मंगळवार, १९ मार्च, २०१३

दहावीच्या पुस्तकांची रखडपट्टी होतेच कशी?




'दहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडणार?' हे वृत्त मुखपृष्ठावर (१७ मार्च ) प्रकाशित करून 'लोकसत्ता' ने अनेक पालकांच्या मनातील खदखदीला वाचा फोडल्याबद्दल सर्वप्रथम 'लोकसत्ता'चे खास आभार.
या वृत्तातील बालभारतीचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सदस्य- अध्यक्ष यांचे विसंगत दावे शिक्षणातील अनागोंदी व असंवेदनशीलताच अधोरेखित करतात. दहावीच्या पाठय़पुस्तकांची निर्मिती म.रा.मा. मंडळातर्फे केली जाते. बदललेल्या अभ्यासक्रमाचा मसुदा मंडळाच्या वेबसाइटवर १२ मार्च २०१२ लाच निश्चित केला असल्याचे दिसते (जा. क्र. : एसएससी - २१०१९५/१० डीटी १२/३/२०१२).\ महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडय़ानुसार 'कालसुसंगत'    नवीन अभ्यासक्रम नववी आणि दहावी इयत्तांसाठी अनुक्रमे २०१२ व २०१३ पासून लागू करण्याचे धोरण ठरविले. नववी आणि दहावीचा अभ्यासक्रम एकाच वेळी निश्चित केला असेल तर दहावीच्या अभ्यासक्रमाचा मसुदा अद्यापपर्यंत  बालभारतीकडे का पाठवण्यात आला नाही? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
पुस्तकांचा दर्जा अद्ययावत राखण्यासाठी आणि पुस्तके वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार २७ जानेवारी १९६७ ला बालभारतीची स्थापना करण्यात आली. एवढा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असताना आणि पुस्तकांची जबाबदारी आपली आहे हे ज्ञात असताना बालभारती हातावर हात ठेवून का बसली? त्यांनी मंडळाकडे अभ्यासक्रमाच्या मसुद्याकरिता पाठपुरावा का नाही केला, हे सर्व अनाकलनीय आहे. दोन्ही 'स्वायत' यंत्रणा असल्यामुळे हा मानाचा मुद्दा झाल्याचे दिसते.. अन्यथा आपले उत्तरदायित्व समजून एकमेकाशी सुसवांद साधला असता\ स्वायत्तता प्राप्त असली तरी वृत्ती मात्र 'सरकारी'च आहे, यातून ध्वनित होते.
सर्वसाधारणपणे दहावीचे महत्त्व लक्षात घेता अनेक शाळा नववीच्या परीक्षा लवकर घेऊन एप्रिल १५ तारखेपासून विशेष क्लास सुरू करतात. अनेक पालक उन्हाळय़ाच्या सुट्टीत आपल्या मुलांना 'क्रॅश कोर्स' लावतात. गेल्या वर्षीही नववीच्या काही पुस्तकांना विलंब झाला होता. काही पुस्तकांची बाजारात टंचाई होती. यातून योग्य बोध घेत योग्य निर्णय वेळीच घेतला असता तर आज जी वेळ आली आहे ती आलीच नसती. 'लोकसत्ता'ला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा आणि विद्यार्थी-पालकांची संभाव्य ससेहोलपट
टाळावी.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा