गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

शाळा दत्तक योजनेपेक्षा कॉर्पोरेट उद्योग समूहाने "शैक्षणिक ट्रस्ट स्थापन " करत सीएसआर फंडाच्या माध्य्मातून स्वतःच्या शाळा सुरु कराव्यात ....

    शिक्षण मंत्र्यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमात राज्यातील ६२ हजार शाळांचा पायाभूत विकास व्हावा यासाठी सरकारी शाळा कॉर्पोरेट उद्योग समूह , सामाजिक संस्थांना  १० वर्षांसाठी दत्तक देऊन त्यांच्या सीएसआर फंडातून विकास उपक्रमाचे  सूतोवाच केलेले आहे .  सीएसआर निधीच्या वापराच्या मोबदल्यात उद्योग समूहांना  आपल्या आवडीचे नाव शाळांच्या नावासमोर देता येणार आहे . अशा प्रकारचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकार कडे पाठवलेला आहे .

      सकृत दर्शनी सरकरचा हा निर्णय हा स्वागतार्ह असला तरी  एक प्रकारे सदरील निर्णय हा सरकार शिक्षणाकडे आर्थिक बोजे अशा दृष्टिकोनातून पाहण्याच्या वृत्तीवर शिक्कामोर्तब करणारा आहे . एका एका आमदाराला काही शे करोड रुपयांचा निधी देणाऱ्या सरकारला सरकारी शाळांचा खर्च  डोईजड होणे हि एक प्रकारे सरकारची शिक्षणाप्रती असंवेदनशीलता स्पष्ट करणारी बाब आहे .

                    सरकारी शाळांच्या बाबतीत २ मूलभूत प्रश्न आहेत . पहिला प्रश्न म्हणजे निधी उपलब्धतेचा आणि दुसरा प्रश्न आहे तो उपलब्ध निधीच्या रास्त वापराचा . त्यामुळेच वर्षाला ८२ हजार करोड रुपयांचा खर्च शिक्षणावर करून देखील सरकारी शाळांतील पायाभूत सुविधा आणि  शिक्षणाच्या दर्जाचा प्रश्न चिन्हांकितच आहे .

             दर्जेदार मोफत शिक्षण हा  जनतेचा  मूलभूत हक्क असला  तरी याबाबतीत जनतेची ससेहोलपट होते आहे हे अगदी स्पष्टच आहे . नुकत्याच देशव्यापी सर्वेक्षणांतून पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षणाच्या दर्जातील घसरण समोर आलेली आहे .   

               मांडावयाचा मुद्दा हा आहे की  कॉर्पोरेट कंपन्यांनी , सामाजिक संस्थांनी सीएसआर निधीच्या माध्यमातून शाळा दत्तक घेतल्या तरी सरकारचे नियम आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना " नियमांची ढाल पुढे करत जडलेला 'अडवणुकीचा ' रोग " लक्षात घेता खाजगी कंपन्यांनी किती हि निधी खर्च केला तरी " सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधा आणि दर्जाचे उच्चीकरणाचे स्वप्न " पूर्णत्वास जाणे अग्निदिव्य ठरू शकते . निधी दिला तरी शिक्षक , त्यांच्या बदल्या , त्यांचा अशैक्षणिक कामासाठी केला जाणारा वापर या गोष्टी सरकारच्याच हातात राहणार असल्याने "दत्तक शाळा " या उपक्रमातून फारसे काही साध्य होणार नाही .

 

                   सरकारी शाळांच्या दर्जा आणि सुविधांच्या उच्चीकरणासाठी केवळ निधीची वानवा हा एकमेव प्रश्न नसून शिक्षण विभागाला लागलेली भ्रष्टाचार ,लाचखोरी ,टक्केवारीची कीड हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे . त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांनी सरकारी शाळा दत्तक घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा राज्य स्तरावर एक शैक्षणिक ट्रस्ट स्थापन करून त्याच्या माध्यमातून " ना नफा ना तोटा या तत्वावर " स्वतःच्या शाळा काढाव्यात आणि पालकांपुढे मोफत नको परंतु किमान 'माफक दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल ' अशी एक व्यवस्था निर्माण करावी .  " टीच फॉर इंडिया "  हि संस्था अनेक सरकारी शाळांमध्ये विनामूल्य शिक्षक पुरवत असते त्या शिक्षकांना देखील 'फ्री हॅन्ड " देऊन दर्जेदार शिक्षण देण्यासाठी उपयोग करून घेता येईल .

 

                सरकारी शाळांचा प्रश्नांकित दर्जा आणि खाजगी शाळांची अनियंत्रित न परवडणारी फीस यामुळे नागरिकांची आर्थिक -मानसिक कुचंबणा होते आहे .  हि कुचंबणा टाळण्यासाठी  सीएसआर फंडाच्या माध्यमातून स्थापन केलेल्या शाळा हा 'सुवर्णमध्य " ठरू  शकेल . आरटीई प्रवेशासाठी होणारी भाऊगर्दी याचाच सर्वोत्तम पुरावा ठरतो .   पालकांची प्रवेशासाठीची कसरत ,ससेहोलपट टाळण्यासाठी व सर्व सामन्यांना झेपेल असे शिक्षण व तेही दर्जेदार यासाठी अशाच प्रकारे देशातील सर्व उद्योगपती , सामाजिक संघटना , लोकांनी पुढाकार घ्यायला हवा . मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करणाऱ्या शाळांना स्पर्धा निर्माण करण्यासाठी देशपातळीवर उद्योगपती , समाजसेवक , शिक्षणप्रेमी यांचा सहभाग असलेला ट्रस्ट स्थापन करावा . खाजगी उद्योगांनी त्यांना नफ्याच्या २ टक्के सामाजिक कार्यासाठी 'सीएसआर फंड ' खर्च करणे अनिवार्य आहे त्याचा वापर करत देशामध्ये " मोफत नाही परंतू सर्वसामान्यांना परवडेल अशा रीतीने अत्यंत माफक दरात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या १ली ते १० वी पर्यंतच्या त्या त्या राज्याचे बोर्ड व केंद्रीय बोर्डाच्या शाळा सुरु कराव्यात . सुरवातीला प्रत्येक जिल्हयात एक शाळा सुरु करावी व पुढे त्यांचा विस्तार अगदी तालुका पातळीवर करावा .

                   सरकारने  आरटीई अंतर्गत प्रति विद्यार्थी १७ हजार ६०० रुपये खाजगी शाळांना देण्यापेक्षा ती मदत अशा प्रकारे "देशपातळीवर शैक्षणिक ट्रस्ट " स्थापन करत सुरु केल्या जाणाऱ्या शाळांना करावा . अशा मागणीवर प्रश्न विचारला जाईल की  अशा शाळा स्थापने , चालवणे शक्य होऊ शकेल का ? तर याचे उत्तर असणार आहे नक्की शक्य आहे .  हजारो -लाखो करोडोंचा उद्योग यशस्वीपणे चालवणाऱ्या उद्योगपतींना सेवाभावी वृत्तीने दर्जेदार शाळा चालवणे सहज शक्य आहे  . फक्त एक गरज आहे ती म्हणजे सरकारने नियम ,परवानग्यांचा अडथळा उभा करू नये .

                          वर्तमानात भारताच्या प्रगतीबाबत कितीही डंका पिटला जात असला तरी भारतातील शैक्षणिक दर्जा घसरतो आहे हे वारंवार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या  परीक्षणातून स्पष्ट झालेले आहे  . अमृत  काळातील भारतासमोरील सर्वात मोठे कोणते आव्हान असणार आहे ते म्हणजे "शिक्षणाचा घसरता दर्जा आणि न परवडणारे शिक्षण " . आणि म्हणूनच गरज आहे ती " माफक दरात शिक्षण देणाऱ्या संस्थांची " आणि त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे उद्योगपती आणि समाजातील  शिक्षण प्रेमी घटकांनी एकत्र येत " सीएसआर फंडाचा वापर करत राज्य - देशपातळीवर शैक्षणिक ट्रस्टची स्थापना करणे . खाजगी शाळांची फीस  आत्ताच ९० टक्के पालकांच्या  आवाक्याबाहेर गेलेली आहे . त्या पालकांना 'माफक दरात ' शिक्षण देणाऱ्या व्यवस्थेची नितांत गरज आहे ती अशा ट्रस्टच्या माध्यमातून  पूर्ण केली जाऊ शकते .

                         उद्योगपतींनी अशा शैक्षणिक संस्था काढल्या तर आज जे  उद्योगांच्या दृष्टीने कालबाह्य शिक्षण दिले जात आहे त्याला वळसा घालून वर्तमानात आवश्यक असे कौशल्य असणारे शिक्षण अशा शैक्षणिक संस्थातून दिले जाऊ शकत असल्याने हि बाब उद्योग आणि विद्यार्थी यांच्या दृष्टीने  " विन विन " अशी होऊ शकते .

                        राज्यातील आणि देशातील उद्योगपती करोडो रुपयांचा सीएसआर फंड विविध सामाजिक कारणांसाठी करत असतात त्या निधीच्या माध्यमातून निश्चितपणे शैक्षणिक संस्था चालवल्या जाऊ शकतात  आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत उपकारक अशी गोष्ट ठरू शकते . योग्य प्रकारचे शिक्षण आणि कौशल्य विद्यार्थ्यांना दिले की  ते आपसूकच आपल्या पायावर उभा राहू शकतात .

                    सरकारच्या "दत्तक शाळा " या उपक्रमाच्या निमित्ताने राज्यातील उद्योग पतींनी आणि सामाजिक संस्थांनी " सीएसआर फंडाच्या माध्यमातून स्वतःच्या शैक्षणिक संस्था " यावर विचारमंथन करावे हि जनभावना मांडण्यासाठी हा एक प्रयत्न .

                  सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे सरकारचे घटनादत्त कर्तव्य आहे आणि सरकारने ते झटकण्यासाठी या पूर्वीच खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा सुरु करून आपली जबाबदारी झटकली आहे . आता आहे त्या सरकारी शाळा दत्तक देऊन सरकार शिक्षणातून पूर्ण अंग काढून घेऊ शकते आणि तो  समाजाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक पाऊल ठरू शकते .

 





सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .  danisudhir@gmail.com 9869226272 

बुधवार, १७ मे, २०२३

पालकांची प्रवेशासाठीची ससेहोलपट रोखण्यासाठी सीएसआर फंडच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था उभाराव्यात !

  

          अपत्य झाल्यानंतर आकाशाला गवसणी घालणारा आनंद अपत्याच्या शाळा प्रवेशाच्या वेळी विरून जातो . पूर्वीच्या काळी मानवाला चिंता असायची ती घर , लग्न यासाठीच्या खर्चाची . पण अलीकडच्या काळात पालकांना सर्वाधिक चिंता असते ती अपत्याच्या शाळा प्रवेश डोनेशन व शाळेच्या अवाढव्य फीस ची . शिक्षणाच्या बाबतीत पालकांची अवस्था "इकडे आड तिकडे विहीर " अशी झालेली आहे.  याचे कारण म्हणजे सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळणे सुलभ असते , शुल्क नसते  पण शिक्षणाचा दर्जा प्रश्नांकित असतो तर दुसरीकडे खाजगी शाळांचे शुल्क इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे की  सामान्य पालकांच्या ते आवाक्या बाहेर गेलेले आहे . 

          या विषयावर प्रकाशझोत टाकणे अत्यंत गरजेचे आहे याची जाणीव झाली ती आरटीई अंतर्गत प्रवेश न मिळालेल्या पालकांनी साधलेला संवाद . थोड्या फार प्रमाणात सामाजिक कार्यात सहभाग असलयाने अनेक पालकांनी तुमच्या ओळखीने  पालिकेच्या शाळेत प्रवेश मिळेल का? अशा प्रक्रारे फोन केल्याने व खाजगी शाळेची फीस परवडत नाही हि खंत व्यक्त केल्याने समाजात "शाळा प्रवेशाचा मुद्दा " किती ज्वलंत आहे याची पुनर्प्रचिती आली .

सरकारने विकसित देशांचे अनुकरण करावे :  

    भारत हा अनुकरणशील देश असला तरी भारताने सरकारी शाळांच्या दर्जाचे मात्र अनुकरण केलेले दिसत नाही .  जपान , अमेरिका , ब्रिटन यासम अनेक पाश्चात्य विकसित देशात सर्वोच्च प्राधान्य असते ते सरकारी शाळांना .  अगदीच नाईलाज असेल तर आणि तरच खाजगी शाळांचे दरवाजे ठोठावले जातात .  आपल्या देशात मात्र याच्या अगदी विसंगत  स्थिती आहे . आज जेवढी मुले सरकारी शाळांत शिकत आहेत त्यापैकी ९९ टक्के पालकांनी त्यांना खाजगी शाळांचे शुल्क परवडत नाही म्हणून नाईलाजाने प्रवेश घेतलेला असतो . रुचण्यास -पटण्यास जड असले तरी हेच जमिनीवरील कटू वास्तव आहे .

               आरटीई शाळेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्के आरक्षण  हा प्रकार एक प्रकारे सरकारनेच आपल्या शाळांच्या दर्जाविषयी असणाऱ्या प्रश्नचिन्हांवर शिक्कामोर्तब करणारा ठरतो .  सरकारला प्रश्न हा आहे की  , तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामागे १७ हजार ६०० रुपये खाजगी शाळांना देण्यापेक्षा त्या पैशातून सरकारी शाळांचा दर्जा खाजगी शाळांच्या समकक्ष करण्यासाठी  प्रयत्न का करत नाहीत . २५ टक्क्यांना आरक्षण देत जनतेचे कैवारी असल्याचा अविर्भाव दाखवला जात असला तरी उरलेल्या ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या "दर्जेदार शिक्षणाचे " काय ? याचा देखील कधी संवेदनशील पणे विचार करणार आहेत की  नाही ?

ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षणक्रांतीची निकड :

               खाजगी शाळांच्या शुल्काचा प्रश्न हा अनेक वर्षे प्रलंबित आहे आणि तो प्रलंबितच राहणार हे स्पष्टपणे दिसते आहे . बहुतांश खाजगी  शाळा या आजी -माजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या असल्याने त्यांच्या अनियंत्रित शुल्काला वेसण घालण्याची इच्छा कोणत्याच सरकार मध्ये दिसत नाही हे आजवरच्या भूतकाळातून स्पष्टपणे दिसून येते आहे . त्यामुळे भविष्यात देखील खाजगी शाळांच्या शुल्काचा प्रश्न हा अनुत्तरीतच राहणार आहे हे निश्चित  .

                समस्या सर्वज्ञात आहे आणि त्या वर प्रस्थापित यंत्रणेत ईलाज असंभव आहे हे  देखील सर्वज्ञात आणि सर्वमान्य आहे . या पार्श्वभूमीवर गरज आहे ती वेगळ्या उपाय योजनांची . गुणवत्तापूर्ण -दर्जेदार  शिक्षणासाठी पैशांअभावी होणारी ससेहोलपट हि समाजातील वर्तमानातील सर्वाधिक चिंताजनक बाब आहे . यावर केवळ 'चिंता ' करण्यात धन्यता न मानता "चिंतन " करत उपाययोजना करण्यास प्राधान्य देणे हे सर्वाधिक गरजेचे आहे .

 

        वर्तमानातील दृष्टिक्षेपातील यावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे देशातील टाटा -विप्रो - एलअँडटी - सत्यम -रिलायन्स -विविध खाजगी बँका -एनजीओ  यासम सर्व घटकांनी  एकत्र येत "  शैक्षिणक ट्रस्ट " स्थापन करावा . " व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी " ( Corporate  Social  Responsibilty Fund ) चा वापर अन्य सामाजिक विकासाठी करण्यापेक्षा त्याचा वापर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी करावा . असे म्हटले जाते की  ,पोट भरण्यासाठी एकदा अन्नदान करण्यापेक्षा त्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यभर अन्न कमवण्याचे कौशल्य -काम देणे अधिक मानवी हिताचे असते  आणि म्हणूनच देशातील गरिबात गरीब विद्यार्थ्याला देखील दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे त्या व्यवस्थेच्या माध्यमातून  खऱ्या अर्थाने शिक्षणक्रांती घडवणे हि काळाची गरज  आहे .

           कंपनी कायदा २०१३ कलम १३५ नुसार कंपन्यांना ३ वर्षाच्या सरासरी नफ्याच्या २ टक्के सामाजिक व्यावसायिक सामाजिक जबाबदारी   निधी म्हणून खर्च करणे अनिवार्य आहे .  देशातील सर्व कंपन्यांचा विचार करता  सीएसआर फंडातून जमा होणारी रक्कम हि खूप मोठी असणार आहे आणि त्याचा विनियोग योग्य रीतीने केला तर निश्चितपणे  प्रत्येक जिल्ह्यात  एक शाळा व भविष्यात त्यांचा विस्तार हा तालुका पातळीपर्यंत केला जाऊ शकतो .

दात्यांना  विश्वासार्ह प्लॅटफॉर्म हवाय :

  सुदैवाने भारतात सकारात्मक गोष्टींसाठी 'दान ' करणाऱ्यांची संख्या मोठी आहे . अशा प्रकारे दान करताना त्यांच्या पुढील प्रमुख समस्या म्हणजे ज्या हातात दान देणार आहोत  त्या " हातांची विश्वासार्हता ".   आपण दिलेल्या दानाच्या देखील अपहार केला जाणार नाही याची खात्री नसल्याने अनेक जण आखडता हात घेतात .  हि जाणवणारी उणीव भरून काढण्यासाठी  देशातील खाजगी कंपन्या - खाजगी बँका -खाजगी उद्योजक यांनी एकत्र येत देशपातळीवर शैक्षणिक ट्रस्ट स्थापन करावा . या ट्रस्टच्या माध्यमातून सुरुवातीला देशातील प्रत्येक  जिल्ह्याच्या ठिकाणी पहिली ते १० वी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळा सुरु कराव्यात .  खाजगी शाळांना  अशा शाळांच्या माध्यमातून स्पर्धा निर्माण करणे हाच खाजगी शाळांच्या मनमानी शुल्क वाढीला लगाम घालण्याचा  सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो .   ट्रस्टने १/२ वर्षाच्या कालावधीत दर्जेदार शिक्षण दिले व जनतेच्या विश्वास संपादन केला तर भविष्यात ट्रस्टला निधीची कधीच उणीव भासणार नाही हे नक्की . भारतीय समाजाला  दान करण्याची  जुनी संस्कृती असल्याने देशातील अनेक सामान्य नागरिक देखील वर्षाला सहजपणे ५/१० हजारांची मदत ट्रस्ट करू शकतो .  फक्त गरज आहे ती दात्यांना विश्वासार्ह प्लॅटफॉर्म देणाऱ्यांची .

  आणखी महत्वाची गोष्ट हि की  "मोफत शिक्षण " हवे अशी धारणा आर्थिक वंचित घटकांची  देखील नाही , त्यांना केवळ अपेक्षा आहे ती "माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण -दर्जेदार शिक्षण " मिळण्याची . देशातील संवेदनशील उद्योजक -कंपन्यांनी  " सीएसआर फंडच्या माध्यमातून माफक दरात शैक्षणिक संस्था " उभारण्याचा विचार करावा या अपेक्षेने पूर्णविराम .

तळटीप : सर्वच सरकारी शाळा हा दर्जाहीन व सर्वच खाजगी शाळा या दर्जेदार असतात हि जाणीवपूर्वक पसरवली गेलेली अफवा असून "काही "  खाजगी शाळांचा दर्जा हा  सरकारी शाळांच्या दर्जापेक्षा काहीसा उजवा आहे हे खरे  शैक्षणिक वास्तव आहे .




सुधीर
लक्ष्मीकांत दाणी , 

(लेखक विविध सामाजिक विषयाचे अभ्यासक व पालक आहेत )

संपर्क : ९८६९२२६२७२

ईमेल: danisudhir@gmail.com