गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

प्रसारमाध्यमांनी आम्हा सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी हीच जिद्द दाखवावी ..

 लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी हाच "रामशास्त्री बाणा" दाखवावा...     


           प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ का म्हटले जाते याची प्रचिती " सुशांत सिंह प्रकरणाचा तपास "  सीबीआयकडे  निर्णयावरून येते. संबंधित राज्य शासन व मुंबई पोलीस यांचा प्रखर विरोध असताना ही केवळ " रिपब्लिक “ सारख्या टीव्ही चॅनल " ने हा विषय सातत्याने दोन महिने लावून धरला .  शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना पेश करत सामान्य नागरिकांची " ई_ चळवळ " उभा केली आणि पर्यायाने त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयास या प्रकरणाचा तपास सीबीआय'कडे देणे भाग पडले.        

       प्रसारमाध्यमांकडून मिळणारा हा एक सुखद अनुभव ठरला. आजवरची प्रसारमाध्यमांची कार्यपद्धती ही पाच दहा वर्षाच्या लहान मुलासारखी दिसून येते. लहान मूल जसे नवीन खेळणे दिसले की जुने खेळणे फेकून देते तद्वतच प्रसारमाध्यमे एखादा नवीन विषय मिळाला की जुन्या विषयाला तिलांजली देताना दिसतात.यामुळे कुठलाच विषय तडीस जात नाही , कुठल्याच विषयाला न्याय मिळताना दिसत नाही


       ही कार्यपद्धती भारतातील शासकीय यंत्रणांना, लोकप्रतिनिधींना ज्ञात झाल्यामुळे त्यांना याची खात्री असायची की ,  विषय कितीही संवेदनशील असला तरी एक-दोन दिवस "वांझोट्या चर्चा होतात ,बातम्या येतात व जातात" व तदनंतर प्रसारमाध्यमे नवीन विषयाकडे वळतात. .

         या कार्यपद्धतीमुळे गेल्या काही दशकात प्रसारमाध्यमांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवून देखील भारतीय यंत्रणेत तसूभरही फरक होताना दिसला नाही. प्रसारमाध्यमांच्या धरसोड वृत्तीमुळे " एक ना धड भाराभर चिंध्या" अशी अवस्था झाल्यामुळे प्रसार माध्यमे  कुठल्याच विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत.  प्रसारमाध्यमांनी ठरवले तर ते राजकीय विरोधाला न जुमानता आपले कर्तव्य पार पाडू शकतात याचा वस्तुपाठ रिपब्लिक चैनल ने भारतीय प्रसारमाध्यमांसमोर ठेवलेला आहे.       
  vimp:    भारतीय सर्वसामान्य नागरिकांची एवढीच अपेक्षा आहे की, भारतातील सर्वच प्रसारमाध्यमांनी सुशांत प्रकरणात जो रामशास्त्री बाणा दाखवला तोच बाणा देशातील करोडो नागरिकांना न्याय देण्यासाठी देखील दाखवावा.
       स्वातंत्र्याच्या ७ दशकानंतर देखील आम आदमी आज अगदी मूलभूत हक्कापासून वंचित आहे . "आम आदमीच्या न्यायासाठी " मात्र प्रसारमाध्यमे इतके कसोशीने लढताना दिसत नाहीत . 


          अशी किती तरी उदाहरणे देता येतील की , भारतात लोकशाही असून देखील निवडणुकीतील 'मता  व्यतिरिक्त सामान्य नागरिकांच्या मताला , हक्काला " येथे शून्य किंमत आहे .

         अगदी सध्या उदाहरणाने सुरुवात करूयात .  भारतात लोकशाही आहे . लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य , लोकांसाठीचे राज्य . अशी दवंडी पिटली जात असली तरी ज्या लोकांसाठी राज्य चालवले जाते त्या राज्याच्या यंत्रणेची माहिती मात्र लोकांसमोर खुली केली जात नाही . 

        "  नीट विचार केला तर "माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचा पराभव ठरतो " कारण इथे तुम्हला माहिती विकत घ्यावी लागते , त्यासाठी भांडावे लागते . वस्तुतः लोकशाही लोकांसाठी असेल तर देशातील सर्व लोकशाही यंत्रणेची माहिती लोकांसमोर खुली असायला हवी .

 

 image from website .. 

          आम आदमीची एकच अपेक्षा आहे की , " लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या व सुशांत ला न्यायदेण्यासाठी जी जिद्द , जो पाठपुरावा ( या कृतीचे  स्वागत व आनंदच आहे ) प्रसारमाध्यमांनी दाखवला , काही न्यायालयाच्या निकालानंतर आता दाखवू लागले आहेत त्यांनी आम आदमीच्या मूलभूत हक्कासाठी देखील हीच जिद्द , हाच पाठपुरावा दाखवावा . राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व जो पर्यंत देशात सर्व सरकारी यंत्रणांचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर टाकण्याचा कायदा केला जात नाही तो पर्यंत विषय लावून धरावा . या एका कृतीमुळे आपली लोकशाही व्यवस्था मोठ्या प्रमाणात सक्षम होईल . ... 

????????????????????????????????????????
लाख मोलाचा प्रश्न हा आहे की , देशातील प्रसारमाध्यमे आम  आदमीला न्याय मिळण्यासाठी आवश्यक लढा देण्यासाठी तयार आहेत का ?

???????????????????????????????????????


   देशाच्या स्वातंत्र्याला ७३ वर्ष होऊन देखील एकही सरकार रेशन वितरणातील भ्रष्टाचार संपवू शकले नाही. त्याचे कारण एकच त्यांना तो संपवायचाच  नाही .  पारदर्शक कारभाराचा कितीही डंका वाजवला जात असला तरी कुठल्याही शासकीय कार्यालयात गेले तरी आज ही कार्यालयातील कर्मचारी_ अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय काम होत नाही. 

    जो कोणी व्यक्ती देशात भ्रष्टाचार होत नाही असे छातीठोकपणे सांगत असेल त्याने रिअल इस्टेट संदर्भातील कुठलीही फाईल ती फाईल  पालिका किंवा सिडको कार्यालयात जमा केल्यानंतर त्या कार्यालयात न फिरकता मंजूर करून दाखवावी.   


   आज तंत्रज्ञान इतके विकसित झालेले आहे की, प्रसारमाध्यमांनी ठरवले व ते सरकारच्या गळी उतरवले तर देशातील ९० टक्के भ्रष्टाचार एका दिवसात संपवला जाऊ शकेल.    


    उदाहरण  द्यायचे झाल्यास "रेशन वितरण ऍप" चे देता येऊ शकेल. प्रसारमाध्यमांनी सुशांतबाबत  जी संवेदनशीलता दाखवली तीच संवेदनशीलता " आम आदमी"  च्या बाबतीत दाखवत शासनाला रेशन ॲप विकसित करण्यास भाग पाडावे. 

     शासनाने रेशन धारकासाठी वितरीत केलेल्या मालाचा तपशील त्या ॲप वर अपलोड करावा व प्रत्येक रेशन धारकास त्याला प्रत्येक महिन्यात मिळालेल्या रेशन चा तपशील भरण्यास सांगावा. असे केल्यास एक किलोचा ही  अपहार करणे रेशन दुकानदा रास करणे शक्य होणार नाही.    


      वरील  उदाहरण हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले. सर्व सामन्यांच्या  जीवनाशी निगडित असे अनेक प्रश्न आहेत की जे सहजपणे सोडवले जाऊ शकतात. परंतु कटू वास्तव हे आहे की लोकप्रतिनिधींना समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यात स्वारस्य आहे ना प्रसार माध्यमांना! त्यांना केवळ आपली दुकानदारी चालवण्यासाठी जनतेच्या समस्यांचे भांडवल करण्यात स्वारस्य असल्याचे वारंवार दिसून येते. लोकशाहीचे  दुर्भाग्य यापेक्षा वेगळे ते काय असू शकते.      

 
     ९९ टक्के प्रसारमाध्यमे पालिकेच्या रस्त्यावरील खड्डे, उच्चतम दर नीचतम दर्जा त्यावर सातत्याने बातम्या देत असतात, चर्चा करत असतात परंतु पालिकेचा आर्थिक लेखाजोखा पब्लिक डोमन वर उपलब्ध करा हि मागणी मात्र जाणीवपूर्वक मांडीआड करतात.   


                     तीच गत आहे खाजगी शाळेतील आकाशाला गवसणी घालणाऱ्या फिस बाबतीतील. केवळ वरवरच्या बातम्या. अपारदर्शक कारभाराच्या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक कारभार कानाडोळा करतात.           
      प्रसारमाध्यमे अन्य यंत्रणांचे कान टोचताना दिसतात.  आज खरी गरज आहे ती प्रसारमाध्यमांचे कान टोचण्याचे.  त्याच साठी  हा पत्रप्रपंच.

सुधीर दाणी , ९८६९२२६२७२ /९००४६१६२७२


शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खुले पत्र : भविष्यात रुग्णांची ससेहोलपट टाळण्यासाठी “ सार्वजनिक आरोग्य व्यवस्था” सक्षम करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

 


प्रति ,                                                                                                                 दिनांक : १५ ऑगस्ट २०२०
मा. उद्धवजी ठाकरे साहेब ,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
 

विषय : भविष्यात रुग्णांची ससेहोलपट टाळण्यासाठी “ सार्वजनिक आरोग्य व्यवस्था” सक्षम करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.... ( Government Must take measures to strengthen Government Hospital Facilities on war footing)
महोदय,
 
    करोना आपत्ती यासाठी इष्टापत्ती म्हणावी लागेल की, करोनाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे म्हणजेच सरकारी हॉस्पिटल्स ची संख्या, मनुष्यबळाची कमतरता, रुग्ण वाहिन्यांची उपलब्धता व सेवेचा दर्जा याबाबतचे वास्तवदर्शी स्वरूप उघडे पाडले आहे. 
 
     खेदाची बाब ही आहे की, आरोग्य हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असला तरी आजवर त्याकडे सर्वच सरकारांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. 
 
     एकीकडे लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक सरकारी हॉस्पिटलची नगण्य संख्या व सेवेच्या दर्जावर असलेले प्रश्नचिन्ह तर दुसरीकडे खाजगी हॉस्पिटल चे न परवडणारे शुल्क यामध्ये गेली अनेक वर्षे नागरिकांची ससेहोलपट होते आहे , करोनाने त्या ससेहोलपटीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेले आहे. 
 
      करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने मुंबईत तात्पुरत्या स्वरूपातील हॉस्पिटलची सुविधा निर्माण केली असली तरी हा प्रकार म्हणजे " तहान लागल्यावर विहीर खोदण्यात सारखा होता . " ही व्यवस्था वरवरची मलमपट्टी ठरते. अशा पर्यायास मर्यादा असतात हे ध्यानात घेत आता गरज आहे ती दीर्घकालीन उपाययोजनांची. 
 
 
दोन दिवसापूर्वी रुग्णवाहिका मिळण्यास विलंब झाल्यामुळे मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी अग्निदिव्यातून जावे लागत आहे. मुंबई पुणे ठाणे या सारख्या शहरी भागांमध्ये देखील पुरेसे आवश्यक आरोग्य व्यवस्था उपलब्ध नाही हे कठोर वास्तव आता तरी मान्य करायला..च हवे. नियोजित शहर असा डंका पिटला जात असलेले नवी मुंबई शहर देखील यास अपवाद नाही , येथे १५ लाख लोकसंख्येसाठी केवळ एकच प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. "पुणे तिथे काय उणे" असे वारंवार म्हटले जात असले तरी पुण्यात देखील 'जम्बो हॉस्पिटल्स ' ची उणीव असल्याचे करोनाने दाखवून दिली आहे . नवी मुंबई सारख्या शहरात व्हेंटीलेटर्स ची कमतरता राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था 'व्हेंटीलेटर्स ' वर असल्याचेच अधोरेखीत करते .
 
ग्रामीण भागामध्ये तर अतिशय भयानक अवस्था आहे. तालुका , जिल्हा पातळीवर देखील सरकारी आरोग्य व्यवस्थेची वानवा आहे. एका अहवालानुसार आरोग्य व्यवस्थेवरील खर्चामुळे देशातील चार ते पाच करोड कुटुंब गरिबीत लोटले जातात हे सिद्ध झालेले आहे. 
 
         महाराष्ट्र राज्य हे विकसित पुरोगामी राज्य असल्याचा डंका पिटला जात असला तरी सर्वाधिक करोना रुग्ण व सर्वाधिक करोना मृत्यू हे महाराष्ट्रात झालेले आहेत हे अतिशय सत्य व कटू वास्तव आहे . सुरुवातीला सरकारने ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधून आवश्यक मनुष्यबळाअभावी धूळ खात पडलेले आरोग्य केंद्र सुरु करावेत. 
 
 
 
           खरे तर तात्पुरत्या स्वरूपातील हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय कालसुसंगत वाटत असला तरी भविष्यात तयार होणारी जम्बो " हॉस्पिटल्स वरातीमागून घोडे" ठरण्याची शक्यता पाहता हा एक प्रकारे हा निधीचा अपव्ययच ठरण्याचा धोका अधिक आहे. आता खरी गरज आहे दीर्घकालीन शास्वत उपाय योजनांची .
 
“आरोग्य स्वराज्य” : नागरीकांचा घटनादत्त हक्क :
‘आरोग्य स्वराज्य’ म्हणजे प्रत्येक रुग्णास आवश्यक दर्जेदार व मोफत व काही वर्गाला माफक दरात 'सार्वजनिक आरोग्य व्यवस्थे' च्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे . भारतात या मूलभूत हक्काचीच पायमल्ली होते आहे . 
 
         एकीकडे प्रतिवर्षी प्रतिमाणसी ७ लाख खर्च करणारे विकसित देशातील सरकार तर दुसरीकडे प्रतिवर्षी केवळ ७ हजार खर्च करणारे आपली सरकारे पाहता आपल्या देशात राजकीय -प्रशासकीय धोरण हे शासकीय आरोग्य यंत्रणेला मारक असणारेच आहे हे स्पष्ट होते .
 
 
त्              याही पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जो काही सकल उत्पनाच्या १ टक्का खर्च केला जातो आहे त्याचा विनियोग तरी रास्त आहे का ? स्थानिक स्वराज्य संस्था असोत कि अन्य सरकारी विभाग असू देत त्यांच्या कडे निधी नाही असे नक्कीच नाही , त्यांच्या कडे निधी आहे पण त्याच्या वापराचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत . करोनामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची सध्या झालेली 'करुणामय अवस्था ' भविष्यात टाळायची असेल तर त्यासाठी देशात "आरोग्य स्वराज्य " हा उपक्रम प्राधान्याने राबवायला हवा .
 
 
           असो! "कोळसा कितीही उगाळला तरी काळाच" या उक्तीप्रमाणे सार्वजनिक आरोग्य सेवेच्या समस्येवर केवळ चर्वितचर्वण करण्यापेक्षा आता खरी गरज आहे ती म्हणजे जमिनीवरील वास्तवदर्शी सत्य मान्य करत समस्याचे निराकरण करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे युद्धपातळीवर उपाययोजना करणे. 
 
दृष्टिक्षेपातील उपाय : 
 
ट्रस्ट/पिपिपी तत्वावर हॉस्पिटल्स चालवावेत :
प्रामाणिक इच्छाशक्ती असेल व ध्येय सुनिश्चित असेल तर हॉस्पिटल कशा प्रकारे ठरवले जाऊ शकते याचा वस्तुपाठ टाटा कॅन्सर हॉस्पिटल घालून दिलेला आहे. गेल्या 70 वर्षातील राजकीय प्रशासकीय भ्रष्ट कार्यपद्धती लक्षात घेता सरकार मार्फत दर्जेदार हॉस्पिटल्स चालवणे केवळ दिवास्वप्न ठरतेय. आजवर करोडो रुपये खर्चून देखील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मृत्यू शय्येवरच असल्याची दिसते आहे. करोनाने हे नागडे सत्य सर्वासमोर आणले आहे.
 
                 आरोग्य व्यवस्थेवर केल्या जाणाऱ्या सरकारी निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होऊन सरकारी हॉस्पिटल चा दर्जा सुधारायचा असेल तर भविष्यात " आरोग्य ट्रस्ट" स्थापन करावा त्यात टाटा समूह सारख्या सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या संस्था, अन्य सामाजिक संस्था व सीएसआर फंडातून सामाजिक उत्तरदायित्व निभवू पाहणाऱ्या कंपन्यांचा समावेश करावा.
 
                    आगामी ३ वर्षासाठी सीएसआर फंडा चा उपयोग केवळ आरोग्य सेवेसाठी च करावा. सरकारने आपल्या एकूण बजेटच्या पाच-दहा टक्के रक्कम या ट्रस्ट कडे प्रति माह सुपूर्त करावी.
 
सरकारला हे मान्य नसेल तर पुढील उपाय योजावेत :
• ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आगामी पाच वर्ष एकूण बजेटच्या २० टक्के बजेट हे केवळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या निर्मिती, विस्तार, उपकरणांची सुसज्जता व सेवेच्या दर्जाचे उच्चीकरण यासाठी वापरणे बंधनकारक करावे.
राज्य सरकारने " *ग्रामपंचायत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र*" ही योजना अंमलात आणावी.
• स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आजवरचा त्यांचा एकूण कारभार पाहता निधीची कमतरता नाही हे दिसून येते. *कमतरता आहे ती प्रशासकीय व राजकीय इच्छाशक्तीची*. प्रत्येक महानगर पालिकेला WHO निकषानुसार आवश्यक hospitals उभारणे अनिवार्य करावे.
• वर्तमानात निर्माण झालेली परिस्थिती व त्यातून रुग्णांची होणारी ससेहोलपट टाळायची असेल तर सरकारने विकासाच्या संकल्पनेत सार्वजनिक आरोग्य सेवेस सर्वोच्च स्थान द्यावे.
• महापालिकांना प्रत्येक वॉर्डमध्ये सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र अनिवार्य करावे.
• खाजगी हॉस्पिटल प्रशासनाचा मनमानी कारभार व त्यातून केली जाणारी रुग्णांची आर्थिक लूट यावर नियंत्रण येण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने करोना उपचाराचे दर पत्रक ठरवून दिले आहे त्याच धर्तीवर अन्य रोगाच्या उपचारावरील दरपत्रक देखील निश्चित करावे.
• जागतिक निकषाप्रमाणे एक लाख लोकसंख्येसाठी आवश्यक डॉक्टरांच्या संख्या पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात अपुरी आहे. हे लक्षात घेत सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी डॉक्टर, नर्सेस वॉर्डबॉय यांची "महा"भरती योजावी.
• वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठया प्रमाणात वाढवावी जेणेकरून लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची उपलबध्दता होऊ शकेल .
• वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवावी . सर्वसामान्यांना परवडेल या पद्धतीने एमबीबीएसची fees ठरवावी .
• Disaster Management तत्वास अनुसरून मिल्ट्री/ आर्मी च्या माध्यमातून तातडीने रुग्णालयाची निर्मिती युद्धपातळीवर सुरु करावी.
• आरोग्य व्यवस्थेवर कायमस्वरूपी लक्ष ठेवण्यासाठी तज्ञांचा समावेश असणारी समिती नेमावी.
• लोकप्रतिनिधी - नोकरशाहीला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतच उपचाराची सक्ती हवी : ज्या राज्यकर्त्ये व नोकरशाही कडे 'सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे ' उत्तरदायित्व आहे ती मंडळी मात्र जनतेच्या पैशातून खाजगी रुग्णालयांमध्ये स्वतःसाठी , स्वतःच्या कुटुंबासाठी उपचार घेतात . डोळसपणे पाहिले तर हा लोकशाहीचा पराभवच ठरतो . हा जनतेचा पराभव ठरतो . यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे गल्लीपासून दिल्ली पर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधी व नोकरशाहीला 'सरकारी हॉस्पिटल मध्येच उपचार घेण्याची सक्ती करणे ' . खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करावयाचे असतील तर त्यांनी स्वतःच्या पैशाने करावेत . रोग जालीम आहे त्यामुळे त्यावरील ईलाज देखील तितकाच जालीम हवा .

            अर्थातच सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपाय सुचवू शकतील. त्यासाठी गरज आहे सरकारने एक पाऊल पुढे टाकण्याची. 
 
                 चुका होऊ शकतात परंतु चुकांची पुनरावृत्ती टाळणे यातच खरे शहाणपण असते. सार्वजनिक आरोग्य कडे अक्ष्यम दुर्लक्ष हे आजवर सरकारने केलेली चूक असून त्याची पुनरावृत्ती टाळली जावी त्यासाठी हा आपणाशी पत्र रुपी संवाद.
 
चूक भूल देणे _घेणे. कृती युक्त सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. 
 
                                                                                                                कळावे आपला ,
                                                                                                                            सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,                                                                                                                       बेलापूर , नवी मुंबई                                                                                                                               danisudhir@gmail.com ९८६९२२६२७२. 
                                                                                                                            9004616272 


 

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

सर्वच सरकारी शाळांनी "दिल्ली स्कुल मॉडेल" चे अनुकरण करावे...


            प्रमुख वर्तमानपत्राच्या  मुखपृष्ठावर "मुंबई महानगर पालिका शाळेच्या एसएससी बोर्डाच्या यशाचा आलेख पालिकेच्या शैक्षणिक पायाभूत सुविधां बाबत" ची जाहिरात वाचण्यात आली . हि घटना सुखद धक्का देणारी आहे. या यशासाठी मुंबई पालिका प्रशासन पालिका  शिक्षण विभाग ,शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.   

       काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाच्या  मुखपृष्ठावर देखील दिल्ली सरकारच्या शाळांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. आज पर्यंत केवळ  खाजगी कोचिंग क्लासेस च्या जाहिराती वर्तमान पत्राच्या मुखपृष्ठावर पाहण्याची वाचकांना सवय होती. या पार्श्वभूमीवर सरकारी शाळांच्या , महानगर पालिका शाळांच्या जाहिराती एक शुभ सूचक ठरतात.

               सरकारी शाळा म्हटल्या की त्या खाजगी शाळांच्या तुलनेत दर्जाहीन या आजवरच्या इतिहासाला 'भूतकाळात' जमा करत दिल्ली सरकारने देशासमोर सरकारी शाळांचे 'भविष्यकाळ' दर्जेदार करण्यासाठीचा वस्तुपाठ घालून दिला आहे . मुंबई पालिकेची त्या दिशेने होणारी वाटचाल नक्कीच प्रशंसनीय म्हणावी लागेल.




             अर्थातच बहुतांश वेळेला जमिनीवरील वास्तव आणि जाहिरात यात विसंगती असते. त्यामुळे मुंबई पालिकेच्या दर्जावर अजून देखील प्रश्नचिन्ह आहेच . बोर्डाच्या परीक्षेत पस होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी हा शाळांच्या दर्जाच्या एकमेव निकष असू शकत नाही आणि वर्तमानात तर नाहीच नाही कारण आजकाल परिस्थिती अशी आहे की , विद्यार्थ्याने ठरवले तरी त्यास नापास होणे अवघड आहे . अनेक निकषांपैकी तो एक निकष असू शकतो .शाळांच्या दर्जाचे खरे निकष म्हणजे उपलब्ध पायाभूत (जसे शाळांची इमारत , ग्रंथालय ,प्रयोगशाळा , खेळाचे मैदाने साहित्य )सुविधांचा दर्जा , शिक्षक प्रशिक्षण शिक्षकांचा दर्जा , अध्यापन पद्धतीचा दर्जा . डोळसपणे पहिले तर मुंबई पालिकेच्या शाळा या बाबतीत अजूनही डाव्याच आहेत . सुधारण्यास खूप वाव आहे . पहिले पाऊल त्या दिशेने टाकले आहे हे मात्र मान्य .

     दिल्लीच्या शाळांची दखल ,चर्चा देशपातळीवर ,आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसते कारण अगदी थोड्या कालावधीत आपच्या सरकारने तेथील शाळांच्या पायाभूत सुविधांच्या दर्जात केलेला आमूलाग्र बदल . त्यामुळेच अगदी सामान्य नागरिकांच्या चर्चेत देखील दिल्लीच्या शाळांचे कौतुक होत असते. मुंबई महानगर पालिकांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. हे कशाचे द्योतक म्हणायचे? असो! प्रमुख ' प्रश्न ' आहे तो सरकारी शाळां च्या गुणवत्तापर्ण दर्जा अभावाचा. याला सरकार ने थेट कृतीतून ' उत्तर ' द्यावे ही अपेक्षा .

       राज्यकर्त्यांचे 'शिक्षण शिक्षणातील  कार्यपद्धती याचा संबंध नसतो हे आजवर जोपासलेले मिथक केजरीवाल , मनीष सिसोदियांनी आपल्या कार्यपद्धतीतून बाद केले आहे .त्यांनी हेतुपूर्वक सरकारी शाळांचा दर्जा उच्चीकरण प्रकल्प राबवला . खरे तर देशातील सर्वच राज्य सरकारांनी "दिल्ली मॉडेल" चे अनुकरण करत सरकारी शाळांच्या दर्जाचे उच्चीकरण ,जतन , संवर्धनाचा ध्यास घ्यावा .

        राज्यकर्त्यांची तळमळ प्रामाणिक असेल , हेतू शुद्ध असेल आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर 'सरकार ' या चार अक्षरात कुठल्याही क्षेत्रात चमत्कार करण्याची अपार ताकद असते हे दिल्ली सरकारने शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्थेत आमुलाग्र बदल करत  प्रत्यक्ष कृतीतुन  सप्रमाण सिद्ध केलेले आहे

       आपला महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र अशी दवंडी पिटली जात असली तरी महाराष्ट्रात सरकारी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे . वर्ग शिक्षक , वर्ग वि पर्यंतचे शिक्षक किंवा अशी करून अवस्था आहे . त्यामुळेच महाराष्ट्रात खाजगी शाळांना सुपीक जमीन लाभते आहे त्यांचे पीक बेफाम वाढलेले आहे . खाजगी शाळा पालकांच्या ' आर्थिक लुटीचेकेंद्रे ठरत आहेत . खाजगी शाळांवरील सरकारच्या जाणीवपूर्वक ' अनियंत्रणामुळे ' बोटावर मोजता येईल असे काही अपवाद वगळता बहुतांश खाजगी शाळांची मनमानी वाढलेली आहे . फीस म्हणजे पालकांना लुटण्याचा 'सरकारमान्य अधिकृत मार्ग ' या पद्धतीने शुल्क वसूल केले जात आहे . सरकारचा 'शुल्क नियंत्रण कायदा' केवळ कागदी वाघ ठरतो आहे

            असो ! समस्याचे चर्वितचर्वण करण्यापेक्षा या घटनेकडे एक सकारात्मक बदल या दृष्टीने पहात आता एकच अपेक्षा आहे की , महाराष्ट्र सरकारने देखील केवळ उक्तीतून ' करून दाखवले ' अशी दवंडी पिटत वर्षानुवर्षे दिशाभूल करण्यापेक्षा  "दिल्ली, मुंबईच्या  पाऊलावर पाऊल ठेवत" आगामी काळात सरकारी शाळांच्या दर्जाचे उच्चीकरण करण्याचा ध्यास घ्यावा . प्रामाणिकपणे ठरवले तर अशक्य असे काही नाही . महाराष्ट्राचे पुरोगामीत्व केवळ घोषणेत नसावे ते कृतीत उतरावे हि अपॆक्षा आहे . सर्वच सरकारे सरकारी शाळांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करतात , प्रश्न आहे तो त्या निधीच्या विनियोगाचा . दिल्लीने त्यावरच भर देत उद्दिष्टपूर्ती साधली , महाराष्ट्राने सुद्धा हि उद्दिष्टपूर्ती साधावी

          लाख मोलाचा अनुत्तरित प्रश्न हा आहे की ,   १०/१५ वर्ष आयुष्यमान असणाऱ्या 'आम आदमी सारख्या ' पक्षाच्या   दिल्ली सरकारला जे शक्य आहे ते १००/१५० वर्षांचा इतिहास असणाऱ्या राजकीय पक्षांना का जमत नाही ?  बहुतांश खाजगी शाळा या लोकप्रतिनिधींच्याच असल्यामुळे ' सरकारी शाळांचा दर्जा उंचावणे ' म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे असे होत असल्यामुळे तर अन्य राज्य , नेते सरकारी शाळांच्या दर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हि शंका मात्र गैर नक्कीच नाही .

 

सुधीर लक्ष्मीकांत  दाणी ,

प्रतिक्रियेसाठी संपर्क  :  danisudhir@gmail.com  9869226272 

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

शिक्षण व्यवस्थेस हानिकारक 'कृत्रिम गुणवत्तेच्या फुगवट्याला ' लगाम हवाच ....


                राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर सर्वत्र आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत याचे कारण म्हणजे यावर्षीचा " विक्रमी निकाल " . १०० टक्के मार्क्स मिळवणाऱ्यांची ९० टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्यांच्या संख्येत काही पटींनी वाढ झालेली दिसते . प्रश्न हा आहे की , गेल्या वर्षात शिक्षण खात्याने , शिक्षकांनी असा कुठला उपक्रम राबवला की , विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले ? याचे उत्तर नकारात्मक आहे . यावरून हेच अधोरेखीत होते की  " गुवत्तेतील खरे तर गुणांमधील वाढ हा कृत्रिम फुगवटा आहे आणि म्हणूनच त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे .

            ज्या व्यक्तीला आधीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये 'गंभीर आजार ' असल्याचे निदान झालेले असताना त्याच व्यक्तीच्या 'फुल बॉडी चेकअप ' च्या   मेडिकल रिपोर्ट मध्ये ती व्यक्ती संपूर्णपणे सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र ज्या प्रमाणे प्रश्नांकित ठरते तद्वतच एकीकडे 'प्रथम ' या संस्थेने वेळोवेळी खाजगी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा ,गणित या सारख्या विषयांचे मूलभूत कौशल्य जसे वाचन -लेखन , मूलभूत संकल्पना जसे बेरीज-वजबाकी -गुणाकार-भागाकार त्या त्या वर्गास आवश्यक पातळीचे नसल्याचे दाखवून दिलेले असताना बोर्डाच्या परीक्षेत मात्र तेच विद्यार्थी 'शंभर नंबरी हुशार , मेरीटवाले ' ठरतात , बोर्डाचा निकाल उच्चांकी लागतो हे सारे प्रश्नांकीतच आहे .

              दुःख निकाल उच्चांकी लागल्याचे नसून अशा कृत्रिम गुणवत्ता फुगवट्या मुळे  स्वतः विद्यार्थी पालकांची होणाऱ्या दिशाभुलीबाबतचे  हे  दुःख आहे . अशा फसव्या गोष्टींमुळे ज्या शिक्षणामुळे आयुष्याला 'दिशामिळणे अभिप्रेत आहे ते 'दिशाहीन ' करणारे ठरू शकते .

            'गुणवत्ता 'कागदावर दाखवली जात असली तरी प्रथम सारख्या स्वायत्त संस्थेच्या अहवालातून ती देखील केवळ दिशाभूलच आहे हे अनेकवेळा दिसून येते ते सत्यच असल्याचे उघड आहे कारण आजवर प्रथमच अहवाल नाकारण्याचे धाडस कोणी ही दाखवलेले नाही . आपल्या दुकानदारीला ग्राहक कमी पडू नयेत म्हणून मोकळ्या हाताने गुणांची खैरात केली जाते  त्यामागे महाविद्यालयांचे अर्थकारण कारणीभूत आहे हे ही नागडे सत्य आहे .

             केंद्रीय बोर्डाच्या निकालाची स्पर्धा  ( केंद्रीय मंडळाचे सर काही दर्जेदार आहे हि देखील एक शैक्षणिक अफवाच आहे , हेही ध्यानात ठेवायला हवे ) करताना 'गुणवत्तेचा निकाल ' लागू नये एवढीच माफक अपेक्षा शिक्षणप्रेमींना आहे . वाढता निकाल अनेकांना अभिमानस्पद वाटतही असेल पण अशा व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की  'वृथा स्वाभिमान आणि वास्तव ' यांच्यामध्ये ' सत्य ' नावाचा पडदा असतो तो पारदर्शक असल्यामुळे असत्याचा बुरखा कधी ना कधी फाटतोच .

गुणवत्तेचे प्रतिंबीब नीट ,सीईटी या स्पर्धा परीक्षेत का प्रतीत होत नाही ?:     ज्या महाराष्ट्रात केवळ ४८ हजाराच्या च्या जवळपास ९०  पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्यात भर CBSE आणि ICSE ची घातली की हा आकडा ६० हजारांच्या च्या आसपास जाईल तिथे राज्याच्या MHTCET मध्ये २००  पैकी १९०  च्या वर गुण घेणारे केवळ १० विद्यार्थी आणि ७५  टक्के म्हणजे १५०  गुण घेणारे केवळ हजार नऊशे. म्हणजेच  ६० हजार पैकी केवळ टक्के विद्यार्थी मागील वर्षी होते . हि विसंगती कशामुळे ? जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत गुणवंत दिसतात तेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आपली गुणवत्ता का सिद्ध करू शकत नाहीत . अर्थातच बोर्डाचा निकाल हा कृत्रिम गुणवत्तेचा फुगवटा आहे हेच सिद्ध होते .

      ज्यांनीही दहावीच्या मार्कांच्या बाबतीत लिबरल धोरण ठेवलं मग ते कोणतेही बोर्ड असो त्यांनी या शिक्षणाची वाट लावली हे मात्र नाकारता येणार नाही . कृत्रिम फुगवट्यामुळे अनेक पालकांची दिशाभूल होते आहे . बोर्डातील मार्क्स पाहून ते आपल्या पाल्याला डॉक्टर ,इंजिनियर 'बनवण्यासाठी ' / लाख फीस असलेले क्लास लावतात . परतू शेवटी वर्षांनी पितळ उघडे पडते पदरी निशारा पडते . त्यांना जर दहावीच्या निकालातच त्यांची खरी लायकी दिसली असती तर अशी स्थिती निर्माण झालीच नसती.

     गुणवत्तेच्या कृत्रिम फुगवट्यामागे अंतर्गत गुणांची खैरात हे ज्या प्रमाणे प्रमुख कारण आहे त्याच प्रमाणे परीक्षेत शिक्षक -पर्यवेक्षक -संस्थाचालक बोर्डाच्या सहकार्य अभयामुळे मोठया प्रमाणात  होणारी कॉपी हे देखील प्रमुख कारण आहे . सोप्या कडून अधिक सोप्याकडे असा शिक्षण व्यवस्थेचा होणारा प्रवास वास्तवात मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रवास मात्र अधिकाधिक खडतर बनवताना दिसतो आहे . भविष्यात यात बदल होणे अत्यतं निकडीचे आहे .


       गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आपल्या देशाचा गाडा हा टक्केवारीवरच चालतोटक्केवारीची लागण शिक्षण क्षेत्राला देखील झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणपत्रक हिच त्याची ओळख ठरु लागली   त्यामुळे  टक्केवारीचे भूत विद्यार्थी-पालक आणि शिक्षकाच्या मानगुटीवर स्वार  झाले  पर्यायाने त्यातूनच शिक्षण व्यवस्थेशी निगडित सर्व घटक कृत्रिम गुणवत्तेच्या  फुगवटा  करण्यास हातभार लावत आहेत . निकालाची वाढती टक्केवारी , विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये आकाशाला गवसणी घालणारी वाढ हि विद्यार्थी -पालक -शाळांना सकृतदर्शनी वरवर सुखावणारी असली तरी ती एकुणातच शिक्षण व्यवस्थेच्या आरोग्यास घातक आहे . कृत्रिम गुणवतेच्या फुगवट्याचा शिक्षण व्यवस्थेवर होणारा दूरगामी दुष्परिणाम लक्षात घेता , 'टक्केवारीच्या फुगवट्याला टाचणी लावण्याचे , लगाम घालण्याचे'   धाडस  शिक्षण खात्याने , शिक्षण मंत्र्यांनी बोर्डाने करणे अत्यंत निकडीचे आहे .

             सारांशाने , बहुतांश शिक्षणप्रेमी , शिक्षणतज्ञांचे हेच मत आहे की , मार्कांची  खिरापत वाटणारे धोरण बदला विद्यार्थ्यांना त्यांच्यातील वास्तवाचे भान राहील अशा परीक्षा पद्धतीचा स्वीकार करा .

                                                                                                                             सुधीर लक्ष्मीकांत दाणी

                               प्रतिक्रियेसाठी संपर्क :  danisudhir@gmail.com 9869226272