प्रति ,
मा . शिक्षणमंत्री ,
महाराष्ट्र राज्य .
विषय : पायाभूत चाचण्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी
या पायाभूत चाचण्या त्रयस्त यंत्रणेमार्फत घ्या अन्यथा दिशाभूल थांबवा ... ,
(पायाभूत चाचण्या त्रयस्त यंत्रणेमार्फतच घेण्यातच 'अर्थ ' अन्यथा तो एक 'निरर्थक ' सोपस्कार (च )!)
" प्रश्न / समस्यांवरील उत्तर / उपाय म्हणजेच आणखी एक प्रश्नाची निर्मिती आणि समस्येत भर " वर्तमान शिक्षण विभागाच्या या कार्यसंस्कृतीमुळे महाराष्ट्र प्रगत शिक्षण उपक्रमांतर्गत खरंच प्रगत होणार की नेहमीप्रमाणे तो एक "कागदोपत्री ऑल इज वेल " सोपस्कार ठरणार या प्रश्नाचे उत्तर भविष्याच्या उदरात दडलेले असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य किती 'प्रगत ' असणार याचे ऊत्तर देखील त्यातच दडलेले आहे . हा प्रश्न उपस्थित करण्यामागचे प्रयोजन म्हणजे ७ ते १२ सप्टेंबर या कलालावधीत इयत्ता २री ते आठवीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात आलेली पायाभूत चाचणी आणि इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात आलेली नैदानिक चाचणी.
LINK FOR PUBLISHED ARTICLE
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/13092017/0/7/
वर्तमान पायाभूत चाचण्या ज्या प्रकारे 'पार' पाडल्या जात असल्याचे समजते त्यावरून या परीक्षांची फलनिष्पत्ती 'शून्य ' असणार आहे आणि त्यामुळेच या चाचणीचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास " ती शिक्षण विभागाने विद्यार्थी -पालक यांची व शिक्षक आणि स्वत:ची केलेली फसवणूक होय "
गांभीर्यशून्य नियोजनाअभावी पायाभूत चाचणीच्याच उदिष्टाला हरताळ !!!
एक गोष्ट विनम्रपणे नमूद करावी लागेल की , चाचणीचा हेतू निश्चितच स्तुत्य आहे . प्रश्न आहे तो ती ज्याप्रकारे पार पडली जात आहे त्याचा .
कुठलाही स्तुत्य उपक्रम गांभीर्यशून्य नियोजनाअभावी कसा "नापास " होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'पायाभूत चाचणी अंमलबजावणी
' .
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन आणि त्या
अनुषंगाने 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ' गुणवत्ता विकासासाठी . विद्यार्थ्यांच्या " खऱ्या " गुणवत्तेचा कसोटी पहाणारी इयत्ता २री ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी घेण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्षण विभागाने योजिला. विद्यार्थी किती पाण्यात आहे याची वास्तविक पातळीवर चाचपणी करावयाची आणि तेवढ्यावरच न थांबता त्याला गुणवत्ता सुधरविण्यासाठी विशेष मार्गदर्शन द्यावयाचे . परंतु शिक्षण विभागाच्या झापडबंद कार्यसंस्कृतीमुळे आता त्याच पायाभूत चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . अनेक शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार वर्तमान पायाभूत चाचण्यांची काठिण्य पातळी अगदीच
सोपी
आणि पातळ ठेवण्यात आली आहे , आणि मूल्यमापन करणारे शिक्षक देखील त्याच शाळेतील त्याच विद्यार्थ्यांना शिकवणारे आहेत
त्यामुळे अप्रगत विद्यार्थी देखील प्रगतच असल्याचे दिसून येणार आहे .
वेळोवेळी प्रथमच्या अहवालातून समोर आलेले गुणवत्तेचे वास्तव आणि पायाभूत चाचण्यांतून येणारे गुणवत्तेचे वास्तव हे विरोधी टोकाचे असल्याचे दिसून येत असल्यामुळे
पायाभूत चाचण्यांचे मूल्यमापन हे संशयातीत असल्याचे सिद्ध होते .
स्वतंत्र परीक्षेची आवश्यकता हाच "चालू " परीक्षांचा पराजय :
मुळात प्रश्न हा आहे की अशा वेगळ्या परीक्षेची आवश्यकता का भासली ? अर्थातच यामागील कारण सर्वश्रुत आणि सर्वज्ञात आहे . खाजगी संस्थांची शैक्षणिक दुकानदारी चालविण्यासाठी आणि सरकारी शाळेतील शिक्षकांच्या नोकरीला बाधा पोहचूनये यासाठी गेल्या काही वर्षात "ढकलगाडी " चा प्रयोग राबविला जात होता . विद्यार्थ्यांना काही येऊ वा ना येऊ अगदी दहावीसारख्या परीक्षेत शिक्षक स्वतः पुढे होत आपला सक्रीय सहभाग नोंदवत असत . विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात गाळलेल्या जागा , जोड्या जुळवा याचे जाहीर वाचन करावयाचे तर ग्रामीण भागात अगदी फळ्यावर उत्तरे लिहून दिली जातात . सहकार्याच्या भूमिकेतून अगदी "ढ " मुलालाही बोर्डाच्या परीक्षेतून सहीसलामत बाहेर काढले जात असे .
मराठवाड्यासारख्या भागात तर हा सिलसिला अगदी पदव्युत्तर पर्यंत अशीच सहकार्याची भूमिका शिक्षक व संस्था चालकांची आहे . याचे बिंग फुटले ते प्रथम ने वेळोवेळी केलेल्या खाजगी सर्वेषणातून . अगदी ७ वीच्या मुलांना दुसरीचे मराठी वाचता येत नाही तर अर्ध्याहून अधिक मुलांच्या गणितातील अगदी गुणाकार -भागाकाराच्या मुलभूत संकल्पना देखील ज्ञात नसल्याचे उघड झाले . दुसरीकडे मात्र बोर्डाचे निकाल नवद्दी पार करताना दिसत होते . या विसंगतीवर वेळोवेळी शिक्षण अभ्यासकांनी -तज्ञांनी -माध्यमांनी ओरड केली आणि त्यातून त्रयस्त यंत्रणेमार्फत विद्यार्थ्यांचे
आकलन तपासण्याची संकल्पना पुढे आली आणि त्याचे स्वरूप म्हणजेच "पायाभूत चाचणी ."
त्रयस्त यंत्रणेमार्फत पायाभूत परीक्षा घ्या अन्यथा दिशाभूल थांबवा ...
वर्षातून
एकच चाचणी घ्यावी पण ती पूर्णतः त्रयस्त यंत्रणेमार्फत म्हणजेच शिक्षण विभागाचा समावेश नसणाऱ्या यंत्रणेकडून .गेल्यावर्षी वेगवेगळ्या शाळांमध्ये पायाभूत चाचण्या वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आल्या . यावर्षी किमान त्या एकाच दिवशी घेतल्या जात आहेत एवढीच काय ती प्रगती . बाकी सर्व " बसवलेल्या नाटकाच्या स्क्रिप्ट प्रमाणे फिक्स "
परीक्षेच्या आधी सरावाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून प्रश्न सोडवून घेणे , प्रत्यक्ष परीक्षेत उत्तर सांगणे ,सढळ हाताने मूल्यमापन आणि विद्यार्थी "गुणवत्तेत प्रगत " असल्याचे कागदोपत्री दाखवणे . शिक्षकांना माहित आहे , आपण जर विद्यार्थी प्रगत नसल्याचे दाखवले तर शेवटी आपल्यावरच पुन्हा त्याला प्रगत करण्याची जबाबदारी येणार आहे . त्यामुळे विद्यार्थी प्रगत दाखवणे हेच अधिक शहाणपणाचे आहे हे शिक्षकांनी जाणलेले असल्यामुळे वर्तमानातील पायाभूत चाचण्या केवळ वार्षिक सोपस्कार ठरत आहेत .
पायाभूत चाचण्यांची उद्दिष्टपूर्ती खऱ्या अर्थाने करावयाची असेन तर या चाचण्या वर्षातून एकदाच ' प्रथम ' वा टाटा सामाजिक संस्था या सारख्या त्रयस्त यंत्रणेमार्फ़त घ्यायला हव्यात .
शिक्षकांची देखील पायाभूत चाचणी गरजेची :
शिक्षकांना राष्ट्र निर्मितीचे अभियंते असे संबोधले जाते . एका शिक्षकाच्या हातून हजारो मुलांचे भवितव्य घडत असते . विद्यमान बाजारू डीएड /बी एड व्यवस्थेमुळे " क्वालीटी ओके " असे शिक्षक बाहेर पडतील हे शिक्षण विभाग काय खुद्द ब्रम्हदेव देखील सांगू शकणार नाही . या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चालणारा खेळ टाळण्यासाठी शिक्षक /प्राध्यापक ज्या ज्या वर्गांना शिकवणार आहेत त्या त्या वर्गांच्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा त्रयस्त यंत्रणेमार्फत(च ) घ्यावी . प्रती वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अशी परीक्षा व्हायला हवी .
अर्थातच शिक्षण क्षेत्राच्या शुद्धीकरणाचे अनेक उपाय संभव आहेत . त्यासाठी सर्वाधिक गरज आहे ती शिक्षण विभागाने "जागे " होण्याची . शिक्षण विभागाचे एक बरे आहे त्यांनीही राजकारण्यासारखे धोरण अवलंबविले आहे . कोणी कितीही लिहा , कितीही मेल पाठवा , निवेदन द्या ;आम्हाला काहीच फरक पडत नाही . आम्ही आमच्याच मार्गाने जाऊ !
धन्यवाद
!!!
आपला ,
सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,
प्रत ,
·
शिक्षण आयुक्त , महाराष्ट्र राज्य .
·
शिक्षण सचिव , महाराष्ट्र राज्य .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा