मंगळवार, १२ जून, २०१२

दर्जाहीन "ग्रेस " मार्क्स काय उपयोगाचे ?


                                                                                                                                                                                                                              
                                                                                                                                                   
         गणित व विज्ञान विषयात ग्रेस मार्क मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी लेखी परीक्षेत किमान २५ टक्के मार्क मिळवण्याची अट यंदा ९वी , दहावी आणि अकरावी या तिन्ही इयात्तासाठी लागू नसल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. ८वी पर्यंत कोणाला नापास करावयाचे नाही आणि आत्ता या  सवलतीचे गजर म्हणजे शिक्षणाच्या दुकानदारीला कच्चा माल पुरवण्याची सोय म्हणावी लागेल.

        
तोंडी परीक्षा या शाळांमार्फत घेतल्या जात असल्यामुळे ती फक्त औपचारिकता ठरते हे सर्वश्रुत आहे. २० मार्कांच्या परीक्षेत १८-२० मार्क आणि ८० मार्काच्या पेपर मध्ये १० मार्क मिळवून २५ मार्क मिळालेतरी गराचे मार्कांना पात्र हा निर्णय म्हणजे लढायला निघण्यापूर्वीच विजयाची खात्री देण्यासारखे होय .
     या वर्षापासून या सवलतीला चाप लावण्याचे मंडळाने ठरवले होते परंतु विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्याला स्थगिती देण्याचे मंडळाने जाहीर केले आहे . राज्य मंडळ स्वतंत्रपणे अभ्यास करून या बाबत निर्णय घेणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. याचा अर्थ या आधी निर्णय अभ्यास न करता घेतला होता असाच होतो ना ?
        
गेल्या काही वर्षात शिक्षणाचा दर्जा पातळ करण्याकडेच एकूण शिक्षण विभागाचा कल दिसतो . गुणवत्ता वाढी पेक्षा संख्यात्मक वाढीकडे असलेला कल संशयातीत ठरतो . एकीकडे स्पर्धा वाढली आहे असे म्हणावयाचे तर दुसरीकडे त्यास विसंगत असे निर्णय घ्यायाचे हे त्याचेच द्योतक आहे. अडथळ्याची शर्यत त्याची उंची कमी करून जिंकण्यात काय हशील ? हि निव्वळ धूळफेक ठरेल.
         
आज ग्रामीण भागामध्ये शिक्षण /पदव्या  आहेतपण नोकरी  नाही . दर्जाच नसल्यामुळे कुठेही निवड होत नाही . असे शिक्षण काय उपयोगाचे ? शिक्षण घेतल्यामुळे शेतीत काम करण्यास नकार ! नोकरी नाही म्हणून बेकार ! तरुण सुशिक्षित मुले आज कुटुंबाचा आधार नसून भार ठरत आहेत. ग्रामीण भागाला दिशाभूल देणारे असे निर्णय थांवायाला हवेत.  आपला देश कृषिप्रधान देश आहे (?) आणि २०२० मध्ये तो तरुणांचा देश असणार आहे , या परिस्थितीत शेतीस नकार देणारे आणि नोकरी / व्यवसायास लायक नसणारी  पिढी घडवून महासतेचे स्वप्न  प्रतेक्षात कसे उतरले जाऊ शकते याचे शिक्षण विभागाने सिंहावलोकन करावे. समाज सुधारण्याचे काम करणारे शिक्षण द्यायचे कि बिघडवणारे हे  आता तपासण्याची वेळ आली आहे. शिक्षण क्षेत्र हे प्रयोगाचे क्षेत्र नाही याचे किमान भान शिक्षण मंडळाने ढेवावे हीच माफक अपेक्षा .
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा