाजिक विषमता पेरली जात आहे . वर्तमान शिक्षण हे विकाऊ झाले आहे , आज ज्याच्याकडे लाखोने पैसा आहे त्यानेच शिक्षणाच्या बाजारात उतरावे अशी अवस्था झाली आहे . सरकारी शिक्षण संस्था आहेत परंतु तिथे गुणवत्ता  पूर्ण दर्जेदार शिक्षण नाही आणि खाजगी संस्थाचे शुल्क आवाक्याबाहेर गेले आहे . समाजाची अवस्था इकडे आड ( सरकारी शिक्षण संस्था ) तिकडे विहीर (खाजगी शिक्षण संस्था ) अशी झाली आहे . दुर्दैवाने  आज एखादा दुसरा अपवाद वगळता  केजी पासून ते पीजी पर्यंतच्या जागा थेट 'लिलाव ' पद्धतीने भरल्या जात आहेत हे वास्तव आहे . शिक्षण हि धनवतांची मक्तेदारी बनली आहे . संपूर्ण वर्तमान शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारास पूरक बनली आहे .  शिक्षणाच्या बाजारीकरणाची किमत आज समाजाला भोगावी लागत आहे . समस्त पालकांतर्फे मा . न्यायालयास हि विनंती आहे कि त्यांनी शिक्षण विभागास निर्देश देऊन निम्न उलेखीत समस्यांचे अवलोकन करण्यास सांगून त्यावर कालमर्यादेसह उपाय योजना करण्याचे निर्देश द्यावेत.
काही प्रातिनिधिक समस्या /प्रश्न :
१) पूर्व  प्राथमिक प्रवेश हे पालकांच्या लुटीचा "श्रीगणेशा " ठरत आहेत . पालकांची  सर्वाधिक लूट या प्रवेश प्रक्रियेत होते आहे पूर्व प्राथमिक शिक्षण आजही ‘अनधिकृत’च आहे . यावर कुठलेही शासन नियंत्रण नाही . " विना डोनेशन , नो   अडमिशन " हाच या प्रवेशांचा अधिकृत (?) नियम आहे . पूर्व प्राथमिक शिक्षण हा वर्तमान शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे . अनधिकृत असले तरी शासन मान्य शाळेत देखील हे वर्ग चालतात . पूर्व प्राथमिक शिक्षण अधिकृत करून त्याची योग्य नियमावली योजायला हवी . सर्वात महत्वाचे हे कि पूर्व प्राथमिक शाळातील सर्व प्रवेश हे शिक्षण अधिकाऱ्याच्या नियंत्रणातर्गत केंद्रीय पद्धतीने/लॉटरी पद्धतीने होणे गरजेचे आहे . 
२) गेल्या ३ वर्षापासून  " शुल्क नियंत्रण कायदा " प्रलंबित आहे . केंद्र शासनाच्या संमतीसाठी हा कायदा प्रलंबित आहे, या कारणामागे दडत राज्य सरकार वेळ मारून नेत असल्यामुळे आज पालक आणि शाळा/कॉलेज  प्रशासन यांच्या मध्ये संघर्ष होताना दिसत आहे . गुनोत्तरीय पद्धत्तीने केजी पासून पीजी पर्यंतचे शुल्क वाढते आहे .शुल्कवाढीच्या भडक्यात पालक होरपळून निघत आहेत . आवाज उठवला तर अगदी पाल्याला शाळा बाहेर काढण्याचे प्रकार घडलेले आहेत. 
    तामिळनाडूच्या धर्तीवर पूर्वप्राथमिक , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक , पदवी आणि पदवीत्युर (केजी टू पीजी ) पर्यंत विभागानुसार 'कमाल शुल्क ' निर्बंधासह शुल्क नियंत्रण कायदा लागू करणे अत्यंत आवश्यक आहे . 
३) शिक्षक भरतीत 'अर्थपूर्ण ' लिलाव पद्धतीने होणारे व्यवहार थांबवून 'केंद्रीय पद्धतीने 'संपूर्ण राज्यात शिक्षक/प्राध्यापक  भरतीची प्रकिया व्हायला हवी . आज सर्रासपणे पात्रता /निकष डावलून भरती केली जात आहे . नेट-सेट अपात्र प्राध्यापकांचा मुद्दा आणि बहिष्कार हे त्याचे ताजे सर्वोत्तम उदाहरण ठरते . अनधिकृत काही काळानंतर अधिकृत हा इतर ठिकाणी वापरला जाणारा नियम शिक्षणात लावल्यास त्याचे दूरगामी परिणाम भावी अनेक पिढ्यांना भोगावे लागतील . राज्य स्तरीय 'सेट ' परीक्षा घेऊन त्याची गुणवत्ता यादी बनवून केंद्रीय पद्धतीने शिक्षक/प्राध्यापकांची नियुक्ती करणे हा एक तोडगा ठरू शकतो . संस्थाचा यास विरोध असण्याचे कारण संभवत नाही कारण त्यांचा  उत्तम शिक्षक मिळणे या  उद्देशाला यातून बढावाच मिळतो . जर विरोध असेल तर शिक्षण संस्थांचा 'इंटरेस्ट ' तपासणे गरजेचे ठरते . 
4) शिक्षकांची आवशकता १२ हजार तर प्रत्येक वर्षी पास होणारे विद्यार्थी ९० हजार . अश्या व्यस्त प्रमाणामुळे शिक्षण संस्था 'बेकारीचे कारखाने 'ठरत आहेत . केजी ते पीजी पर्यंतच्या शिक्षणाचा बृहत आराखडा तयार करून आवश्यक तेवढ्याच त्या त्या प्रकारच्या संस्थाना मान्यता देण्याचे धोरण राबविणे .
5) शैक्षणिक आर्थिक अनुदानाचा गैरवापर : पटपडताळणीतून आर्थिक अनुदानाचा गैरवापराचा मुद्दा समोर आला आहे . प्रत्येक विद्यार्थ्यास केजी पासून 'आधार कार्ड ' अनिवार्य केल्यास या गैरवापरावर अनिर्बंध आणण्याबरोबरच बोगस पदव्या , परीक्षांना बसणारे डमी विद्यार्थी , विद्यार्थी संख्या लपवा लपवीतून खाजगी शाळात होणारे गैरप्रकार यासम गोष्टींवर निर्बंध आणणे शक्य होईल .  विद्यार्थ्यांचे संपूर्ण ट्रक रेकॉर्ड आधार नंबर वरून मिळाल्यास कंपन्याना गुणवत्ता शोधण्यास मदत होईल . 
6) खाजगीकरणास प्रोत्साहन देण्याऐवजी  शासनास स्वतःच्या शाळातील दर्जा उंचावण्यासाठी  उपाय योजना करण्यास अनिवार्य करणे गरजेचे आहे अन्यथा संपूर्ण शिक्षण व्यवस्था खाजगीकरणातून बाजाराच्या हातात गेल्यास काळाची चक्रे उलटी फिरून ३/४ दशकापूर्वी जसा काही समाज शिक्षणापासून वंचित राहत होता अगदी तसेच आर्थिक मागास असलेला समाज शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका संभवतो . 
7) शैक्षणिक संस्थाचा दर्जा राखण्यासाठी आणि त्यांचा बाजार थाबण्यासाठी शाळा /महाविद्यालय वाटपाचे निकष /धोरण व परवाना पद्धतीत पारदर्शकता.
8) शैक्षणिक संस्थाचे ताळेबंद ऑनलाईन करणे.
9) शाळां/ महाविद्यालयांना प्रवेश देताना सर्व विद्यार्थ्यांना माहितीपत्रक ( शिक्षकांची आर्हता , पायाभूत सुविधांची संपूर्ण माहिती , शुल्क विवरण ) देणे अनिवार्य करणे. माहितीपत्रकातील सुविधा आणि प्रत्यक्ष असणार्या सुविधा यांची पडताळणी करणारी त्रयस्थ यंत्रणाची नियुक्ती .
10) खाजगी क्लासेस वर कुठलेही नियमन नाही . अध्ययन -अध्यापनास पूरक असणारे साहित्य ( सिडी , नोट्स ..) पुरवणाऱ्या अनेक खाजगी संस्था आहेत . पालकांच्या सवेन्दनशीलतेचा गैरफायदा  घेऊन या संस्था पालकांची लूट करत असतात . यांच्यावर नियंत्रण आणले जावे .
11) असर ने शिक्षणाचे वास्तव समोर आणले आहे.  उपाय योजनातर्गत शिक्षक /प्राध्यापक यांच्या साठी वार्षिक मुल्याकन परीक्षा.
12) सरकारी अनुदानित शाळां/महाविद्यालयांचे मुल्यांकन करून त्यांना मिळणारे ग्रेड शाळेच्या प्रवेश द्वारावर लावणे.
13) २५ % टक्के आरक्षणाचा यावर्षी झालेला 'फियास्को ' टाळण्यासाठी आगामी वर्षापासून कृतिकार्यक्रम.
14) राज्यातील डीटी एड महाविद्यालयांची ७ ते १४ जानेवारी दरम्यान झालेल्या पडताळणीचा अहवाल जाहीर करणे .
       महोदय साहेब , कायद्याच्या -नियमांच्या चौकटीत थेट आपणाशी सवांद साधणे कदाचीत अयोग्य ठरू शकेल परंतू सामान्य पालकांच्या मनातील घुसमट व्यक्त करण्यासाठी हा पत्र प्रपंच . मानवी मनास होणारी घुसमट व्यक्त करणे अनिवार्य असते आणि ती विश्वासाने व्यक्त करणारा खांदा म्हणून आपणाशी हा सवांद  या दृष्टीने या  पत्राकडे पहावे हि विनंती . 

                                                            आपला ,

                                                 श्री. सुधीर  लक्ष्मीकांत दाणी , 
                                                                                              danisudhir@gmail.com




मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

शिक्षक - प्राध्यापक - संघटना परीक्षांना का घाबरतात ?


     आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात गेली २३ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या आणि “ रेकॉर्डचे रेकॉर्ड ”
असणाऱ्या सचिन तेंडूलकरला गत कामगिरीच्या जोरावर या पुढे कोणत्याही सामन्यात न
धावता चेंडूने कापलेल्या अंतरानुसार १/२/३ धावा घोषित करण्याची मागणी भारतीय क्रिकेट मंडळाने आयसी सी कडे केली किंवा गेल्या ५ निवडणुकात यश प्राप्त केलेल्या एखाद्या नेत्यासाठी आजवरच्या कारकीर्द -समाजसेवा-कर्तुत्व याच्या आधारावर आगामी निवडणुकात निवडणूक न लढविता विजयी घोषित करण्याची मागणी राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली तर ……हे शक्यच नाही अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया संभवते . या पुढे जाऊन या मागण्या सबंधित यंत्रणेने मान्य केल्या तर ?  हे केवळ हास्यास्पदच ठरेल कारण मुळात मागणीच घुळचट वाटते . गुणवत्ता हि मक्तेदारी असूच शकत नाही . स्पर्धेच्या युगात तर ती पदोपदी सिद्ध करावी लागते . अनेकांचे भविष्य घडविणाऱ्या - ठरविणाऱ्याच्या अंगात तर गुणवत्ता ठासून भरलेली असणे अभिप्रेत आहे . परंतु हे न शिक्षक भारती या शिक्षक संघटनेच्या गावी आहे ना शिक्षण विभागाच्या !
     शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार गुणवत्ता जतन आणि संवर्धनासाठी पहिली ते आठवीच्या वर्गाना शिकविणाऱ्या आणि नव्याने सेवेत येवू पाहणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षकांना आपली गुणवत्ता सिध्द करण्यासाठी टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ) देणे अनिवार्य आहे . येत्या २८  जुलैला हि परीक्षा होणार आहे .
 सध्या सेवेत असणाऱ्या सरकारी ,खाजगी आणि निमसरकारी ५ लाख शिक्षकांना हि परीक्षा सक्तीची न करता त्यांना या परीक्षेतून सुट  मिळावी अशी मागणी शिक्षक  परिषदेने शिक्षण विभागाकडे केली आणि त्याची तितक्याच तत्परतेने दखल घेत शिक्षण विभागाने वर्तमान शिक्षकांना " पात्रता परीक्षेतून " सुट दिली आहे . 
शिक्षक परिषदेने हि सुट  मागण्या मागची भूमिका कोणती हे वर्तमान पत्रातून जाहीर करावे .

    शिक्षण हक्क कायद्यानुसार पालकांना सर्व माहिती मिळण्याचा अधिकार आहे . शासन आणि शिक्षक संघटना यांच्या मते वर्तमान सेवेतील सर्व शिक्षक " गुणवत्तेने परिपूर्ण " आहेत हा ठाम विश्वास आहे का ? कि त्यांनी आजवर जे ज्ञानार्जनाचे कार्य केले आहे , आपली पात्रता  सिद्ध केली आहे म्हणून आता त्यांना परीक्षेतून सूट हवी आहे ? हा प्रकार म्हणजे वर उल्लेख केल्या प्रमाणे आजवरच्या  जोरावर सचिनला न धावता धावा मिळण्याची मागणी केल्यासारखे होय . जर वर्तमान सर्व शिक्षक दर्जेदार , ज्ञानाने परिपूर्ण असतील तर त्यांना परीक्षेचे ऐवढे वावडे का ?  शिक्षण विभागाने प्रतिवर्षी शिक्षकांची परीक्षा घेण्याची घोषणा केली होती मग आता परीक्षा तोंडावर आली असताना शिक्षण विभागाने तलवार म्यान का केली ?  याचाही जाहीर खुलासा करावा .
केंद्रीय पात्रता चाचणीत ९९ टक्के शिक्षक नापास झाले होते त्याचा धसका तर शिक्षक संघटनेने घेतला नाही ना ?  शिक्षकांच्या नियुक्त्या ज्या ' बाजारू लिलाव ' पद्धतीने होतात त्यावरून दर्जाशी होणारी तडजोड सर्वज्ञात आहे . वर्तमान सरकारमधील अनेक शिक्षण सम्राट याचे ' मूक साक्षीदार ' असल्यामुळे शिक्षण मंत्री / शिक्षण सचिव या प्रकारापासून अनभिज्ञ असतील असे म्हणणे दुधखुळे पणाचे ठरेल . वस्तुत: शिक्षण विभागाने या परीक्षा अनिवार्य करणे काळाची गरज आहे . गेली ६८ दिवसापासून वरिष्ठ प्राध्यापक संघटना ' सेट/नेट ' मधून वर्तमान प्राध्यापकांना सुट  मिळावी या साठी खुतून बसली आहे . आज ना उद्या त्यांना त्यात निश्चितपणे यश मिळेल कारण ' ते ' मतदार आहेत आणि शासन फक्त मतदारांना सांभाळून घेत असते . 
     प्रती वर्षी लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे शिक्षक - प्राध्यापक - संघटना परीक्षांना का घाबरतात हे अनुत्तरीत आहे . अर्थातच काही हजारांची फीस भरून देखील जवळपास ६० ते ७०  टक्क्याहून अधिक पालक केवळ शाळा – कॉलेज  शिक्षकांवर अवलंबून न राहता पुन्हा काही हजारो रुपये भरून खाजगी क्लासेसचे उंबरठे झिजवत असतात यातच " अनुत्तरीत उत्तराचे उत्तर " मिळते . 

मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

शिक्षणाच्या शुद्धीकरणाचे शिवधनुष्य


     इतर क्षेत्रांतील भ्रष्टाचारावर आसूड ओढणारी प्रसारमाध्यमे शिक्षणातील भ्रष्टाचाराबाबत अनभिज्ञ

का, हा कळीचा प्रश्न आहे. जर त्यांना या क्षेत्रातील गैरप्रकार ज्ञात असतील तर त्याविषयी आवाज न

उठवण्यामागचे इंगित काय?

    प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे संबोधले जाते आणि त्यामुळे लोकशाहीला घातक

ठरणार्‍या घटकावर हल्लाबोल करणे निश्चितच अभिनंदनीय आहे. वर्तमानपत्रे असोत

की टीव्ही वाहिन्या, प्रतिदिन ते भ्रष्टाचारी व्यवस्थेवर आसूड ओढत असतात. त्यामुळे निश्चितपणे

काही अंशी भ्रष्टाचारी व्यक्ती आणि यंत्रणेवर अंकुश राहतो, याविषयी दुमत संभवत नाही. शिक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय. व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग. अर्थातच महामार्ग

जितका सक्षम तितकी अंतिम उद्दिष्टपूर्तीची शक्यता अधिक आणि तेही जलद गतीने, हा साधा नियम.

आज सर्वात भ्रष्टाचारी क्षेत्र कोणते, या प्रश्नाच्या उत्तरात 'शिक्षण व्यवस्थेचा' नंबर पहिल्या तीनमध्ये

असेल. 

 शिक्षणातील 'लुटीचा' श्री गणेशा हा पूर्व प्राथमिक शिक्षणापासून  होतो. पुढे डॉक्टर, इंजिनिअर होईपर्यंत

पालकांची पाठ सोडत नाही. हे सर्व प्रसारमाध्यमांच्या 'तिसर्‍या डोळ्यातून' कसे सुटते,

हा संशोधनाचा विषय आहे. प्रसारमाध्यमांनी लक्ष घातले असते तर आज खरेच नर्सरी, केजी वर्ग

अनधिकृत राहिले असते का? याचा विचार सर्व प्रसारमाध्यमांनी करायला हवा. सुतावरून स्वर्ग

गाठणारी प्रसारमाध्यमे 'शिक्षणातील गैरप्रकार /आíथक भ्रष्टाचार' याबाबत अनभिज्ञ असतील, यावर

शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. शिक्षण यंत्रणा प्रसारमाध्यमांसाठी अवघड जागचे दुखणे का ठरत

आहे, हे अनाकलनीय आहे. शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र संबोधले जाते. असे असले तरी आज

या क्षेत्राभोवती समस्यांचे /घोटाळ्यांचे गारूड आहे. पटपडताळणीतून सरकारी शिक्षण व्यवस्थेचे

विदारक वास्तव समोर आले आहे, हळूहळू तो विषय बासनात गुंडाळला जात आहे.

खासगी शिक्षणव्यवस्थेचे उद्योगात रूपांतर झाले आहे. इथे सर्व निर्णय हे नफा-तोट्याचे गणित समोर

ठेवून घेतले जात आहेत. शिक्षक भरतीत 'लाखोंच्या थैल्या' खाली कराव्या लागतात, हे आता गुपित

नाही. विद्यार्थ्यांकडून खोर्‍याने ओढणार्‍या संस्था शिक्षक आणि अन्य कर्मचार्‍यांना मात्र अल्प पगारावर

राबवत असतात. 

 करोडो रुपये खचरूनही सरकारी शाळांच्या दर्जाचा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यावर उपाय

योजण्याऐवजी शासन शाळांचे खासगीकरण करण्यात धन्यता मानत आहे. प्रयोगशाळा नसणारे

महाविद्यालय, प्राध्यापक नसणारी महाविद्यालये कोणत्या दर्जाचे शिक्षण देत असतील? भ्रष्ट

शिक्षणव्यवस्था मूल्यरहित बाजारू सामाजिक व्यवस्थेचे उगमस्थान ठरत आहेत. लाखो रुपये भरून

डॉक्टर, अभियंते होणार्‍या विद्यार्थ्याकडून भविष्यात 'निरपेक्ष, स्वच्छ सेवेची' अपेक्षा करणे म्हणजे

मूर्खाच्या नंदनवनात राहण्यासारखे होईल. जे पेरले तेच उगवणार.. म्हणून आधी चांगले पेरावे

लागेल!

 बहुतांश वर्तमानपत्रे शिक्षणावर आधारित लेख प्रसिद्ध करत असतात. दहावी /

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबवतात. स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे

मार्गदर्शनपर लेख प्रसिद्ध करत असतात. सारांश हाच की, वर्तमानपत्रे

शिक्षणव्यवस्थेला काही अंशी न्याय देतात; परंतु दुर्दैवाने दूरचित्रवाहिन्या मात्र या सामाजिक

बांधिलकीपासून कोसो दूर आहेत, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाहीत. उंबराचे फूल उमलावे

तसे एखादा- दुसरा कार्यक्रम करणे म्हणजे न्याय देणे नव्हे.


 ही त्रुटी दूर करण्यासाठी दूरचित्रवाहिन्यांनी रोज अर्धा तास केवळ शिक्षणासाठी हा उपक्रम राबवावा.

केजी टू पीजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर तज्ज्ञांचे कार्यक्रम, अध्ययन-अध्यापनाची विविध तंत्रे,

महाराष्ट्रात अनेक संस्था उपक्रमशील आहेत त्यांना प्रसिद्धी, असे लोकाभिमुख कार्यक्रम राबवता येऊ

शकतात. राजकारण आणि राजकारणी यांना जेवढा वेळ दिला जातो, त्याच्ा फक्त एक टक्का वेळ

शिक्षणाला दिला तरी खूप झाले. तेच तेच विषय, चर्चा, चेहरे पाहून आता वीट आला आहे.

वांझोट्या चर्चांपेक्षा काही तरी सकारात्मक कृती हवीय. शुल्क नियंत्रण कायदा, केंद्रीय पद्धतीने

पहिलीला प्रवेश, आíथक दुर्बल घटकांना खासगी शाळेत 25 टक्के आरक्षण,

एमपीएससीसारख्या स्वायत्त यंत्रणेमार्फत शिक्षक/ प्राध्यापक/ शिक्षकेतर

कर्मचार्‍यांची भरती यांसारख्या अनेक दृष्टिपथातील उपाययोजना शासनाने 'थंड्या बासनात'

ठेवल्या आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एक गोष्ट निश्चित की, जर 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे स्वप्न

प्रत्यक्षात, वास्तवात आणायचे असेल तर 'शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धीकरणाचे शिवधनुष्य' सर्वात

आधी उचलावे लागेल आणि ते उचलण्याची क्षमता या घडीला केवळ प्रसारमाध्यमांकडे आहे, हे

निश्चित. एक गोष्ट विनम्रपणे करावी लागेल की, अनेक वर्तमानपत्रे शिक्षणाला 'जागा' देतात,

शिक्षणातील प्रश्न सातत्याने ऐरणीवर आणतात, मात्र दूरचित्रवाहिन्या हे माध्यम शिक्षणाला योग्य

न्याय देत नाही, असे म्हणणे फारसे धाडसाचे ठरणार नाही.