शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीस राज्यातील खासगी
विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शुल्कवाढीच्या भडक्याविरोधात पालकांतर्फे
विविध प्रकारची तीव्र आंदोलने झाली. या आंदोलनाची दखल घेत व न्यायालयाच्या
निर्देशानुसार शासनाने कुमुद बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली एकूण २१ जणांची
‘शुल्क
निर्धारण/ नियंत्रण समिती’ ८ मे २००९ रोजी स्थापन केली. या समितीमध्ये निवृत्त शिक्षण संचालक, शिक्षणतज्ज्ञ , विविध बोर्डाच्या शाळा व्यवस्थापनाचे
प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधी यांचा समावेश होता.
एकीकडे जागतिक आर्थिक मंदी तर दुसरीकडे वाढती महागाई यामध्ये ‘सॅन्डवीच’ झालेल्या सामान्य पालकांच्या दृष्टीने ही समिती म्हणजे मोठा आधारस्तंभ, आशावाद होता. शासनाला जनतेचा कळवळा आहे म्हणून त्यांनी खासगी शाळांच्या नफेखोरीला चाप लावण्याकरिता ही समिती स्थापली हा त्याचा भाबडा आशावाद होता, पण शेवटी त्याच्या करिता या समितीचा अहवाल म्हणजे मृगजळच ठरले. लक्ष्मीपुत्रासमोर सरस्वती ही हतबल ठरते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शासनाने विधानसभा डोळ्यासमोर ठेवून, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेल्या मध्यम वर्गीय मतदार राजाला कशाला दुखवायचे, ‘थंडा करके खाओ’ हा दृष्टिकोन अवलंबला असावा असे एकूणच समितीच्या शिफारशी पाहून म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अर्थातच आजपर्यंतच्या अनेक समित्या, आयोग यांच्या स्थापनेमागे जो उद्देश की ‘मूळ विषयाला बगल देणे, वाद-विवाद घडवून योग्य कलाटणी देणे, काळ हे सर्व समस्यांवरील उपयोगी पडणारे सार्वत्रिक औषध आहे कारण जनतेला विस्मरण लवकर होते, आपल्याला हवे ते व हवे तसे सनदशीर मार्गाने साध्य करणे’ या कसोटीला पूर्णपणे उतरला आहे ही जनभावना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २६ जून ते १० ऑक्टोबर ०९ या कालावधीत या समितीने एकूण सात मीटिंग्ज घेतल्या आणि १५ ऑक्टोबरला हा अहवाल शासनाच्या www.maharashtra.gov.in वर जनतेसाठी प्रसिद्ध केला. हा अहवाल ५० पानांचा असून पूर्णपणे इंग्रजी भाषेत आहे. या अहवालाचा अभ्यास करून त्या संदर्भातील तक्रारी वा सूचना २४ नोव्हेंबपर्यंत नोंदवायच्या आहेत. यानंतर शासन अंतिम निर्णय घेणार आहे. या अहवालावर नजर टाकली असता आपण कुठल्या तरी चुकीचा अहवाल तर वाचत नाही ना असा संभ्रम निर्माण होतो. शिक्षणाचे वैयक्तिक, समाज तसेच राष्ट्राच्या प्रगतीत असलेले अनन्यसाधारण महत्त्व, राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत होण्यामध्ये विनाअनुदानित शाळांचे योगदान, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा विनाअनुदानित शाळांचे मुख्य ध्येय व ते साध्य करण्यासाठी लागणारी भौतिक साधन सुविधा या साठी आवश्यकता पडते ती पैशाची (थोडक्यात ब्रेन पॉवरसाठी मनीपॉवर टॉनिक म्हणून गरजेचे) आणि महाराष्ट्राची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा या सारख्या अनेक विषयांवर चर्चा घडवून विषयांतर केल्याचे स्पष्टपणे जाणवते. या पुष्टय़र्थ अनेक विचारवंतांचे दाखले दिले आहेत. शासनाने स्थापन केलेल्या या समितीचे मुख्य अपेक्षित कार्य होते ते ‘विनाअनुदानित शाळांची शुल्क निश्चिती’ यास अनुसरून आम्हा तमाम पालकांची ही इच्छा होती की समितीने विविध बोर्डाच्या शाळांच्या मागील तीन वर्षांच्या जमा खर्चाच्या वार्षिक ताळेबंदाचा अभ्यास करून त्याच्या सत्या असत्याची शहानिशा करावी, शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा (उपलब्ध सुविधा आवश्यक असतीलच असे नव्हे म्हणून, बऱ्याचशा सुविधा या लक्ष्मीपुत्रांचे चोचले पुरवण्याकरिता असतात) विचार करून प्राथमिक व माध्यमिक स्तरांवरील वर्गासाठी किमान व कमाल शुल्क निर्धारित करावे. या समितीने एवढी उठाठेव करून केलेली एकमेव शिफारस म्हणजे विनाअनुदानित शाळांना अनुचित नफा न कमवता त्यांच्या एकंदरीत खर्चाच्या अतिरिक्त १५ टक्के जास्त रक्कम विद्यार्थ्यांकडून शुल्क रूपाने/ शुल्काद्वारे घेता येईल. ही रक्कम भविष्यात होणाऱ्या विस्तारासाठी व वर्तमानकाळातील देखभालीसाठी वापरता येईल. शिफारसीस पूरक अशी अहवालातील काही विधाने : संदर्भ- १) (Para 3) विविध बोर्डाच्या या विनाअनुदानित शाळांच्या अभ्यासक्रमात विविधता आढळते. या शाळांमधील भौतिक सुविधांचा दर्जा उत्तम असतो. शिक्षक व इतर कर्मचारी व्यावसायिक कौशल्यप्राप्त असतात तर शैक्षणिक व इतर पूरक उपक्रमात वैविधता असून त्याचा दर्जा उत्तम असतो, परिणामी शाळांच्या शुल्कामध्ये तफावत आढळते व यामुळेच जनता व पालकांमध्ये तक्रारीचा सूर आढळतो. हे सर्व असले तरी विद्यार्थी, पालकांमध्ये एक भावना निश्चित आहे की अनुदानित शाळांचा दर्जा उत्तम असतो व म्हणून प्रवेशाची चढाओढ आढळते. अर्थातच शुल्क जादा असले तरी सर्व शाळांत दर्जा उत्तम असेल असे नाही. २) टी.एम.ए. पै फाऊंडेशन विरुद्ध कर्नाटक शासन खटल्याचा निकाल :- गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी शासनाच्या बंधनापासून दूर असलेल्या शाळांची गरज आहे. या शाळांना दैनंदिन व्यवहारात स्वातंत्र्य असावे, व्यवस्थापन, शुल्क आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश ठरविण्याचा अधिकार दिला जावा. उच्च शिक्षणाची वाढती मागणी व शासनाची अयोग्यता, इच्छाशक्तीचा अभाव यामुळे खासगी उच्च शिक्षणाला मागणी आहे. शासनाची यामध्ये ढवळाढवळ खासगी संस्थेच्या स्वातंत्र्याला मारक ठरते. उच्च दर्जा अबाधित राखण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. शाळांना शासनाचे अनुदान मिळणार नसेल तर शाळा व्यवस्थापनाला शुल्क रचना ठरविण्याचा अधिकार असावा. ३) मॉडर्न स्कूल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (२००५) :- खासगी शाळांना स्वायत्तता असावी हेच येथेही अभिप्रेत आहे. शासनाला शुल्क लादण्याचा, ठरविण्याचा अधिकार नाही वगैरे वगैरे. ४) अमर्त्य सेन (१९७०) :- जनतेच्या दबावाला बळी पडून शैक्षणिक धोरण ठरविण्याच्या वृत्तीमुळे चुकीच्या धोरणाचा पाठपुरावा केला जातो. या सर्व संदर्भातून समितीचा सुरुवातीपासूनचा नकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. या सर्व गोष्टी सर्वज्ञात होत्या तर शासनाने ‘शुल्क रचना समिती’ स्थापण्यामागचा उद्देश कोणता हा अनुत्तरितच राहतो. श्रम, पैसा आणि वेळ यांचा अपव्यय करून पालकांच्या पदरात शासन कुठले दान टाकू इच्छिते. बहुसांख्यिक समितीमध्ये प्रत्येक विषयावर एकमत होणे अशक्य असल्यामुळे समितीतील सदस्यांचा कलामधील बहुमताचा आदर करून समिती निष्कर्षांप्रत आलेली आहे तो म्हणजे ‘कॅपिटेशन फी व प्रवेश देणग्यांना बंदी असल्यामुळे विनाअनुदानित शाळा नफा न कमावता त्यांच्या एकंदरीत खर्चाच्या अतिरिक्त १५ टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून शुल्क रूपाने स्वीकारू शकतील.’ शाळांना लागणाऱ्या टाचणीपासूनच्या आवश्यक त्या सर्व खर्चाची अतिशय तपशिलात जाऊन मांडणी केली आहे. बहुमताने निर्णय घेतले गेले हे सांगताना समितीमध्ये शिक्षणतज्ज्ञ किती, शाळा व्यवस्थापन, प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधी किती याचा तपशील मात्र देणे कटाक्षाने टाळलेले दिसते. हीच का समितीची पारदर्शकता? कोणत्याही पालकांना आपल्या पाल्याला विनाअनुदानित शाळेतच प्रवेश घ्यावा असे बंधन नाही असा अनाहूत सल्ला देणाऱ्यांना कोणत्याही शिक्षणसंस्था चालकाला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात गुंतवणूक करा व नंतर त्याचा परतावा मिळवण्याकरिता शाळांना व्यावसायिक रूप देऊन नफेखोरीसारखी अपप्रवृत्तीचा शिरकाव करा असे समाजाने बंधन घातले नव्हते याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतोय. शाळांना परवानगी मिळविताना सामाजिक बांधीलकी, लोकांप्रतीचे उत्तरदायित्व यांसारख्या गोष्टींचा गवगवा करावयाचा व नंतर वसुलीचे धोरण अवलंबावयाचे हे दुटप्पी धोरण समाजास हानिकारक ठरू पाहतेय. ६७,८८५ प्राथमिक शाळा असून त्यापैकी जवळपास ९० टक्के शाळा या जिल्हा परिषद, स्थानिक संस्था यांच्यामार्फत चालवल्या जातात. १६,२६४ खासगी माध्यमिक शाळा असून १३,०५५ अनुदानित असून ३२०९ विनाअनुदानित आहेत. या अनुदानित शाळांची कामगिरी समाधानकारक नसल्याचा जावईशोधही समितीने काढला आहे. या खालावलेल्या गुणवत्तेमुळे मोठय़ा प्रमाणात समाज उच्च दर्जाच्या शिक्षणापासून वंचित असल्याचे म्हटले आहे. शासनाचे अपुरे व अनियमित अनुदान हे यामागचे कारण सांगितले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विनाअनुदानित शाळांना शुल्क ठरविण्याचे स्वातंत्र्य किती आवश्यक ते पटवून दिले आहे. यातून समितीचा सुप्त हेतू नजरेस यायला हरकत नसावी. अर्थातच सर्व अनुदानित शाळा गुणवत्तापूर्ण नाहीत हे जसे अर्धसत्य आहे तसेच सरसकट विनाअनुदानित शाळा गुणवत्तापूर्ण आहेत हेही अर्धसत्यच आहे. विनाअनुदानित शाळा या शैक्षणिक दर्जाबाबतीत उजव्या असतात हे धाडसी विधान करणाऱ्यांनी या शाळांमधील विद्यार्थी गुणवत्ता वृिद्धगत, जोपासण्यासाठी किती काळ टय़ूशन क्लासला जातात याचा शोध घेणे जास्त सयुक्तिक ठरेल. विनाअनुदानित शाळा म्हणजे फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा एक मोठा गैरसमज. आजही अनेक नवीन मराठी माध्यमांच्या शाळा अनुदानित नाहीत हे समितीच्या गावीच नसल्याचे जाणवते. इंग्रज गेले असले तरी ‘इंग्रजी’ म्हणजे गुणवत्ता हा भ्रम मात्र सर्व शिक्षित- अशिक्षित समाजाच्या मनात मात्र कायमचा घर करून राहिलेला दिसतोय असो.. समितीच्या विषयांतरावर प्रकाश टाकताना आपले विषयांतर नको! शुल्क निश्चित करताना शाळांवर एकमात्र घातलेले बंधन म्हणजे व्यवस्थापनाने आपले अंदाजपत्रक आणि जमाखर्चाचा ताळेबंद शिक्षक- पालक संघाकडून मंजूर करून घेणे बंधनकारक आहे. संपूर्ण अहवालात वेळोवेळी शासनाला हस्तक्षेप करण्याचा नैतिक अधिकार नाही. हे पटवून देणाऱ्या समितीला पालक- शिक्षण संघटनेला (PTA) हा अधिकार असल्याचा साक्षात्कार कसा झाला हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच राहतो. आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा उदात्त, दूरदर्शी व व्यावहारिक हेतू समोर ठेवून असणारे पालक प्रतिनिधी खरेच व्यवस्थापनाच्या विरोधात जाऊन अंदाजपत्रकावर आक्षेप घेण्यास धजावतील का? पाण्यात राहून माशाशी वैर कशाला हा दृष्टिकोन न्याय मिळण्यास बाधा पोहोचवणार नाही का? समितीने पुन्हा ‘बॉल’ पालकांच्या कोर्टात टाकून व्यवस्थापनाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. जोपर्यंत कमाल शुल्काचे कायदेशीर बंधन घातले जात नाही, तोपर्यंत कागदपत्रांचे घोडे नाचवत पालकांना नागवणे हा व्यवस्थापनाच्या डाव्या हाताचा खेळ आहे. आजच्या या आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक बोर्ड आहेत, त्यांचे अभ्यासक्रम वेगवेगळे असल्यामुळे निश्चित असे शुल्क ठरवले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. अभ्यासक्रमामध्ये विविधता असली तरी मूलभूत आवश्यक सुविधा जशा इमारत, शिक्षक, पुस्तक, फळा, तत्सम समान असतात त्यामुळे शुल्क निश्चित करण्यास काहीच अडचण नव्हती. बोर्डाच्या पाठय़क्रमाव्यतिरिक्त जे उपक्रम आहेत त्यानुसार शाळांनी अतिरिक्त शुल्क आकारण्याची मुभा द्यावयास हवी होती. समितीच्या या अहवालावर १० डिसेंबर पालकांनी आपल्या तक्रारी, आक्षेप, मत ‘शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे’ यांच्याकडे पाठवावयाच्या आहेत. हा अहवाल प्रत्येक पालकापर्यंत वेळेत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आलेले असले तरी आज फक्त अहवाल इंटरनेटवर उपलब्ध असून तो फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. काही राजकीय पक्षांनी मराठीतून हा अहवाल हवा ही मागणी केल्यामुळे २४ नोव्हेंबर या अंतिम मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक प्रसारमाध्यमे यामध्ये सिंहाची भूमिका बजावू शकतात. यावर रान पेटवून समाजात जागृती निर्माण करून भविष्यातील शिक्षणाच्या व्यापारीकरणाला आळा घालू शकतात. ज्या राष्ट्राचे शिक्षण उत्तम तेच राष्ट्र प्रगती करू शकते या न्यायानुसार भारताला खऱ्या अर्थाने ‘महासत्ता’ बनवायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने जागृत होणे आवश्यक वाटते. सर्वात आश्चर्याची (?) गोष्ट म्हणजे शुल्कवाढीविरोधात ज्या ज्या लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांनी आंदोलने करून मोठमोठय़ा वल्गना केल्या होत्या त्यापैकी कोणीही शुल्क वाढीची शिफारस करणाऱ्या या आयोगासंबंधी चांगली- वाईट प्रतिक्रिया नोंदवल्याचे ऐकीवात नाही. (होय, आले लक्षात तूर्तास कुठलीही निवडणूक नाही.) बहुतांश शाळा या लोकप्रतिनिधी/ राज्यकर्त्यांच्या असल्यामुळे आणि थोडय़ाबहुत शाळा या अधिकाऱ्यांच्या असल्यामुळे शुल्क निर्धारण समितीने शुल्क कपात सुचविणे आणि शुल्क वाढीस राजकीय नेत्यांनी विरोध दर्शविणे म्हणजे आपण ज्या फांदीवर बसलो आहोत त्याच फांदीवर शेखचिल्लीसारखा कु ऱ्हाड मारण्याचा प्रकार ठरेल. ही अडचण लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्याचे भवितव्य ठरविणे हे फक्त आपल्याच हातात आहे हे पक्के ध्यानात ठेवावे व त्यानुसार कृती करावी ही अपेक्षा. |
पृष्ठे
- नवी मुंबई महानगरपालिकेने पायाभूत सुविधांबरोबरच शैक...
- शुल्क नियंत्रण शक्य नसेल तर ... शालेय शुल्क होरपळ...
- पालकांना न्यायदेण्यासाठी " शालेय शुल्क निश्चिती" ...
- शिक्षणक्षेत्रात " अभ्यासशून्य ,नियोजनशून्य " प्रयो...
- महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था मृत्युशय्येवर : एक ...
- "कमाल शुल्क" लाटणाऱ्या तथाकथीत नामवंत शैक्षणिक ...
- विद्यापीठ विश्वासार्हता जतन -संवर्धनासाठी मुंबई व...
- “ सर्व समस्यांवरील रामबाण उपाय ” बिरुदावलीप्राप्त ...
WELCOME
रविवार, १५ जुलै, २०१२
शुल्क निर्धारण/ नियंत्रण समिती: एक मृगजळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा